६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. देवदत्त कुलकर्णी आणि त्यांची मुलगी कु. तृप्ती कुलकर्णी यांना लाभलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा चैतन्यदायी सत्संग !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. देवदत्त कुलकर्णी (वय ७९ वर्षे) आणि त्यांची मुलगी कु. तृप्ती कुलकर्णी यांना लाभलेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा चैतन्यदायी सत्संग !

श्रावण कृष्ण पक्ष त्रयोदशी (५.९.२०२१) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. देवदत्त कुलकर्णी यांचा ७९ वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना आणि त्यांची मुलगी कु. तृप्ती यांना एकदा लाभलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगातील सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. देवदत्त कुलकर्णी

श्री. देवदत्त कुलकर्णी यांना ७९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

‘एकदा मला आणि माझे वडील श्री. देवदत्त कुलकर्णी यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा आमच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.

कु. तृप्ती कुलकर्णी

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री. कुलकर्णी यांच्या गुणवैशिष्ट्यांवरून ६० टक्के आणि त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे महत्त्व सांगणे

१ अ. श्री. कुलकर्णी यांचे विचार आध्यात्मिक स्तरावरील असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले (कु. तृप्ती यांना उद्देशून) : अरे, तू आलीस वाटतं आणि बाबापण आले !

(तेव्हा बाबांनी होकारार्थी मान हालवली.)

परात्पर गुरु डॉ. आठवले : बाबांना ऐकू यायला लागलं वाटतं; कारण मी विचारल्यावर त्यांनी होकारार्थी मान हालवली.

कु. तृप्ती कुलकर्णी : हो. आता त्यांना ऐकू येतं. त्यांच्यासाठी नवीन श्रवणयंत्र आणले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : नवीन श्रवणयंत्र आणले ना ?

श्री. देवदत्त कुलकर्णी : हो; पण देव देतो, तेच सत्य. बाकी सगळे असत्य. (‘देवाने दिलेले कान सत्य आहेत आणि श्रवणयंत्र मानवनिर्मित असल्याने ते असत्य आहे’, असे बाबांना म्हणायचे होते.’ – कु. तृप्ती)

परात्पर गुरु डॉ. आठवले : बघ, किती चांगले विचार आहेत ! तुमची आध्यात्मिक पातळी किती ?

श्री. देवदत्त कुलकर्णी : पातळीचे काय ? ६२ टक्के आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हं; म्हणूनच असे विचार आहेत.

१ आ. श्री. कुलकर्णी यांना ‘आश्रम सोडून कुठे जावे’, असे न वाटणे आणि परात्पर गुरुदेवांनी त्यांना ६२ टक्के आध्यात्मिक पातळीला माया नकोच वाटते, असे सांगणे

श्री. देवदत्त कुलकर्णी : आता मला ‘आश्रम सोडून कुठे जावे’, असे वाटत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आता ६२ टक्के पातळी आहे ना ! या पातळीला माया नकोच वाटते. आश्रम आणि सेवा यांतच आनंद जाणवतो. प्रगतीचे लक्षण आहे. तृप्तीची काळजी नाही ना वाटत ?

बाबा : नाही. देव आहे ना !

परात्पर गुरु डॉ. आठवले : किती चांगले उत्तर आहे !

१ इ. श्री. कुलकर्णी यांनी ‘मी झोपेतही नामजप अन् स्वयंसूचनांची सत्रे करतो’, असे सांगणे

श्री. देवदत्त कुलकर्णी : मी सतत सत्मध्ये रहाण्याचा प्रयत्न करतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले : म्हणजे काय करता ?

श्री. देवदत्त कुलकर्णी : मी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील अनुभूती आणि लेख वाचतो. भावजागृतीसाठी प्रयत्न आणि नामजप करतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले : खूप छान !

श्री. देवदत्त कुलकर्णी : मी झोपेतही नामजप आणि स्वयंसूचनांची सत्रे करतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले : बघ ! यावरून कळतं की, आपण कोणत्या गुणांमुळे यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित केली. यावरून ‘एखाद्या व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ६० टक्के किंवा त्यांहून अधिक असल्यास त्या व्यक्तीत कोणते गुण असतात ?’, हे कळते.

२. श्री. कुलकर्णी यांनी ‘मी आणखी कसे प्रयत्न करायला हवेत ?’, असे विचारल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘हेच प्रयत्न चालू ठेवा’, असे सांगणे

श्री. देवदत्त कुलकर्णी : मी आणखी कसे प्रयत्न करायला हवेत ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : ६० टक्क्यांपासून ७० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत साधकाने आहे तेच प्रयत्न आणि सेवा चालू ठेवायच्या असतात. आता तुम्ही जे करता, ते योग्य आहे. ७० टक्के आध्यात्मिक पातळीनंतर इतरांसाठी नामजपादी उपाय करण्याची क्षमता निर्माण होते.

३. परात्पर गुरु डॉक्टरांनी श्री. कुलकर्णी यांना ‘तुमच्या पत्नीत अनेक गुण होते; म्हणून त्यांच्या जीवनावर ३ ग्रंथ प्रसिद्ध केले’, असे सांगणे

श्री. देवदत्त कुलकर्णी : गेल्या ५४ वर्षांत मी सुजाताला (पत्नीला) ओळखू शकलो नाही; पण तुम्ही तिला ओळखलंत आणि तुम्ही तिच्या जीवनावर ३ ग्रंथ प्रसिद्ध केले. तिला अजरामर केलेत. (‘श्री. देवदत्त कुलकर्णी यांच्या पत्नी सौ. सुजाता कुलकर्णी यांच्या निधनानंतर ‘त्यांचे खडतर जीवन, त्यांचे शेवटचे आजारपण आणि त्यांचा मृत्यू’ यांसंदर्भातील ३ ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आले. मृत्यूनंतर त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.’ – संकलक)

परात्पर गुरु डॉ. आठवले : असं नसतं काही. मुलगा-मुलगी लग्न करतात आणि नंतर भांडतात. मग तेव्हा ते ‘आम्ही एकमेकांना ओळखलं नाही’, असे म्हणणार का ? ते देवाण-घेवाण हिशोब असतात.

श्री. देवदत्त कुलकर्णी : तिचे ३ ग्रंथ छापण्यासारखे तिने काय केले ? तिच्यासारखे साधना करणारे आणि तिच्यासारखे खडतर जीवन असणारे कितीतरी साधक आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : ते ग्रंथ वाचा, म्हणजे त्याविषयी कळेल. त्यांच्यात अनेक गुण आहेत; म्हणून ग्रंथ छापले. तृप्तीला जन्मतः तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. अशांसह जीवन जगणे कठीण असते; पण त्यांनी ते साध्य केले.

४. श्री. कुलकर्णी यांनी पत्नीच्या निधनापूर्वीपासून ‘मला स्थिर रहाता येऊ दे’, अशी प्रार्थना करणे आणि त्यामुळे त्यांना पत्नीच्या निधनानंतर स्थिर रहाता येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुला बाबांविषयी काही सांगायचे आहे का ?

कु. तृप्ती कुलकर्णी : हो. आईच्या निधनानंतर बाबांनी तिची एकदाही आठवण काढली नाही. ती गेली, तेव्हाही ते स्थिर होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : तूही स्थिर राहिलीस की ! बाबांनी तुला तयार केले. तुलाही आईची आठवण नाही ना येत ?

श्री. देवदत्त कुलकर्णी : ‘सुजाता (पत्नी) जाणार’, याची मला १ वर्ष आधीच कल्पना आली होती. त्यामुळे मी आधीपासून देवाला प्रार्थना करत होतो, ‘मला स्थिर रहाता येऊ दे.’

परात्पर गुरु डॉ. आठवले : किती शिकण्यासारखे आहे ना !

५. कु. तृप्ती यांनी ‘आईच्या संदर्भात आम्ही ‘गुरुकृपा काय असते ?’, हे अनुभवले’, असे सांगणे

कु. तृप्ती कुलकर्णी : आश्रमातील अनेक साधक अजूनही माझ्या आईची आठवण काढतात. काही वयस्कर साधक म्हणतात, ‘‘तुझ्या आईसारखाच आमचाही शेवट आश्रमातच संतसान्निध्यात होऊ दे.’’ कालच एक साधिका आईवरील ग्रंथांविषयी माझ्याशी बोलत होती. तेव्हा मी तिला म्हटले, ‘‘आईच्या संदर्भात आम्ही ‘गुरुकृपा काय असते ?’, हे अनुभवले. परात्पर गुरु डॉक्टरांनी शून्यातून विश्व निर्माण केले.’’

परात्पर गुरु डॉ. आठवले : तृप्तीची भाषा किती छान आहे ना !’

– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.११.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक