केंद्र सरकारचे पथक केरळसाठी मार्गस्थ
कोळिकोड (केरळ) – केरळमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक असतांनाच आता निपाह विषाणूची लागण झाल्याने एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. केरळच्या आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने निपाह विषाणूचा संशयित रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच ४ सप्टेंबरला रात्री उशिरा आरोग्य अधिकार्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. केंद्र सरकारकडूनही याला दुजोरा देण्यात आला असून केंद्राचेही आरोग्य पथक केरळला रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे. निपाह विषाणूच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असे सर्व साहाय्य राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला करण्यात येईल, असे केंद्र सरकारकडून घोषित करण्यात आले आहे.
12-year-old boy dies of #Nipahvirus infection in #Kozhikode, central team rushed to #Keralahttps://t.co/oqZxEGyR21
— Zee News English (@ZeeNewsEnglish) September 5, 2021
कोळिकोडमध्येच १९ मे २०१८ या दिवशी निपाह विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर १ जून २०१८ पर्यंत राज्यात निपाहच्या संसर्गामुळे १७ जणांचा मृत्यू झाला होता आणि १८ जणांना लागण झाल्याची माहिती समोर आली होती.
‘निपाह विषाणू’चा उगम आणि संसर्ग !निपाह विषाणूला ‘बार्किंग पिग सिंड्रोम’ असे नावही असून हा वर्ष १९९९ मध्ये प्रथम मलेशिया आणि सिंगापूर या देशांमध्ये डुक्कर अन् त्यांच्यामुळे मनुष्याला जडला. तेथून तो अनेक देशांमध्ये पसरला. त्या काळी या विषाणूच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी १० लाख डुक्करांना ठार करण्यात आले होते. याचा संसर्ग सध्या आशिया खंडातील काही क्षेत्रांमध्ये होतो. डुक्कर अथवा वटवाघूळ यांच्यामुळे या विषाणूची माणसाला लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे एखाद्या ठिकाणी या विषाणूचा संसर्ग वाढला असेल, तर तेथे आजारी असलेल्या डुक्करांपासून माणसाने आपला बचाव करणे आवश्यक असते. तसेच एखाद्या आजारी वटवाघळाचा खजुराच्या झाडावर असलेल्या त्याच्या रसाशी संपर्क आला असेल, तर माणसाने तो रस पिणे टाळावे. |