करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

जातीवाचक शिवीगाळ आणि वाहनात बंदूक आढळल्याचे प्रकरण

करुणा शर्मा

बीड – जातीवाचक शिवीगाळ आणि वाहनात बंदूक आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर त्यांच्या वाहनचालकाला २ दिवसांची पोलीस कोठडी अंबेजोगाई न्यायालयाने सुनावली आहे. करुणा शर्मा या ५ सप्टेंबर या दिवशी परळी येथे आल्या होत्या. त्या परळी येथे येणार असल्याने येथे धनंजय मुंडे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्या वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर काही महिलांसमवेत त्यांचा वाद झाला, तर ‘त्यांचा चालक अरुण मोरे याने त्याच्याकडील चाकूने जिवे मारण्याच्या उद्देशाने वार केला’, अशी तक्रार विशाखा घाटगे या महिलेने पोलिसांत केली होती. या तक्रारीवरून करुणा शर्मा आणि अरुण मोरे यांच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.

१. ‘माझ्यासमवेत जे घडले ते परळी येथे येऊन पत्रकार परिषद घेऊन सांगणार असल्याचे करुणा शर्मा यांनी ३ दिवसांपूर्वी ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून घोषित केले होते. परळी येथे आल्यानंतर करुणा शर्मा यांच्या वाहनाची पोलिसांनी पडताळणी केली असता वाहनामध्ये विनापरवाना १ बंदूक आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.

२. करुणा शर्मा आणि अरुण मोरे यांनी चाकूने वार केल्याने महिला घायाळ झाली होती. ही जखम मोठी असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिल्याने ३०७ कलम अंतर्गत गुन्हा नोंद केल्याचे साहाय्यक पोलीस अधीक्षक आर्. राजा यांनी सांगितले, तर दुसरीकडे स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता भास्कर खैरे यांनी ‘आम्ही असे कुठलेही प्रमाणपत्र दिले नाही, रुग्ण सध्या उपचाराखाली आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते’, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांच्या भूमीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

३. करुणा शर्मा यांच्यासमवेत माझे वर्ष २००३ पासून परस्पर सहमतीने संबंध आहेत, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये ‘फेसबूक पोस्ट’च्या माध्यमातून दिली होती.

४. या प्रकरणी भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे की, करुणा शर्मांची गाडी उघडून त्यात एक व्यक्ती काहीतरी ठेवतांना स्पष्ट दिसत आहे. काय चाललंय महाराष्ट्रात ? न्याय मागायला आलेल्या महिलेला ही वागणूक मिळते, चुकीच्या केसमध्ये अटक करण्यात येते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

५. या प्रकरणानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी नाव न घेता ‘चुकीचे लोक शक्तीशाली असल्यामुळे अन्याय होतो असे नाही. पराक्रमी हात बांधून बसतात म्हणून होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कुणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये. चुकीच्या व्यक्तीच्या हातात सत्ता जाऊ नये (Wrong President Should Not Be Set), ही काळाची आवश्यकता आहे. परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे राज्याची’, असे ट्वीट करत टीका केली आहे.

जिथे अन्याय तिथे भाजप उभा रहाणार ! – राजेंद्र मस्के, जिल्हाध्यक्ष, भाजप

करुणा शर्मा प्रकरणात सत्तेचा दुरुयोग, पोलिसांची भूमिका संशयास्पद, गाडीत शस्त्र कुणी ठेवले, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. जिथे अन्याय तिथे भाजप उभा रहाणार. करुणा शर्मा प्रकरण हे कौटुंबिक नसून आता ते सार्वजनिक झाले आहे. एखादी महिला शस्त्राने आक्रमण कसे करेल. करुणा शर्मा यांनी न्यायालयीन साहाय्य मागितल्यास त्यांना साहाय्य करणार असल्याचे येथील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सांगितले.