कॅसिनो आणि ‘नाईट क्लब’ २० सप्टेंबरपासून ५० टक्के क्षमतेने चालू करा ! – कोरोनासंबंधी कृती दलाची शासनाला शिफारस

ग्राहक आणि कर्मचारी यांचे शंभर टक्के लसीकरण अत्यावश्यक

पणजी, १८ सप्टेंबर (वार्ता.) – तरंगते कॅसिनो, ‘नाईट क्लब’ यांसह आर्थिक उलाढालीशी निगडित सर्व व्यवसाय २० सप्टेंबरपासून चालू करण्याची शिफारस राज्यातील कोरोनासंबंधी कृती दलाने राज्यशासनाला केली आहे.

याविषयी कृती दल समितीचे सदस्य डॉ. शेखर साळकर म्हणाले, ‘‘राज्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याने समितीने शासनाला आर्थिक उलाढालीसंबंधी सर्व व्यवसाय चालू करण्याची शिफारस केली आहे. कॅसिनो, ‘नाईट क्लब’, पार्ट्या आदी ५० टक्के क्षमतेने आणि कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करून चालू कराव्यात. या ठिकाणी भेट देणारे ग्राहक आणि तेथील कर्मचारी यांचे शंभर टक्के लसीकरण (कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेणे) होणे अत्यावश्यक आहे.’’

इयत्ता ९ वी ते १२ वी प्रत्यक्ष वर्ग पुढील मासात चालू होण्याची शक्यता

विद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालये यांचे प्रत्यक्ष वर्ग पुढील मासापासून प्रारंभ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याविषयी कृती दल समितीचे सदस्य डॉ. शेखर साळकर म्हणाले, ‘‘कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याने ४ ऑक्टोबरपासून इयत्ता ९ वीपासून १२ वी पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग चालू होण्याची शक्यता आहे. विद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यासाठी दिनांक निश्चित करण्यासाठी कृती दलाची २४ सप्टेंबर या दिवशी एक बैठक होणार आहे. कोरोनाविषयक चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण २.५ टक्क्यांहून अल्प असल्याने कृती दलाने इयत्ता ९ वी ते १२ वीचे प्रत्यक्ष वर्ग चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण ५ टक्क्यांहून अधिक असल्यासच ती एक चिंतेची गोष्ट होऊ शकते आणि असे झाल्यास कृती दल आता केलेल्या शिफारसीवर पुनर्विचार करणार आहे.’’

कॅसिनो, मसाज पार्लर, स्पा आणि ‘रिव्हर क्रूझ’ २० सप्टेंबरपासून चालू होणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कॅसिनो, मसाज पार्लर, स्पा आणि ‘रिव्हर क्रूझ’ यांना २० सप्टेंबरपासून निम्म्या क्षमतेने चालू केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. कोरोनासंबंधी कृती दलासमवेतच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संगीत रजनी, संगीताचे कार्यक्रम आणि नाईट क्लब यांना अद्याप अनुमती देण्यात आलेली नाही, असे मुख्ममंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले.