६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी (वय ९ वर्षे) !

१८ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात कु. नंदन ६ वर्षांचा होईपर्यंत जाणवलेली त्याची काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. या भागात त्याच्या आईला जाणवलेले त्याचे वैशिष्ट्यपूर्ण गुण पहाणार आहोत. नंदन लहानपणापासून आश्रमात राहिल्यामुळे त्याच्यावर ‘सकारात्मकता, प्रेमभाव, इतरांना साहाय्य करण्याची आणि समजून घेण्याची वृत्ती’, असे सुसंस्कार झाले आहेत. त्याला असे घडतांना पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते आणि ‘ईश्वरी राज्य दूर नाही’, याची निश्चिती वाटते. ही पिढीच प.पू. गुरुदेवांचे ‘ईश्वरी राज्य चालवणार आहे’, हे लक्षात येते.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/511857.html

कु. नंदन वल्लभ कुदरवळ्ळी

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

२. वय ५ ते ६ वर्षे

२ औ. भाव

२ औ १. संतांविषयी असलेला भाव : परात्पर गुरु पांडे महाराज यांनी त्याच्यासाठी मंत्र दिले होते, ते मंत्र तो ध्यानमंदिरात बसून पूर्ण करतो. सुटीमध्ये घरी जाण्याविषयी मी त्याला विचारल्यावर तो मला म्हणाला, ‘‘मला घरी जायचे नाही. पू. माईंनी (सनातनच्या ७६ व्या संत पू. (श्रीमती) पुतळाबाई (माई) देशमुख, तुळजापूर (धाराशीव) यांनी) सांगितल्याप्रमाणे मला नामजप करायचा आहे.’’ पू. माईंनी नंदनला प्रतिदिन नामजप लिहिण्यास सांगितला आहे. त्याप्रमाणे तो प्रतिदिन नामजप लिहीत आहे.

२ औ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव

२ औ २ अ. प.पू. गुरुदेव आणि नंदन यांचे नाते अनेक जन्मांचे असल्याचे जाणवणे : त्याच्या मनात प.पू. गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे. तो सतत त्यांच्या अनुसंधानात असतो. तो त्यांना अपेक्षित असे घडण्यासाठी प्रयत्नरत असतो. तो खोलीतील त्यांचे छायाचित्र सजवतो. त्यांचे छायाचित्र पाहून आनंदाने हसतो. तो मला वरचेवर म्हणतो, ‘‘आपल्या दोघांची आणि सर्वांची काळजी प.पू. गुरुदेवच घेणार आहेत. ‘प.पू. गुरुदेव आणि नंदन यांचे नाते हे केवळ या जन्माचे नसून अनेक जन्मांचे आहे’, असे मला वाटते. ‘हे नाते तो जणू अनुभवत असतो.’ त्या वेळची त्याची भावावस्था पाहून माझी भावजागृती होते.

२ औ २ आ. खोलीत नंदन समवेत रहाण्यासाठी जे कुणी असतील, त्यांच्याशी नंदनची जवळीक होणे; मात्र त्याला सर्वांत प्रिय परात्पर गुरु डॉ. आठवले असल्याचे त्याने सांगणे : नंदन २ मासांचा असतांनाच मी त्याला घेऊन आश्रमात आले. त्या वेळी माझ्या समवेत रहाणारा माझा भाऊ हरि याच्याशी नंदनची पुष्कळ जवळीक झाली. मामा कामानिमित्त विदेशात गेल्यावर माझी बहीण सौ. संगीता चौधरी आणि त्यानंतर माझी आई आमच्या समवेत रहाण्यासाठी आली. त्या दोघींशीही त्याची जवळीक झाली. त्या गेल्यावर आवश्यकता आणि परिस्थिती यांनुसार खोलीतील साधिकांचे रहाणे पालटत गेले. त्यामुळे अनेक साधिकांचे रहाणे झाले. त्याने ते सर्व प्रसंग स्वीकारले. त्याची खोलीत रहायला येणार्‍या सर्वांशी जवळीक व्हायची. मागील २ ते ३ वर्षांपासून मी घरी (सासरी (भाग्यनगर, (हैद्राबाद, तेलंगाणा)) जात आहे. तिथे तो त्याचे वडील आणि आजी-आजोबा यांच्या समवेतही प्रेमाने रहातो. त्याला त्याचे वडील फार आवडतात, तरी आश्रमात आल्यावर तो त्यांच्यापैकी कुणाचीही एकदाही आठवण काढत नाही. अशा वेळी ‘तो काय विचार करतो ?’, असे मी त्याला विचारले. तेव्हा त्याने मला सांगितले, ‘‘मला सर्वांत अधिक प.पू. गुरुदेवच आवडतात. मला त्यांच्याकडेच रहायचे आहे. मी शाळेत असतांनाही मला त्यांची पुष्कळ आठवण येते.’’

सौ. सौम्या कुदरवळ्ळी

२ क. नंदनच्या अस्तित्वाचा परिणाम

२ क १. नंदनच्या आजोळी आजूबाजूला असणार्‍या सर्व मुलांना नंदनमुळे नामजप करण्याची आणि आश्रम पहाण्याची ओढ लागणे, प्रतिदिन आईच्या घरी येऊन त्या मुलांनी बसून नामजप लिहिणे : एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ म्हणाल्या होत्या, ‘‘नंदन प्रसारात जाईल, तेव्हा सर्व जण म्हणतील, ‘नंदन आला आहे, तर आम्ही चांगले प्रयत्न करणार.’’ या संदर्भात एक उदाहरण माझ्या लक्षात आले. मध्यंतरी एकदा मी माझ्या माहेरी (रायचूर, कर्नाटक) गेले होते. आमच्या घराच्या आजूबाजूला रहाणार्‍या मुलांना नंदन पुष्कळ आवडतो. नंदन त्यांना केवळ एकदाच भेटला होता. ती मुले माझ्या आईला सांगतात, ‘‘नंदनसारखा आम्हालाही नामजप करायचा आहे. रामरक्षा आणि हनुमानचालीसा म्हणायची आहे. आम्हाला त्याला भेटायला आश्रमात जायचे आहे.’’ ती मुले प्रतिदिन वही-लेखणी घेऊन आमच्या घरी बसून नामजपही लिहितात. ‘ती मुलेही सात्त्विक आहेत. त्यामुळे त्यांना साधना लगेच समजली’, ही गोष्टही येथे तेवढीच महत्त्वाची आहे.

२ क २. नंदनच्या सहवासात सकारात्मकता वाढणे : तो लहान असतांना मला वाटायचे, ‘तो केव्हा शाळेत जाईल अन् मी सेवा चालू करीन’; पण आता नंदन सतत अनुसंधानात असतो. आता ‘प्रत्येक विषयाचा योग्य दृष्टीकोन त्याच्या लक्षात येतो’, असे लक्षात येते. त्यामुळे आता मला ‘तो केव्हा शाळेतून येईल अन् मला त्याचा सत्संग मिळेल’, असे वाटते. त्याच्या समवेत असतांना मला भाव जाणवतो आणि आनंद मिळतो. त्याच्या सहवासात माझी सकारात्मकताही वाढते.

प.पू. गुरुमाऊली, ‘नंदन तुमचाच आहे, तुम्हीच त्याला सर्व शिकवत आहात. तुम्ही आम्हा सर्व जिवांना रामनाथीसारख्या चैतन्यमय आश्रमात रहाण्याची संधी देऊन मोठी कृपा केली आहे. तुमचे हे ऋण आम्ही कुठल्याच जन्मात फेडू शकणार नाही. तुम्ही आमच्यासाठी जे करत आहात, ते अवर्णनीय आहे. तुम्हाला अपेक्षित आहे, तसे करण्याची सद्बुद्धी आम्हाला द्या’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’                            (क्रमशः)

– सौ. सौम्या वल्लभ कुदरवळ्ळी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (२.६.२०१९)


‘आईने मला सुधारण्यासाठीच शिक्षा केली असून परात्पर गुरु डॉ. आठवले हे पहात असल्याने रडायला नको’, असा भाव असणारा कु. नंदन कुदरवळ्ळी !

सौ. छाया विवेक नाफडे

‘नंदनचे काही चुकले, तर त्याची आई (सौ. सौम्या कुदरवळ्ळी) त्याला शिक्षा करायची. तो साधारण ४ – ५ वर्षांचा असतांना एकदा त्याच्या आईने त्याला शिक्षा केली होती. त्याचे त्याला वाईट वाटल्याने भोजनकक्षात तो पुष्कळ हुंदके देत होता; परंतु त्याचा आवाज जराही बाहेर येत नव्हता. साधारणपणे त्याच्या वयाची मुले जरा काही झाले, तर मोठ्याने रडून भोजनकक्ष डोक्यावर घेतात. या वयात असे आतल्या आत रडणे मुलांना पुष्कळ कठीण असल्याने मला त्याचे कौतुक वाटले होते. ‘तो असा का रडतो ? त्या वेळी त्याचा काय विचार असतो ?’, याविषयी मी त्याच्या आईशी बोलले. त्या संदर्भात त्याच्या आईने त्याला विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘वाईट वाटल्याने मला रडू येत होते; पण तू मला सुधारण्यासाठीच शिक्षा केली आहेस. तसेच ‘या वेळी प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) माझ्याकडे पहात आहेत. त्यामुळे मी रडायला नको’, याची मला जाणीवही होत होती.’’ – सौ. छाया विवेक नाफडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१२.९.२०२१)


प्रेमळ आणि व्यापक विचार करणारा कु. नंदन कुदरवळ्ळी

सौ. वैशाली मुद्गल

नंदन २ मासांचा असल्यापासून रामनाथी आश्रमातच लहानाचा मोठा झाला आहे. त्यामुळे त्याचे विचार व्यापक झाले आहेत. रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या सौ. वैशाली मुद्गल यांना जाणवलेली त्याची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

१. नंदनला ६ भाषा अवगत असणे

‘कु. नंदनला अनेक भाषा येतात. त्याला एवढ्या लहान वयात मराठी, कन्नड, तेलगु, हिंदी, इंग्रजी आणि कोकणी या ६ भाषा बोलता येतात, हे त्याचे एक वैशिष्ट्य आहे.

२. इतरांना साहाय्य करणे कुणाला काही हवे असेल, तर नंदन त्यांना तत्परतेने साहाय्य करतो. तेव्हा ‘त्याची ती कृती बघतच रहावी’, असे वाटते.

३. इतरांचा विचार करणारा प्रेमळ नंदन !

एकदा नंदन त्याच्या आई समवेत भाग्यनगर (हैद्राबाद) येथे गेला होता. तिकडून रामनाथीला येतांना त्याने आईला विचारले, ‘‘आपण रामनाथी आश्रमात जात आहोत, तर मावशीसाठी (सौ. संगीता चौधरी हिच्यासाठी) काही घेतले आहेस का ?’’ तेव्हा सौम्याताई (सौ. सौम्या कुदरवळ्ळी, नंदनची आई) त्याला म्हणाली, ‘‘हो, खाऊ घेतला आहे.’’ नंदन तिला म्हणाला, ‘‘अगं, मावशीला मानेचा त्रास आहे. त्यासाठी औषधे किंवा मानेला लावण्यासाठी पट्टा घेतलास का ?’’ त्याचे हे बोलणे ऐकून त्याच्या आईची भावजागृती झाली.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांना भावपूर्ण प्रार्थना करणे

एकदा मी नंदनला विचारले, ‘‘तू काय भाव ठेवतोस ? प्रार्थना काय करतोस ?’’ तेव्हा तो मला म्हणाला, ‘‘मी परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांना प्रार्थना करतो की, मला काही येत नाही. तुम्ही माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी सेवा करवून घ्या. माझ्याकडून चुका नको होऊ देत.’’

५. ‘रामनाथी आश्रम हे मोठे कुटुंब असल्याने येथे आनंद मिळतो’, असे नंदनने सांगणे

नंदन घरून आश्रमात आला. तेव्हा मी त्याला विचारले, ‘‘नंदन घरी आनंद मिळाला का ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘तिकडे काही आनंद मिळत नाही; कारण तिथे (घरी) छोटे कुटुंब आहे आणि रामनाथी आश्रम मोठे कुटुंब आहे.’’ त्याचे हे बोलणे ऐकून माझी भावजागृती झाली.’

– सौ. वैशाली मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (१२.८.२०२१)