भारताच्या वर्ष १९७१ च्या युद्धातील विजयाच्या सुवर्ण वर्षानिमित्त फोंडा येथील क्रांती मैदानात भारतीय सेनेकडून आज कार्यक्रम

फोंडा, १४ सप्टेंबर (वार्ता.) – वर्ष १९७१ मध्ये भारताने पाकवर मिळवलेल्या विजयाचा ५० वा वर्धापनदिन १५ सप्टेंबर २०२१ या दिवशी भारतीय सेनेकडून फोंडा येथील क्रांती मैदानात साजरा करण्यात येणार आहे. वर्ष १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील विजयाच्या ५० व्या वर्धापनदिनी स्वर्णिम विजय वर्षाच्या (सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या) विजयाची ज्योत १५ सप्टेंबर २०२१ या दिवशी फोंडा येथे पोचेल.

कुर्टी, फोंडा येथील ६ टेक्निकल ट्रेनिंग रेजिमेंट (६ टीटीआर्) कॅम्पमध्ये कमांडर ऑफिसर मानवेंद्र नागाईच प्रसिद्धीमाध्यमांना म्हणाले, ‘‘वर्ष १९७१ मधील युद्धाच्या विजयाची आठवण म्हणून भारतीय सेना क्रांती मैदान फोंडा, येथे एक मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ४ दिशांना ४ विजय ज्योती पाठवल्या आहेत. ८ सप्टेंबर या दिवशी पश्चिम मार्गाने गोव्यात एक ज्योत पोचली आणि १५ सप्टेंबर या दिवशी ती ज्योत बांबोळी येथून फोंडा येथील क्रांती मैदानात पोचणार आहे. या ज्योतीचे सकाळी ९ वाजता फर्मागुडी येथे स्वागत करण्यात येईल आणि त्यानंतर ९.४० वाजता ती ज्योत क्रांती मैदानात नेण्यात येईल. या ज्योतीचे खेळाडू, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते फर्मागुडी ते फोंडा क्रांती मैदान या मार्गावर स्वागत करू शकतात. कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे हे सैन्यातील अधिकार्‍यांसह या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. या कार्यक्रमात वीरगती प्राप्त झालेल्या विरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल आणि युद्धात योगदान देणार्‍या सैनिकांची माहिती जनतेला देण्यात येईल.’’ कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून हा कार्यक्रम जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. सैनिक या कार्यक्रमाच्या आयोजनात व्यस्त आहेत. क्रांती मैदानाच्या प्रवेशद्वारावर वर्ष १९७१ च्या युद्धाशी संबंधित विविध छायाचित्रे आणि भीत्तीपत्रके प्रदर्शित करण्यात आली आहेत.