-
पुजार्यांना घरोघरी जाऊन पूजा करण्यास घातला होता प्रतिबंध
-
पुजार्यांकडून तीव्र विरोध लवकरच नव्याने नियमावली प्रसिद्ध करणार
पणजी, ७ सप्टेंबर (वार्ता.) – श्री गणेशचतुर्थीसाठी राज्यशासनाने आधी नियमावली जारी केली आणि नंतर त्यातील काही सूत्रांना विरोध झाल्यावर ती स्थगित केल्याचे वृत्त आहे. महसूल खात्याचे सचिव संजय कुमार यांनी जारी केलेली नियमावली स्थगित केल्याची माहिती संबंधित सर्व अधिकार्यांना दिली आहे, तसेच लवकरच नव्याने नियमावली प्रसिद्ध करणार असल्याचे म्हटले आहे.
पुढीलप्रमाणे होती राज्यशासनाने पूर्वी प्रसिद्ध केलेली नियमावली !
१. चित्रशाळा, बाजार आदी ठिकाणी गर्दी करू नये आणि सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाचे पालन करावे. चित्रशाळेने शक्य झाल्यास श्री गणेशमूर्ती घरपोच द्यावी. मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांनी चित्रशाळांना भेट देऊ नये. बाजारात गर्दी होणार नाही, यावर स्थानिक स्वायत्त संस्था आणि पोलीस यांनी देखरेख ठेवावी.
२. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आरती, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम ‘ऑनलाईन’ स्वरूपात करण्यास प्राधान्य द्यावे. यासाठी सामाजिक माध्यमांचा वापर करावा. मंडळांनी गर्दी खेचणारे फलक अथवा विज्ञापने प्रसिद्ध करू नयेत. याउलट मंडळांनी आरोग्यविषयक सूत्रांवर अधिकाधिक प्रचार करावा.
३. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याऐवजी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन करावे. कोरोना, डेंग्यू, मलेरिया आदी रोगांच्या प्रतिबंधाविषयी लोकांमध्ये जागृती करावी.
४. श्री गणेशमूर्ती विसर्जन कार्यक्रमाचे वेळापत्रक स्थानिक स्वायत्त संस्थांनी निश्चित करावे आणि याची माहिती सर्व भाविकांपर्यंत पोचवावी. मूर्तीच्या विसर्जनाची वेळ सायंकाळी
५ ते रात्री १० अशी ठेवावी. मूर्ती विसर्जनासाठी नेणार्या वाहनात ५ हून अधिक भाविकांना अनुमती देऊ नये.
५. प्रतिबंधात्मक क्षेत्रात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास मनाई असून तेथे रहाणार्या लोकांनी गणेशोत्सव वैयक्तिक स्तरावर साजरा करावा.
६. भाविकांनी श्री गणेशमूर्तीचे घरीच विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावे आणि असे शक्य न झाल्यास मूर्तीचे विसर्जन जवळच्या विसर्जन ठिकाणी करावे. विसर्जन मिरवणूक काढण्यास मनाई आहे.
७. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करून फटाक्यांची आतषबाजी करू नये. ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग होऊन बरे झालेल्या रुग्णांना त्याचा त्रास होऊ शकतो.
८.प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री करण्यास राज्यात बंदी आहे.
ब्राह्मणांना पूजा करण्यास बंदी घालणार्या नियमाचा निषेध
गोवा शासनाने श्री गणेशचतुर्थीच्या वेळी ब्राह्मणांकडून पूजा करण्यास घातलेल्या बंदीचा मी जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया मडकई येथील पुरोहित श्री. गौरव घैसास यांनी शासनाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून व्यक्त केली होती.