मुंबईतून आणखी एका आतंकवाद्याला अटक

मुंबई पुन्हा एकदा आतंकवादाच्या सावटाखाली !

अटक केलेल्या आतंकवाद्यांवर तात्काळ कठोर कारवाई करणे जनतेला अपेक्षित ! – संपादक

मध्यभागी रिझवान मोमीन

मुंबई – देहली पोलिसांनी देहली, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र येथून ७ आतंकवाद्यांना अटक केल्यानंतर त्यांचे आणखी सहकारी मुंबईमध्ये असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या आतंकवादविरोधी पथकाने मुंबईतून रिझवान मोमीन या आतंकवाद्याला अटक केली आहे.

धारावीत रहाणार्‍या जान मोहम्मद शेख याला देहली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचा ‘हँडलर’ जाकीर हुसेन शेख या आतंकवाद्याला मुंबईतून अटक करण्यात आली होती. शेखच्या चौकशीनंतर रिझवान याला अटक करण्यात आली आहे. जाकीर आणि रिझवान यांचे परदेशी आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. हे दोघेही जान मोहम्मद शेखसाठी काम करत असल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. देहली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अतिरेक्यांनी १९९३ या वर्षी मुंबईमध्ये ज्या प्रकारे बाँबस्फोट केले होते, त्या धर्तीवर बाँबस्फोट करण्याचा कट रचला होता.