६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी हा एक आहे !

२० सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात कु. नंदन मधील अनेक वैशिष्ट्यपूर्ण गुण पाहिले. या लेखात त्याच्यातील प्रेमभाव, इतरांना समजून घेण्याची वृत्ती आणि उत्तम निरीक्षणक्षमता इत्यादी दैवी गुण पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/512476.html

नंदन लहानपणापासून आश्रमात राहिल्यामुळे त्याच्यावर ‘सकारात्मकता, प्रेमभाव, इतरांना साहाय्य करण्याची आणि समजून घेण्याची वृत्ती’, असे सुसंस्कार झाले आहेत. त्याला असे घडतांना पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते आणि ‘ईश्वरी राज्य दूर नाही’, याची निश्चिती वाटते. ही पिढीच प.पू. गुरुदेवांचे ‘ईश्वरी राज्य चालवणार आहे’, हे लक्षात येते.

कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

३. वय ७ ते ९ वर्षे

३ अ. व्यवस्थितपणा : ‘आम्ही घरी जातो, तेव्हा नंदन प्रतिदिन स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालतोच आणि त्याच्या बाबांचेही कपडे नीट घडी घालून कपाटात ठेवतो. त्यामुळे सर्वांना त्याचे पुष्कळ कौतुक वाटते.

३ आ. प्रेमळ आणि समंजस

३ आ १. वयाने लहान असूनही नंदनने आईची प्रेमाने आणि मनापासून सेवा करणे : मी रुग्णाईत असतांना तो मला सर्व प्रकारचे साहाय्य करतो. माझे अंग दुखत असतांना तो रात्री झोपेतून उठून माझे पाय चेपतो. तो कधीही चिडचिड न करता माझी सेवा मनापासून करतो. माझ्याकडून कितीही चुका झाल्या, तरीही तो मला लगेच क्षमा करतो आणि ते विसरतो. तो मला साधनेत पुष्कळ साहाय्य करतो.

३ आ २. घरी स्वयंपाकासाठी नवीन आलेल्या बाईंशी घरातील सर्वांनी रागावून बोलणे; मात्र नंदनने त्यांची प्रेमाने विचारपूस करणे, त्यामुळे त्यांना पुष्कळ आनंद होऊन त्या घरात आनंदाने काम करू लागणे : एकदा काही दिवसांसाठी आमच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी एक नवीन बाई आल्या होत्या. त्या नवीन असल्याने त्यांना आमच्या घरी जुळवून घ्यायला जमत नव्हते. त्यामुळे घरातील सगळे त्यांच्याशी चिडून बोलायचे. तेव्हा नंदन मला म्हणाला, ‘‘तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने बोललात, तर त्यांना चांगले वाटेल आणि त्या छान काम करतील. त्या त्यांच्या घरच्या सर्वांना सोडून इथे आल्या आहेत.’’ तो मला केवळ असे सांगून थांबला नाही, तर तो त्यांच्यापाशी जाऊन प्रेमाने बोलला, ‘‘तुम्ही बर्‍या आहात का ? तुम्हाला काही हवे का ?’’ त्याच्या त्या प्रेमळ बोलण्याने त्या बाई रडायला लागल्या. त्या म्हणाल्या, ‘‘मी घरच्या कठीण परिस्थितीमुळे तुमच्या घरी कामाला आले आहे. आतापर्यंत आयुष्यात माझ्याशी इतके प्रेमाने कुणीही बोलले नाही.’’ नंदनच्या प्रेमळ बोलण्यामुळे त्यांना फार चांगले वाटले. त्यानंतर त्या बाई आमच्या घरी आनंदाने काम करू लागल्या.

३ आ ३. मनात कुणाविषयी पूर्वग्रह न ठेवता सर्वांशी नेहमी प्रेमाने बोलणे : मला आमच्या काही नातेवाइकांचे बोलणे आवडत नाही. त्यामुळे मी त्यांच्याशी बोलायचे टाळते. नंदनलाही त्यांचे बोलणे आवडत नाही; पण तो त्यांच्याशी प्रेमाने बोलतो. तेव्हा ‘मनात कुणाविषयीही पूर्वग्रह न ठेवता साधकत्व टिकवून ठेवण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत’, असे मला जाणवते.

३ इ. उत्तम निरीक्षणक्षमता : नंदन ७ वर्षांचा असतांना मी ध्वनीचित्र चकत्यांच्या (व्हिडिओच्या) संकलनाची सेवा करत होते. तो माझ्या जवळ बसून मी करत असलेली सेवा बघत बसायचा. तेव्हा तो अनेक वेळा माझ्याकडून सेवेत झालेली चूक माझ्या लक्षात आणून द्यायचा. त्यातील मला जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे मी येथे देत आहे.

१. एकदा एक प्रकल्प अंतिम झाला होता आणि मी त्यावरून शेवटची दृष्टी फिरवत होते. तेव्हा त्यात एक गंभीर चूक झाली होती. त्यातील ‘ऑडिअन्स’च्या शॉटमध्ये प्रकाश अल्प होता आणि कार्यक्रमाच्या ‘शॉट’मध्ये प्रकाश व्यवस्थित होता. दोन्ही ठिकाणच्या प्रकाशात असलेला भेद माझ्या लक्षात आला नव्हता. नंदनने ते माझ्या लक्षात आणून दिल्यामुळे मला ती चूक सुधारता आली.

२. एक भजनाचा प्रकल्प करतांना त्यात तबल्याचा आवाज येत होता; पण तिथे बसलेली व्यक्ती तबला वाजवत नव्हती. त्याचे संकलन (एडिटिंग) करतांना ते माझ्या लक्षात आले नव्हते. ती चूकही नंदननेच माझ्या लक्षात आणून दिली.

३. एकदा माझे एक चित्रीकरण चालू होते. तेव्हा नंदन छायाचित्रीकरण कक्षात (स्टुडिओमध्ये) मला भेटायला आला आणि माझ्याकडे पाहून मला म्हणाला, ‘‘आई, प्रकाशयोजना (‘लाईटींग’) ठीक वाटत नाही. तुझ्या तोंडवळ्यावर हिरवी छटा दिसत आहे.’’ मला वाटले, ‘‘माझ्या साडीचा रंग थोडा निळसर असल्याने त्याचा रंग परावर्तीत (रिफ्लेक्शन) होऊन माझ्या तोंडवळ्यावर दिसत असेल. त्यामुळे मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले; पण नंतर उत्तरदायी साधकांनीही हीच सुधारणा करायला सांगितली. ही चूक चित्रीकरण कक्षातील कुणाच्याही लक्षात आली नव्हती.

‘प्रकाशयोजना (लायटिंग), संकलन (एडिटिंग), छायाचित्रकांचे (कॅमेर्‍यांचे) सेटिंग्ज’ यात असणार्‍या त्रुटी नंदनच्या लक्षात येतात. मी संकलनाची सेवा करतांना तो त्या चुका मला सांगतो. त्यामुळे कुठलाही प्रकल्प अंतिम पडताळतांना तो माझ्या समवेत बसल्यावर मला छान वाटते. नंदनची निरीक्षणक्षमता फार चांगली आहे.

३ ई. ‘घरातील लोक कलेचा वापर पैसा आणि प्रसिद्धी यांसाठी करतात’, हे नंदनला ज्ञात असल्याने त्याचा आवाज चांगला असूनही त्याने त्यांच्यासमोर श्लोक किंवा भजने म्हणायचे टाळणे : नंदनचा आवाज फार चांगला आहे. तो भजने, स्तोत्रे किंवा एखादे गाणे म्हणतो, तेव्हा ‘ते ऐकतच रहावे’, असे मला वाटते. याविषयी मी घरी किंवा इतरांना सांगत असेन, तेव्हा तो मला ‘त्यांना सांगू नको’, असे सांगतो. एकदा घरी असतांना मी त्याला विचारले, ‘‘आश्रमात तू किती छान म्हणतोस. इथे का म्हणत नाहीस ?’’ तेव्हा त्याने काही उत्तर दिले नाही. शेवटी मीच त्याला ‘श्लोक म्हणून दाखव’, असे सांगितले; म्हणून त्याने एक श्लोक म्हटला. तेव्हा त्याचे बाबा त्याला म्हणाले, ‘‘तुझा आवाज चांगला आहे. तू संगीत शिक. तू पुष्कळ मोठा होशील आणि पुष्कळ प्रसिद्धी मिळवशील.’’ नंतर नंदन मला म्हणाला, ‘‘पाहिलेस ना ? काहीही झाले की, ते लगेच ‘प्रसिद्धी आणि पैसा’ यांचाच विचार करतात. अध्यात्मात तसे नसते. तू सांगितलेस; म्हणून मी श्लोक म्हटला, नाहीतर मी इथे काही म्हणत नाही. मायेत असेच असते.’’ तेव्हा ‘तो घरी काही का म्हणत नाही ?’, ते माझ्या लक्षात आले.

(‘एवढ्या लहान वयात माया आणि अध्यात्म यांतील भेद लक्षात येऊन त्यानुसार ‘काय करायला हवे अन् काय नको’, याची जाणीव नंदनला असणे कौतुकास्पद आहे.’ – संकलक)

सौ. सौम्या कुदरवळ्ळी

३ उ. वर्तमानकाळात रहाणे : तो कुठल्याही प्रसंगात अडकत नाही आणि मलाही अडकू देत नाही. तो मला सांगतो, ‘‘आई, आता सोडून दे. आपण आनंदात राहूया.’’ तो नेहमी आनंदात असतो आणि वर्तमानकाळात रहातो.

३ ऊ. आसक्ती नसणे : नंदन घरून आश्रमात येतांना त्याची खेळणी किंवा कोणत्याही वस्तू आश्रमात आणत नाही. तो सांगतो, ‘‘आश्रमात मला त्यांची आवश्यकता नाही.’’

३ ए. साधनेची तळमळ

१. नंदनला मी, त्याचे बाबा आणि परिवारातील सर्वच जण फार आवडतात; पण तो कुणामध्येही अडकत नाही. एवढ्या लहान वयात त्याला साधनेचे महत्त्व कळते. त्याच्या मनात ‘जीवनात गुरूंविना कुठलीही गोष्ट महत्त्वाची नाही. जीवनात केवळ साधनाच करायची आहे’, हा दृष्टीकोन अतिशय सुस्पष्ट आहे. हे केवळ आणि केवळ प.पू. गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळेच शक्य आहे.

२. आम्ही घरून आश्रमात आल्यानंतर त्याची एक चूक सांगत असतांना मी त्याला म्हणाले, ‘‘मी तुला आश्रमात आणले आहे. त्यामुळे तुझ्या साधनेचे दायित्व माझ्यावर आहे. तेव्हा तो लगेच मला म्हणाला, ‘‘आश्रमात मी स्वतःहून आलो आहे, तर साधना करण्याचे दायित्वही माझे आहे.’’

३. सत्र करण्यासाठी स्वतःचे कोणते स्वभावदोष घ्यायचे ? ते नंदन स्वतःच निवडतो. त्याला त्यावर दृष्टीकोन घ्यायलाही छान जमते. त्याला स्वयंसूचनेची सत्रे (स्वतःमधील स्वभावदोष न्यून करण्यासाठी मनाला द्यायच्या सूचना) करायला आवडतात.

४. नातेवाइकांना नंदनविषयी जाणवलेली सूत्रे

अ. घरी कुणीही आले, तरी ते नंदनकडे आकर्षित होतात आणि त्याच्याशी बोलायला जातात. ते त्याचे पुष्कळ कौतुक करतात.

आ. एकदा एक नातेवाईक म्हणाले, ‘‘नंदन सर्वांचा मान राखून बोलतो. तो कुणाचेही मन दुखावत नाही. तो एकदम स्थिर आहे. त्याच्या बोलण्यामध्ये पुष्कळ प्रगल्भता जाणवते.’’

इ. दुसरे नातेवाईक म्हणाले, ‘‘बाहेरची मुले सगळ्या वस्तू खराब करतात, घर अव्यवस्थित ठेवतात आणि शीतकपाटातील सगळा खाऊ खाऊन टाकतात; पण नंदन असे काही करत नाही. तो किती निरासक्त आहे. तो घरातील कुठल्याही वस्तूला हात लावत नाही. तो केवळ त्याच्या वस्तूंशीच खेळतो. आश्रमात असे सगळे शिकवतात का ? त्याच्यावर चांगले संस्कार आहेत !’’

५. नंदनच्या आजोबांना नंदनविषयी असलेला सार्थ विश्वास !

आम्ही घरून आश्रमात परत येतांना नंदनचे आजोबा (नंदनच्या वडिलांचे बाबा) मला म्हणाले, ‘‘तू एका हुशार मुलाला जन्म दिला आहेस. मला नंदनची काळजी वाटत नाही; पण माझ्या मुलाची काळजी वाटते. मला वाटते, ‘माझ्या मुलापेक्षाही नंदन हुशार आहे. केवळ नंदनच त्याला सांभाळू शकतो.’’

६. स्वभावदोष आणि अहं

स्पष्टीकरण देणे, राग येणे, संयम नसणे, उतावळेपणा आणि प्रतिमा जपणे.

प.पू. गुरुमाऊलीने नंदनचा पूर्ण भार उचलून मला माझ्या सर्व कर्तव्यांपासून मुक्त केले आहे. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

– सौ. सौम्या वल्लभ कुदरवळ्ळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (६.७.२०२१)                                  (समाप्त)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता