श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी (गोकुळाष्टमी) (३०.८.२०२१) या दिवशी सौ. माया पिसोळकर यांचा ५३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त रामनाथी आश्रमात सेवा करणारे त्यांचे लहान भाऊ अधिवक्ता योगेश जलतारे यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सौ. माया पिसोळकर यांना ५३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
‘आपल्या जीवनाच्या वाटचालीत आपल्याला अनेक जण पुढे घेऊन जाणारे असतात. त्या प्रत्येक व्यक्तीची आपल्यावरील ऋणाची जाणीव त्या त्या वेळी होतेच, असे नाही. जेव्हा ती होते, तेव्हा आपले मन कृतज्ञतेने भरून येते. माझ्या जीवनातही ही भूमिका पार पाडणारे एक व्यक्तीमत्त्व म्हणजे, माझी मोठी बहीण मायाताई ! सर्वांच्या परिचयातील सौ. माया श्रीकांत पिसोळकर ! ती केवळ माझी ताईच नव्हे, तर अध्यात्मातील आईही आहे. तिनेच मला साधनेत आणले. माझ्या साधनेचा आरंभही तिच्या समवेत सेवा करूनच झाला. मी पूर्णवेळ साधना चालू केल्यावर माझ्या बाबांनी मला जणू ताईला दत्तक दिले. ते जावयांना (श्री. श्रीकांत पिसोळकर यांना) नेहमी म्हणायचे, ‘‘मी याला (योगेशला) तुम्हाला दिला आहे. आता तुम्हीच त्याचे काय ते पहा.’’ तेव्हापासून ताई आणि श्री. पिसोळकर माझा साधनेच्या दृष्टीने आई-वडिलांप्रमाणे सर्वतोपरी सांभाळ करत आहेत.
१. संयम ठेवून अंक गिरवायला शिकवणे
मी पहिल्या इयत्तेत शिकत असतांना ताई मला मराठीतील १ हा अंक गिरवायला शिकवत होती. त्या वेळी मी १ अंकाच्या ऐवजी ९ अंक काढायचो. तेव्हा तिने संयम ठेवून आणि तितक्याच मायेने माझ्याकडून १ अंक गिरवून घेतला. अंकांचा आरंभ १ पासून होऊन समारोप ९ या अंकापाशी होतो. ‘१ अंक गिरवण्याच्या निमित्ताने ताईने माझ्यात चांगले संस्कार रूजवण्यास आरंभ केला’, असे आज मला वाटते.
२. नियोजनकौशल्य
ताई मामाच्या घरातील सर्व कामे सांभाळून महाविद्यालयात जायची आणि अभ्यास करायची. तिची सेवा चालू असतांना कधी कधी तिला घरातील कामे करायला उशीर व्हायचा; परंतु नंतर ती अत्यल्प वेळात स्वयंपाक बनवायची. त्यासह धुणी-भांडी करणे आणि नंतर भावंडांचे आवरणे, अशी सर्व कामेही करायची.
दोन सेवा एकत्र आल्यावर मला लगेचच ‘कसे होणार ?’ असा ताण येतो; पण ताई प्रत्येक वेळी अशी परिस्थिती लीलया हाताळते.
३. काटकसरी
ताईने शीतकपाटासारख्या अत्यावश्यक सुखसुविधा न घेता २० ते २५ वर्षे विनातक्रार संसार केला. एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘इतकी वर्षे काटकसरीने संसार करणार्या मायाताईंचे कौतुकच आहे.’’ ती आधी अकोला येथील ज्या घरात रहात होती, त्या घराच्या लाद्या भूमी खचल्याने खाली-वर झाल्या होत्या. तिच्या घरातील गॅसचा ओटाही खाली-वर झाला होता. त्या वेळी तिने ओट्याखाली विटा लावणे, पोळी-भाजी करतांना पायांखाली पाट घेणे आदी उपाययोजना करून काटकसरीने दिवस काढले.
४. नातेवाइकांना निरपेक्षपणे साहाय्य करणे
ताई सर्व भावंडांत मोठी असल्याने तिने घरची हलाखीची स्थिती जवळून पाहिली होती. तिने नातेवाईक आणि समाजातील लोक यांच्याकडून आई-बाबांना मिळणारी हिणकस वागणूक सोसली होती, तरीही ती आजही सर्व नातेवाइकांच्या संपर्कात असते. एकदा तिने मला सांगितले, ‘‘अन्य व्यक्ती आपल्याशी तसे वागल्या; म्हणून आपण त्यांच्याप्रमाणे वागायचे नाही.’’ ताई ‘कुणी किती ऐकते किंवा किती कृतीत आणते’, याचा विचार न करता नातेवाइकांना साधना सांगते. ‘नातेवाइकांनी केलेला अपमान गिळून ताईने त्यांना निरपेक्षपणे साहाय्य करणे’, हे मला नेहमी प्रेरणा देणारे ठरते.
५. मुलांवर साधनेचे संस्कार करणे
ताईची मुले लहान असतांनाच ताई आणि श्री. पिसोळकर पूर्णवेळ साधना करू लागले. तेव्हा श्री. पिसोळकर यांची नोकरीही जेमतेम १५ वर्षेच झाली असल्याने त्यांना निवृत्तीवेतन मिळणार नव्हते, तरीही ताईने त्यांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी साहाय्य केले. त्यासाठी दोघांनीही नातेवाइकांची बोलणी ऐकली. मुलांना आर्थिक परिस्थितीची झळ लागू न देता दोघांनीही मुलांना आवश्यक ते सर्व देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार केले. त्यांच्या संस्कारांमुळेच आज त्यांची दोन्ही मुले (श्री. श्रेयस पिसोळकर आणि सौ. मुक्ता लोटलीकर) पूर्णवेळ साधक होऊन चांगली साधना करत आहेत.
६. तत्त्वनिष्ठ
घरातील कुणाचीही चूक असली, तरी ताई संबंधितांना स्पष्ट शब्दांत जाणीव करून देते. पूर्वी प्रसारानिमित्त नामदिंडी काढतांना चित्ररथ समवेत असायचा. एकदा एक साधक चित्ररथ बांधत असतांना मी केवळ ते पहात उभा होतो. तेव्हा माझ्या मनात ‘मी थकलो आहे, तर त्या साधकाला करू दे’, असा विचार होता. तेव्हा ताईने मला सांगितले, ‘‘स्वतःचा विचार न करता त्या साधकाला साहाय्य करायला हवे.’’
आम्ही स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत असतांना एकदा व्यष्टी साधनेच्या आढाव्याला मी अन् ताई एकत्र होतो. तेव्हा आढावा घेणार्या साधिकेने एका प्रसंगात दिलेला दृष्टीकोन मला पटला नाही. नंतर मी घरी त्याविषयी बोललो. तेव्हा ताईने परखडपणे ‘दृष्टीकोन योग्यच होता’, याची मला जाणीव करून दिली.
७. ताई निर्भीड आहे. तिच्या मनात अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड आहे. ती तिच्या बोलण्यातून व्यक्त होत असते.
८. कृतज्ञताभाव
८ अ. मामांनी केलेल्या साहाय्याविषयी कृतज्ञता वाटणे : आमच्या घरची आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने ताईला दहाव्या इयत्तेनंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी मामांकडे रहावे लागले. ती ५ वर्षे मामांकडे राहून शिकत होती. त्या वेळी मामांनी केलेल्या साहाय्याविषयी तिला आजही कृतज्ञता वाटते.
८ आ. संत आणि साधक यांच्याप्रती भाव : ताईच्या मनात संत आणि साधक यांच्याप्रती भाव आहे. साधक आणि संत घरी आल्यावर ती त्यांचे आदरातिथ्य मनापासून करते. तिने संतांना लागणारे साहित्य घरी वेगळे ठेवले आहे. ती ते अन्य वेळी वापरत नाही. ‘संतांच्या घरी येण्यानेच वास्तूशुद्धी होते’, हे तिच्या मनावर चांगले बिंबले आहे. तिच्यातील भावामुळे त्यांच्या वास्तूत पुष्कळ चांगली स्पंदने जाणवतात. तिच्या घरी गेल्यावर साधकांचा नामजप चांगला चालू होतो.
देवाने मला अशी गुणसंपन्न ताई दिली, यासाठी देवाच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ‘तिचे ऋण फेडण्याची एक संधी म्हणून तिच्या शिकवणीप्रमाणे माझ्याकडून आचरण करवून घ्या’, अशी मी गुरुचरणी प्रार्थना करतो.’
– अधिवक्ता योगेश जलतारे (भाऊ), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.७.२०२१)