स्वीकारण्याची वृत्ती असलेला आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित करणारा सनातन पुरोहित पाठशाळेतील कु. मुकुल प्रभु (वय १० वर्षे) !

आषाढ कृष्ण पक्ष अष्टमी (३१.७.२०२१) या दिवशी सनातन पुरोहित पाठशाळेत शिक्षण घेणारा कु. मुकुल प्रभु (वय १० वर्षे) याचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्याच्या आईने मुकुलमध्ये होत असलेले पालट आणि त्याच्याविषयी सुचलेली कविता पुढे दिली आहे.

कु. मुकुल प्रभु

१. शालेय शिक्षण घेण्यासह सनातन पुरोहित पाठशाळेत जाणे

‘डिसेंबर २०२० पासून मुकुल रामनाथी आश्रमातील  सनातन पुरोहित पाठशाळेत जात आहे. तेथे त्याच्यावर गुरुकुलाप्रमाणे संस्कार होत आहेत. त्याचे पाठांतर आणि उच्चार चांगले आहेत. पाठशाळेत जाऊ लागल्यापासून देवाने त्याच्या जीवनाला आध्यात्मिक कलाटणी दिली. तो शालेय शिक्षणही घेत आहे.

२. मुकुलचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न चालू होणे आणि त्यामुळे ‘त्याच्या साधनेला खर्‍या अर्थाने आरंभ झाला’, असे वाटणे

पाठशाळेत जाऊ लागल्यावर आरंभी मुकुलला स्वतःच्या स्वभावदोषांवर मात करणे कठीण जायचे. मी त्याला पाठशाळेचे महत्त्व समजावून सांगितले. तेव्हा त्याला त्याच्या अयोग्य विचारांची जाणीव झाली. आता तो मनापासून प्रयत्न करत आहे. तो दैनंदिनी लिहिणे, स्वभावदोष निर्मूलनाच्या अंतर्गत सारणी लिखाण करणे, स्वयंसूचनांची सत्रे करणे आदी प्रयत्न नियमित करत आहे. त्यामुळे ‘आता त्याच्या साधनेला खर्‍या अर्थाने आरंभ झाला’, असे मला वाटत आहे.

सौ. नेहा प्रभु

३. मुकुलमध्ये जाणवत असलेले पालट

अ. जून २०२१ मध्ये त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून दिल्यावर त्याने त्या प्रामाणिकपणे स्वीकारल्या. यातून त्याचा स्वीकारण्याचा भाग वाढत असल्याचे माझ्या लक्षात आले.

आ. त्याचा पुरोहित साधकांविषयी भाव आणि प्रेम वाढत आहे.

४. ‘मुकुल शांत आणि समंजस झाला आहे’, असे साधक सांगतात.

५. संतांनी मुकुलविषयी काढलेले उद्गार !

अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘मुकुल पाठशाळेत जायला लागल्यापासून त्याच्या तोंडवळ्यात पालट झाला आहे’, असे सांगितले.

आ. पू. संदीप आळशी म्हणाले, ‘‘तो लहान वयात पुरोहितांच्या समवेत राहून शिकत आहे, हे चांगले आहे.’’

६. मुकुलमध्ये असलेले स्वभावदोष आणि अहं

मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे, हट्टीपणा, राग येणे, निष्कर्ष काढणे आणि पूर्वग्रह असणे.’

– सौ. नेहा प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२१)


हे गुरुमाऊली, ‘मुकुल’ नावाचे फूल, झाले तुमच्या चरणी अर्पण ।

हे गुरुमाऊली, ‘मुकुल’ नावाचे फूल ।
झाले तुमच्या चरणी अर्पण ।। १ ।।

स्वभावदोष आणि अहं यांवर मात करतो नामजपाने ।
भक्तीभाव वाढवतो गुरुकृपेने ।। २ ।।

देवा, तूच घडव त्याला तुला अपेक्षित असे ।
हिंदु राष्ट्रासाठी आणि रामराज्यासाठी ।। ३ ।।

त्याचे जीवन अर्पण व्हावे गुरुकार्यासाठी ।
‘त्याचा जन्म सार्थकी लागो’,
हीच प्रार्थना तुझ्या चरणी ।। ४ ।।

‘परात्पर गुरु डॉक्टर, केवळ तुमच्या कृपेमुळेच मुकुलला साधनेची दिशा मिळाली. हे गुरुमाऊली, तुमच्या चरणी शरणागतभावाने कृतज्ञता, कृतज्ञता आणि केवळ कृतज्ञता !’

– सौ. नेहा प्रभु (२१.७.२०२१)


अवघड कोडीही एकाग्रतेने सोडवणार्‍या कु. मुकुल प्रभु याचे बुद्धीचातुर्य !

श्री. कोंडिबा जाधव

‘रामनाथी आश्रमातील सनातन पुरोहित पाठशाळेत शिकणारा बालसाधक कु. मुकुल प्रभु पुष्कळ बुद्धीमान आहे. माझ्याकडे काही बौद्धिक कोड्यांचे संच आहेत. ती कोडी सोडवल्याने मुलांची बौद्धिक क्षमता विकसित होऊन एखाद्या अडचणीच्या प्रसंगी त्यांना अनेक उपाय सुचतात आणि अडचणींतून बाहेर पडण्याचा सराव होतो, म्हणजे त्यांच्या बुद्धीचा कस लागतो. मुकुल पाठशाळेत जायला लागण्यापूर्वी त्याच्या खेळण्याच्या वेळेत मी त्याला अगदी सोप्या कोड्यांपासून अनेक अवघड कोडी सोडवायला दिली होती. ती त्याने मन एकाग्र करून सोडवली. कोडी सोडवतांना ‘कंटाळा आला, थकवा आला, जमत नाही’, असे तो कधीही म्हणाला नाही. तो नेहमी माझ्याकडे अवघड कोडे सोडवण्यास मागायचा. ‘त्याच्या वयाच्या मानाने त्याची बौद्धिक क्षमता पुष्कळ अधिक आहे’, असे मला जाणवले. त्याने अवघड कोडी सोडवल्यानंतर त्याच्या तोंडवळ्यावरील आनंद बघण्यासारखा असायचा.’

– श्री. कोंडिबा जाधव (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०२१)