अशा शाब्दिक फटकार्यांचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. त्याला समजेल अशाच भाषेत भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक ! – संपादक
न्यूयॉर्क (अमेरिका) – पाक संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या आतंकवाद्यांना पाठिंबा देणे, त्यांना प्रशिक्षण देणे, तसेच आर्थिक साहाय्य आणि शस्त्रे देत आला आहे. हे पाकचे धोरण आहे. त्यासाठी तो अपकीर्त आहे. अनेक संस्थाही पाककडून अशा प्रकारचे आतंकवाद्यांना करण्यात येणार्या साहाय्यावरून चिंतेत आहेत. पाक संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या व्यासपिठाचा वापर त्याच्या खोट्या नीतीचा प्रचार करण्यासाठी करत आला आहे. ती आता त्याची सवय झाली आहे, अशा शब्दांत भारताने पाकला या परिषदेच्या ४८ व्या सत्रामध्ये फटकारले. या वेळी भारताने इस्लामी देशांची संघटना ‘ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (ओ.आय.सी.) हिलाही फटकारले आहे. ‘ओ.आय.सी. या संघटनेला जम्मू-काश्मीरविषयी बोलण्याचा कोणताही अधिकार नाही; कारण जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे’, असे भारताने स्पष्टपणे सांगितले.