वायंगणी (मालवण) येथील वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी यांचा ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ देऊन गौरव

वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी

मालवण – तालुक्यातील वायंगणी येथील वेदपाठशाळेचे वेदमूर्ती दत्तात्रय महादेव मुरवणे गुरुजी यांना देशातील महत्त्वाचा समजला जाणारा महाराष्ट्र शासनाचा  ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.

संस्कृत भाषेचा प्रसार, प्रचार, संशोधन, प्रकाशन, अध्ययन, अध्यापन आणि संस्कृतविषयक इतर उल्लेखनीय कामगिरी केल्याविषयी हे पुरस्कार दिले जातात. वर्ष २०१८ ते २०२० या वर्षांतील पुरस्कारांचे वितरण नुकतेच करण्यात आले. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नागपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात वेदमूर्ती मुरवणे गुरुजी यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

वेदमूर्ती मुरवणे गुरुजी यांना वर्ष २०१८ साठी हा पुरस्कार देण्यात आला. २५ सहस्र रुपये रोख, शाल, श्रीफळ, मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वेदमूर्ती मुरवणे गुरुजी गेली अनेक वर्षे वायंगणी येथे गुरुकुल पद्धतीने संस्कृतचे अध्यापन करत आहेत.

‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कारा’च्या अंतर्गत ‘प्राचीन संस्कृत पंडित पुरस्कार’ पं. कृष्णशास्त्री जोशी, श्रीहरि शिवराम धायगुडे आणि पं. राजेश्वर शिवशास्त्री देशमुख यांना, तर ‘वेदमूर्ती पुरस्कार’ वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे, रवींद्र दत्तात्रय पैठणे आणि पं. देशिक नारायण कस्तुरे यांना देण्यात आला.

वेदमूर्ती मुरवणे गुरुजी यांचा वायंगणी येथे सत्कार

पुरस्कार प्राप्त झाल्याविषयी वायंगणीचे माजी उपसरपंच हनुमंत गणेश प्रभु, निवृत्त केंद्रप्रमुख लक्ष्मण गणेश प्रभु आणि प्रभु कुटुंबीय यांच्याकडून वेदमूर्ती मुरवणे गुरुजी यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.