भारतातील मुसलमानांनी अफगाणिस्तानातील तालिबानी सत्तेचे समर्थन करणे, हा चिंतेचा विषय ! – नसीरुद्दीन शाह, ज्येष्ठ अभिनेता

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह

मुंबई, २ सप्टेंबर (वार्ता.) – अफगाणिस्तानात तालिबानची पुन्हा सत्ता प्रस्थापित होणे, हा जगभरासाठी चिंतेचा विषय आहे; मात्र भारतातील मुसलमानांनी तालिबानी आतंकवाद्यांच्या येण्यावर आनंद व्यक्त करणे, हे त्याहून चिंताजनक आहे, अशी खंत व्यक्त करणारा व्हिडिओ ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला आहे.

नसीरुद्दीन शाह म्हणाले, ‘‘आज भारतातील प्रत्येक मुसलमानाने स्वत:ला प्रश्‍न विचारला पाहिजे की, त्यांना स्वत:च्या धर्मात सुधारणा हवी आहे कि मागील काळातील धर्मांधांच्या समवेत रहायचे आहे ? मिर्जा गालिब यांच्या म्हणण्यानुसार, ‘मीही भारतीय मुसलमान आहे. माझे नाते अल्लासमवेत आहे. मला भारताबाहेरील धर्माची कोणतीही आवश्यकता नाही.’ भारतातील इस्लाम कायम जगभरातील इस्लामपेक्षा वेगळा राहिला आहे. अल्लाने ती वेळ आणायला नको की, इस्लामचीही वेगळी ओळख निर्माण होईल.’’