|
नवी देहली – एका अत्यंत सहिष्णु आणि शांतीपूर्ण समाजाचा विरोध करण्यासाठी १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या परिषदेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. त्याला जगभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना वैध मार्गाने विरोध करत असतांना ब्रिटिश दैनिक ‘द गार्डियन’ने मात्र त्यांच्यावर बिनबुडाचे आणि निराधार आरोप केले आहेत. या वृत्तपत्राने त्याच्या वृत्त संकेतस्थळावर प्रसारित केलेल्या बातमीत म्हटले आहे की, हिंदुत्वनिष्ठ संघटना सदर परिषदेचे आयोजक आणि वक्ते यांना ठार मारण्याची धमकी देत आहेत. या समवेतच यात सहभागी होणार्या महिला वक्त्यांचे लैंगिक शोषण, तसेच त्यांच्या कुटुंबांच्या विरोधात हिंसा करण्याची भाषा केली जात आहे. महिला वक्त्यांना खालच्या थरावर जाऊन विरोध करण्यात येत आहे. ‘गार्डियन’कडून हिंदुत्वनिष्ठांवर आरोप केले जात असतांना त्याला कोणता अधिकृत पुरावा (उदा. एखादे विरोधी ट्वीट अथवा फेसबूक पोस्ट अथवा संगणकीय पत्र आदी) जोडण्यात आलेले नाही.
Death threats sent to participants of US conference on Hindu nationalism https://t.co/D2h9GpIy7j
— Guardian US (@GuardianUS) September 9, 2021
१. सदर वृत्तात ‘द गार्डियन’ने पुढे म्हटले आहे की, हिंदु जनजागृती समिती नावाच्या भारतातील संघटनेने या परिषदेला जोरदार विरोध केला असून समितीने भारताच्या केंद्रीय गृहमंत्र्यांना परिषदेत सहभागी होणार्या वक्त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. (हिंदु धर्मरक्षणार्थ कार्यरत हिंदु जनजागृती समितीच्या व्यापक कार्याला मिळालेली ही पोचपावतीच आहे, असेच यातून म्हणता येईल ! – संपादक)
२. वृत्तात पुढे म्हटले आहे की, हिंदु जनजागृती समितीसमवेतच अमेरिकेतील ‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’ आणि ‘कोएलिशन ऑफ हिंदूज इन नॉर्थ अमेरिका’ या संघटनांनीही या परिषदेला विरोध केला आहे. हिंदु जनजागृती समितीचा उल्लेख करतांना ‘गार्डियन’ने ‘विविध पुरो(अधो)गाम्यांच्या हत्यांचा आरोप असलेली समिती’, अशा प्रकारे केला आहे. (हिंदु जनजागृती समितीचे कधीच कोणत्याही हिंसक कारवायांमध्ये नाव आलेले नसतांना आणि समितीकडून प्रत्येक मोहीम ही वैध मार्गाने केली जात असतांना तिच्यावर निराधार आरोप करणार्या दैनिक ‘गार्डियन’चा निषेध ! – संपादक)
३. अमेरिकेतील सँटा क्लारा विद्यापिठाचे रोहित चोप्रा हे या परिषदेच्या आयोजकांपैकी एक आहेत. त्यांनी हिंदूंकडून होत असलेल्या विरोधाच्या संदर्भात केलेले वक्तव्य या वृत्तात प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच परिषदेला संबोधित करणार्या अमेरिकेतील न्यू जर्सी येथील विद्यापिठात शिकवणार्या हिंदुद्वेषी प्राध्यापिका ऑड्री ट्रश्का यांच्या विधानालाही या वृत्तात जागा देण्यात आली आहे; परंतु हिंदुत्वनिष्ठ संघटनांची भूमिका मांडण्याची साधी तसदीही ‘द गार्डियन’ने घेतलेली नाही. (पत्रकारितेतील साधा नियमही न पाळू शकणार्या ‘द गार्डियन’चा हिंदुद्वेष जाणा ! हिंदूंनी या वृत्तपत्राला योग्य शब्दांत आणि वैध मार्गाने संघटितपणे विरोध करणे आवश्यक आहे ! – संपादक)
४. या वृत्तात म्हटल्यानुसार हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विविध विद्यापिठांना सहस्रावधी संगणकीय पत्रे पाठवल्याने विद्यापिठांचे सर्व्हर नादुरुस्त झाले आहेत. (यातून सहिष्णु हिंदूंचा रोष लक्षात येतो. यावर गार्डियन काहीच बोलत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक)