चीनने १८ वर्षांखालील मुलांच्या ऑनलाईन खेळण्यावर लावले वेळेचे निर्बंध !

चीन जे करते, ते भारत का करत नाही ? चीनप्रमाणे भारतानेही असाच निर्णय घेणे आवश्यक ! – संपादक

बीजिंग (चीन) – चीन सरकारने १८ वर्षांखालील मुलांच्या ऑनलाईन खेळण्यावर वेळेचे निर्बंध लागू केले आहेत. तसेच खेळ बनवणार्‍या आस्थापनांनाही नियम आणि निर्बंध यांच्या कक्षेत आणले आहे. नव्या नियमांमुळे मुलांना आता आठवड्यातील ३  दिवस केवळ १ घंटा ऑनलाईन खेळ खेळता येतील. शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी मुले रात्री ८ ते ९ या वेळेतच ऑनलाईन खेळ खेळू शकणार आहेत.

१. हे नवे नियम लागू करण्याआधी चीनमधील मुलांना प्रतिदिन ९० मिनिटे आणि सुटीच्या दिवशी ३ घंटे ऑनलाईन खेळ खेळण्याची मुभा होती. निश्‍चित केलेल्या कालावधीहून अधिक वेळ मुले ऑनलाईन खेळतांना आढळली, तर त्याचे दायित्व संबंधित आस्थापनांवर टाकण्यात येणार आहे. ‘निर्धारित वेळेआधी किंवा नंतर ऑनलाईन खेळ खेळण्यापासून मुलांना रोखा’, असा आदेशही आस्थापनांना देण्यात आला आहे.

२. एक मासापूर्वी चीन सरकार संचालित ‘इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन डेली’ने प्रसिद्ध केलेल्या एका लेखामध्ये १८ वर्षांखालील अनेक मुलांना ऑनलाईन खेळाचे व्यसन लागले असून त्याचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला होता.