हिंदु जनजागृती समितीची स्थानिक प्रशासकीय अधिकार्यांना निवेदन देऊन केंद्रीय गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांच्याकडे मागणी
मुंबई – ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्च्याटन) या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन परिषदेचे (कॉन्फरन्सचे) आयोजन १० ते १२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत होणार आहे.
या परिषदेविषयी सामाजिक माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार हिंदु धर्म, हिंदुत्व आणि हिंदूंविरुद्ध दुष्प्रचार केला जाण्याची शक्यता असून धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजक, यामध्ये सहभागी होणारे आणि यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मा. गृहमंत्री आणि मा. परराष्ट्रमंत्री, भारत सरकार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मा. गृहमंत्री आणि मा. परराष्ट्रमंत्री यांना देण्यासाठीचे हे निवेदन महाराष्ट्रात ठिकठिकाणी देण्यात येत आहे.
• सिंधुदुर्ग – जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे यांना, तर सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, कणकवली आणि मालवण येथे तहसीलदारांना देण्यात आले.
• कोल्हापूर – जिल्ह्यात १ सप्टेंबरला आजरा नायब तहसीलदार संजय कांबळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
• निपाणी (कर्नाटक) – येथे उपतहसीलदार ए.के. बोंगाळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीराम सेनेचे तालुकाध्यक्ष श्री. राजू कोपार्डे, श्री. अमोल चेंडके, धर्मप्रेमी श्री. उदय पाटील, हिंदु जनजागृती समितीचे निंगोडा पाटील यांसह अन्य उपस्थित होते.
• वडूज (जिल्हा सातारा) – येथील तहसीलदार रविराज जाधव यांना निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री आकाश माने, प्रथमेश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री रमेश गोडसे आणि विनायक ठीगळे उपस्थित होते.
• सातारा – येथील निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना निवेदन देतांना विश्व हिंदू परिषदेचे सातारा शहर मंत्री श्री. जितेंद्र वाडेकर,
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. ओंकार सणस, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री हेमंत सोनवणे आणि महेंद्र निकम उपस्थित होते.
• कराड (जिल्हा सातारा) – येथील नायब तहसीलदार आनंद देवकर यांना निवेदन देतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सागर आमले, अनिल सागांकर, सतेंद्र जाधव, विजय चव्हाण, ओबीसी संघटनेचे कराड शहर अध्यक्ष उल्हास बेंद्रे, हिंदु जनजागृती समितीचे चिंतामणी पारखे, अनिल कडणे, सनातन संस्थेचे बाबुराव पालेकर, अरूण पाटील आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.