नागपूर – नागपूर रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे चेन्नई येथून अपहरण करण्यात आलेल्या बालकाची येथे सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली असून मोनू गरीबदास केवट आणि शिब्बू गुड्डू केवट, अशी या आरोपींची नावे आहेत. या कारवाईमुळे नागपूर रेल्वे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. या संदर्भातील माहिती तमिळनाडू पोलिसांना देण्यात आली असून त्यांचे पथक येथे येणार आहे.
‘तमिळनाडू एक्सप्रेसने २ आरोपी चेन्नई येथील एका बालकाचे अपहरण करून जात आहेत’, असे चेन्नई येथील पोलिसांनी नागपूर रेल्वे पोलिसांना दूरभाषद्वारे सांगितले. त्यामुळे येथील रेल्वे पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी ही रेल्वे येथे येताच माहितीच्या आधारे त्या रेल्वे डब्याची पडताळणी केली. त्या वेळी पोलिसांना २ जणांसमवेत १ बालक असल्याचे दिसून आले. त्या दोघांची चौकशी केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी ‘आम्ही कुणालाही न सांगता या बालकाला घेऊन जात आहे’, असे सांगितले. रेल्वे पोलिसांनी या २ आरोपींना अटक करून बालकाला कह्यात घेतले.