देश आणि हिंदु धर्म यांच्याविरुद्ध दुष्प्रचार करणारी ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ ही आंतरराष्ट्रीय ‘ऑनलाईन’ परिषद रहित होण्यासाठी प्रयत्न करा !

हिंदु जनजागृती समितीची स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन देऊन केंद्रीय गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्ग – ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्याटन) या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन परिषदेचे (कॉन्फरन्सचे) आयोजन १० ते १२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत होणार आहे. या परिषदेविषयी सामाजिक माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार हिंदु धर्म, हिंदुत्व आणि हिंदूंविरुद्ध दुष्प्रचार केला जाण्याची शक्यता असून धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजक, यामध्ये सहभागी होणारे आणि यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मा. गृहमंत्री आणि मा. परराष्ट्रमंत्री, भारत सरकार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मा. गृहमंत्री आणि मा. परराष्ट्रमंत्री यांना देण्यासाठीचे हे निवेदन सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे यांना, तर सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, कणकवली आणि मालवण येथे तहसीलदारांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,

गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांतून एका आंतरराष्ट्रीय  परिषदेविषयी देशात असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे लक्षात येत आहे. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ असे या परिषदेचे नाव असून ही परिषद १० ते १२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ‘ऑनलाईन’ होणार आहे. या परिषदेच्या प्रायोजकांमध्ये जगभरातील नामवंत विद्यापिठांचा समावेश असल्याचे या परिषदेच्या प्रसारसाहित्यांतून दिसून येते. तरी या परिषदेविषयीची काही गंभीर सूत्रे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत.

१. विद्यापिठासारख्या ठिकाणी भाषणस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य या मूल्यांचे संवर्धन, तसेच रक्षण झाले पाहिजे; तथापि या कार्यक्रमाशी संलग्न लोकांचा हिंदूंना हीन लेखण्याचा, तसेच हिंदूंचा झालेला वंशसंहार नाकारण्याचा प्रदीर्घ इतिहास जगजाहीर आहे. असे विचार जगभरातील विद्यापिठांतील विद्यार्थ्यांपर्यंत जाणे, हे अत्यंत चुकीचे ठरेल.

२. या कार्यक्रमात विद्वत्तापूर्ण कार्य केल्याचा दावा करणार्‍यांना सहभागी करून घेतल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. यांच्या संकेतस्थळावर ‘साऊथ एशिया स्कॉलर एक्टिव्हिस्ट कलेक्टिव्ह’ यांनी लिहिलेले ‘फिल्ड मॅन्युअल अगेन्स्ट हिंदुत्व ट्रोल्स’ याचा उल्लेख आहे. या संघटनेचा मुख्य सदस्य हिंदु पालकांच्या सामाजिक संकेतस्थळांवरील खात्यांच्या मागावर असल्याच्या प्रकरणी आरोपी आहे. हा सदस्य हिंदूंच्या विरोधातील एका कार्यक्रमाला उपस्थित होता. हा एक दुर्दैवी विरोधाभास आहे की, इतरांना धमकावण्याचे वेगवेगळे मार्ग काढणारे हे लोक जागतिक व्यासपिठावर ‘हिंदुत्वाचा वाईटपणा’ या विषयावर दुराग्रहाने सांगत आहेत.

३. या कार्यक्रमात ‘बहिष्कार घालणारा नागरिकत्व सुधारणा कायदा’ या विषयावर चर्चा होणार आहे. वास्तविक अफगाणिस्तान आणि धर्माच्या आधारावर फाळणी होऊन भारतापासून विलग झालेले पाकिस्तान, बांगलादेश या इस्लामी देशांत होणार्‍या छळामुळे भारताचा आश्रय घेणारे हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी यांना भारतीय नागरिकत्व देण्याविषयीचा ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ हा एक पथदर्शी कायदा आहे. या देशांतील मुसलमानांना भारताचे नागरिकत्व नाकारण्यात आलेले नाही किंवा त्यांना भारतात प्रवेश करण्यापासूनही रोखण्यात आलेले नाही. (ताज्या अहवालानुसार, अफगाणिस्तानातून पळून येणार्‍या मुसलमानांना ‘आपत्कालीन व्हिसा’ आणि शरणार्थींचा दर्जा देण्यात येत आहे.) मग याला बहिष्कार घालणे कसे म्हणता येईल ? याला वस्तूस्थितीची समतोल मांडणी, असे म्हणता येईल का ?

४. आणखी एक महत्त्वपूर्ण सूत्र म्हणजे या कार्यक्रमात ‘नोटबंदीचे अपयशी धोरण आणि दुर्भावनायुक्त शेतकी सुधारणा धोरण’ या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. सरकारी धोरणे हिंदुत्वाशी किंवा कोणत्याही धर्माशी कशी जोडता येतील ? हे समजण्यापलीकडचे आहे.

५. आज दुर्दैवाने सनातन धर्म (हिंदु धर्म किंवा हिंदुत्व) जागतिक पातळीवर चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. त्यामुळे हिंदु कर्मचारी आणि विद्यार्थी यांना त्यांची श्रद्धा आणि पद्धती मोकळेपणाने मांडता येत नाहीत. उदाहरणार्थ पाश्चिमात्य विद्वानांनी नाझींच्या चिन्हाला स्वस्तिक म्हटले; पण प्रत्यक्षात हिंदूंचे स्वस्तिक चिन्ह वैभवाचे प्रतीक आहे आणि त्याचा नाझींच्या चिन्हाशी काहीही संबंध नाही. भारताबाहेरील हिंदू स्वस्तिक हे त्यांचे शुभचिन्ह प्रदर्शित करू शकत नाहीत; कारण त्याकडे तिरस्काराचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.

६. आता असा कार्यक्रम होत आहे की, ज्यामध्ये हिंदूंविरुद्ध दुष्प्रचार केला जाईल. (भारतीय समाजातील असमानता आणि जातीव्यवस्था यांवरून हिंदुत्वाला लक्ष्य केले जातच आहे.) त्यामुळे ज्या विद्यापिठांनी या कार्यक्रमाला प्रायोजित केले आहे, तेथील हिंदु कर्मचारी आणि विद्यार्थी त्यांच्या श्रद्धा, परंपरा जोपासण्यास कचरतील. त्यामुळे केवळ ‘हिंदु’ असण्यामुळे हिंदु विद्यार्थ्यांचा छळही होऊ शकतो.

७. या कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेली वेळ हा निवळ योगायोग असू शकत नाही. जगावर पुन्हा ९/११ सारखे आतंकवादी आक्रमण होण्याची भीती आहे.  अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जागतिक समुदायाने २ दशके घेतलेले प्रयत्न मातीमोल ठरवत तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर असा कार्यक्रम घेणे म्हणजे शांतता, प्रेम, सद्भावना, सर्वसमावेशकता शिकवणार्‍या धर्माच्या लाखो अनुयायांचे अमानवीकरण करणे, तसेच जगाचे लक्ष खर्‍या समस्यांपासून जाणीवपूर्वक भरकटवण्यासारखे आहे.

‘हिंदु फॅसिझम्’सारखे शब्द वापरून ‘वसुधैव कुटुम्बकम्’ची शिकवण देणार्‍या हिंदु धर्मावर आघात केले जात आहेत. जेव्हा ते ‘दडपशाही’विषयी बोलतात, तेव्हा ते ही वस्तूस्थिती लपवतात की, हिंदु धर्मशास्त्रामध्ये वैश्विक शांती आणि समृद्धी यांसाठी मंत्र आहेत.

याविषयीचे निवेदन सावंतवाडीचे नायब तहसीलदार मनोज मुसळे, वेंगुर्लेचे तहसीलदार प्रवीण लोकरे, ओरोस (जिल्हा मुख्यालय) येथे निवासी उपजिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे, दोडामार्गचे तहसीलदार अरुण खानोलकर, कणकवलीचे नायब तहसीलदार श्रीमती सुजाता पाटील आणि मालवणचे नायब तहसीलदार गंगाधर कोकरे यांना देण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीने केलेल्या मागण्या

अ. या कार्यक्रमाद्वारे हिंदु धर्म आणि हिंदुत्व यांविषयी अत्यंत चुकीचा प्रसार करून धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील जे वक्ते किंवा आयोजक भारतीय आहेत, त्यांच्यावर गुन्हे नोंद करून योग्य ती कारवाई करावी, तसेच त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊ नये, या दृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाई करावी.

आ. या कार्यक्रमाला ज्या विदेशांतील विद्यापिठांनी पाठिंबा दिला आहे किंवा प्रायोजकत्व घेतले आहे, त्यांना भारत सरकारकडून पत्र पाठवून ‘हा कार्यक्रम भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांच्याविषयी चुकीचा प्रसार करणारा असल्याने कार्यक्रम रहित करावा किंवा आपले प्रायोजकत्व मागे घ्यावे’, असे पत्र पाठवावे. तरीही काही झाले नाही, तर या विद्यापिठांवर कारवाई करण्याविषयी भारत सरकारने संबंधित देशांशी पत्रव्यवहार करावा.

इ. ही परिषद भारतद्रोही आणि हिंदुद्रोही कार्यक्रम (अजेंडा) घेऊन समाजात हिंदूंना अपकीर्त करत असल्याने यामध्ये सहभागी होऊ नये, असे भारत सरकारने नागरिकांना आवाहन करावे.