परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा आणि गुरुकार्याची तळमळ असलेले डिचोली (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. कृष्णा सावंत (वय ६२ वर्षे) !

१५.८.२०२१ या दिवशी डिचोली (गोवा) येथील साधक कृष्णा सावंत (वय ६२ वर्षे) यांचे अपघाती निधन झाले. २६.८.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्यानिमित्त साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कै. कृष्णा सावंत

श्री. माधव रामचंद्र पराडकर, डिचोली, गोवा.

‘सनातन संस्थेच्या माध्यमातून कृष्णा सावंत यांचा परिचय झाला. प्रथम त्यांचा स्वभाव थोडा रागीट आणि भिडस्त होता. हळूहळू आमचा संपर्क वाढला आणि बाहेरून रांगड्या दिसणार्‍या या व्यक्तीच्या स्वभावाचे पैलू माझ्या लक्षात येऊ लागले.

श्री. माधव पराडकर

१. सातत्य

कृष्णादादा आजारी असतांना मला ठाऊक असलेली औषधे मी त्यांना सांगितल्यावर ते ती औषधे घ्यायचे. मध्यंतरी ते पुष्कळ आजारी होते. मी त्यांना भ्रमणभाष करायचो, तेव्हा ते त्यांच्या आजाराविषयी मला सांगायचे. अशा वेळी मला ठाऊक असलेल्या औषधांपैकी त्यांना आवश्यक; पण सोपी घरगुती औषधे मी त्यांना सांगत असे. मी त्याविषयी त्यांना विचारल्यावर त्या औषधांचा त्यांना चांगला लाभ होत असल्याचे ते मला सांगायचे.

२. दातृत्व

अ. सनातन संस्थेच्या प्रसारकार्यासाठी त्यांच्या दुकानात असलेल्या कोणत्याही वस्तू ते सढळ हस्ते आम्हाला देत असत, उदा. सनातन संस्थेचे फलक लावण्यासाठी सुतळी, सुंभ किंवा भित्तीपत्रके लावायची असल्यास ‘फेव्हिकॉल’ अशा वस्तू ते अर्पण स्वरूपात देत असत.

आ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही वेळा पाऊस असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी सगळीकडे पाणी असायचे. त्या वेळी फरशीवरून पाय घसरू नये; म्हणून साधकांना पुष्कळ धावपळ करायला लागायची. अशा वेळी ते फरशीवर घालण्यासाठी गोणपाटाच्या पिशव्या द्यायचे. त्यामुळे फरशी कोरडी रहाण्यास साहाय्य व्हायचे.

३. इतरांचा विचार करणे

एकदा निधीसंकलनाला जातांना मी छत्री घ्यायला विसरलो. ४ – ५ ठिकाणी निधीसंकलन होईपर्यंत जोरदार पाऊस कोसळू लागला आणि तो थांबण्याची चिन्हे दिसेनात. तेव्हा त्यांनी त्यांची छत्री मला दिली आणि म्हणाले, ‘‘मामा (मला ते पराडकरमामा म्हणत), आपण आपली सेवा चालूच ठेवूया !’’ ते माझ्या समवेत पावसात भिजत निघाले. तेव्हा मी त्यांनाही छत्रीत घेतले आणि आम्ही एकाच छत्रीतून न भिजता निधीसंकलन पूर्ण केले.

४. गुरुसेवेची तळमळ

गुरुपौर्णिमेच्या वेळी समाजातील अनेक व्यक्ती अर्पण स्वरूपात सनातन संस्थेला साहाय्य करू इच्छितात; पण ते प्रत्यक्ष कार्यस्थळी येऊ शकत नाहीत. अशा वेळी आपण त्यांच्यापर्यंत जाऊन ते अर्पण स्वीकारणे महत्त्वाचे असते. कृष्णादादांना ही गोष्ट पक्की ठाऊक असल्याने ते स्वतःच्या व्यापात कितीही व्यस्त असले, तरी समष्टी साधना म्हणून निधीसंकलनाच्या सेवेसाठी गुरुपौर्णिमेच्या किमान ८ – १० दिवस आधी ते मला सांगायचे, ‘‘मामा, पुढील आठवडा आपण संपूर्ण बाजारपेठ फिरून निधीसंकलन करूया.’’ बाजारपेठेतील सर्वच मंडळींशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. त्यामुळे त्यांना निधीसंकलनाच्या सेवेत उत्तम प्रतिसाद मिळायचा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीने अर्पण दिले नाही; म्हणूनही त्यांना काही वाटायचे नाही. उलट ते म्हणायचे, ‘‘दिले तरी चांगले, नाही दिले तरी चांगले !’’

५. मायेपासून अलिप्त

त्यांच्या निधनाच्या दोन दिवसांआधी मी त्यांच्या दोन्ही मुलांना (श्री. कल्पेश सावंत आणि श्री. महादेव सावंत यांना) भेटायला गेलो होतो. त्या वेळी कल्पेश म्हणाला, ‘‘बाबांनी (कृष्णादादांनी) आम्हा दोघांना सांगितले आहे, आता पुढील सर्व व्याप तुम्हीच सांभाळा. मला आपल्या मूळ गावी सावंतवाडी येथे रहायचे आहे. मला एक छोटेसे घर बांधून द्या. मी तिथे माझी साधना करीन.’’

६. देव आणि गुरु यांच्यावर दृढ श्रद्धा

अ. कधीकधी त्यांना त्यांच्या गावाकडील मालवणी कोकणी भाषेत बोलण्याची ऊर्मी यायची. त्या वेळी ते सहज बोलून जायचे, ‘‘देवाने आम्हाला पुष्कळ दिले आहे. त्याने दिलेले त्याच्याच कार्यासाठी वापरायचे आहे. रामनाथी आश्रमात देणारा ईश्वर (परात्पर गुरु डॉ. आठवले) बसला आहे. तो आम्हाला काहीच न्यून पडू देणार नाही.’’ त्यांना भ्रमणभाष केल्यावर ‘देवाक् काळजी रे, देवाक् काळजी’ ही ‘कॉलरट्यून’ प्रथम ऐकू यायची. यावरून त्यांचा ईश्वर, गुरु आणि सनातन संस्था यांच्यावरील दृढ विश्वास व्यक्त होतो.

आ. त्यांचा मुलगा कल्पेश यांच्या बोलण्यातून समजले, अपघात झाल्यावरही त्यांचा ‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।’ हा नामजप अखेरपर्यंत चालू होता.

७. कृष्णादादांमध्ये जाणवलेले पालट

स्वभाव बराच शांत, गंभीर आणि स्थिर झाला होता. प्रत्येक कृती ते शांतपणे करायचे. सेवेला जातांना ते न विसरता प्रार्थना आणि सेवा पूर्ण झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करायचे. थोडक्यात त्यांच्या मनाची स्थिती ‘मजचिस्तव जाहले; परि म्या नाही केले ।’, अशी होती.  त्यावरून वाटते की, त्यांची आध्यात्मिक पातळी वाढलेली असेल.

नियतीच्या मनात वेगळेच होते. ‘लहानपणी गरिबीमुळे अतिशय कष्टप्रद जीवन जगून स्वकष्टाने प्रगतीचा आदर्श आणि ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवून वागणारी व्यक्ती आज आपल्यात नाही’, याचे वाईट वाटते, तरीही म्हणावेसे वाटते, ‘जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला !’ (२३.८.२०२१)

सौ. सुचिता करंगुटकर, डिचोली, गोवा.

१. जवळीक साधणे : ‘कृष्णाकाकांच्या दुकानात कधीही गेले, तरी ते आपुलकीने विचारपूस करत असत. त्यांचे बोलणे नेमकेच असायचे. कुणीही दुकानात आले, तरी ते सर्वांशी प्रेमाने बोलायचे. त्यांची सर्वांशी जवळीक होती.

२. सेवेची तळमळ : गुरुपौणिमेच्या सेवेसाठी डिचोली बाजारपेठेत निधीसंकलनाची सेवा असायची. त्या वेळी काका वेळ आणि दिवस यांचे नियोजन करून २ – ३ दिवसांत निधीसंकलनाची सेवा पूर्ण करायचे.’ (२३.८.२०२१)

श्री. दिलीप माणगावकर, डिचोली, गोवा.

श्री. दिलीप माणगावकर

१. नम्रता आणि प्रामाणिकपणा : ‘त्यांना व्यष्टी साधनेविषयी विचारले, तर ते प्रामाणिकपणे त्यांच्याकडून होत नसलेले प्रयत्न सांगत असत. त्यांना प्रयत्न करायला सांगितले, तर नम्रपणे ऐकून ‘प्रयत्न करतो’, असे सांगायचे. ते प्रत्येकाशी मनमोकळेपणाने बोलायचे.

२. गुरुकार्याची तळमळ

अ. आम्ही अनेकदा रामनाथी आश्रमासाठी किंवा केंद्रात काही साहित्य हवे असल्यास कृष्णादादांच्या दुकानातून आणायचो. ते सर्व साहित्य अर्पण स्वरूपात द्यायचे.

आ. त्यांना शारीरिक त्रासही होता; पण ते कधी दुःखी किंवा त्रासलेले वाटत नसत. ते सतत उत्साही असायचे. ते शारीरिक सेवा करू शकत नव्हते, तरी प्रासंगिक सेवेला जसे उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन द्यायला वेळेत उपस्थित असायचे.

इ. त्यांनी नियमित दैनिक वितरण करणे, गुरुपौर्णिमेला दुकानदांराकडून अर्पण गोळा करणे, दुकानात सनातनची सात्त्विक उत्पादने आणि पंचाग विक्रीसाठी ठेवणे आदी सेवा केल्या आहेत.

ई. ‘त्यांचे किराणा दुकान असल्याने दुकानात नेहमी ग्राहक असायचे. त्यांचे दुकान मध्यवर्ती असल्याने साधकांना एकमेकांना द्यायची पाकिटे त्यांच्या दुकानात आम्ही ठेवत असू. दुकानात गर्दी असली, तरीही संबंधित साधक आल्यावर ते पाकिटे द्यायची-घ्यायची सेवा प्राधान्याने करायचे. ‘माझ्याकडून एवढी तरी सेवा होत आहे’, असा त्यांचा भाव असायचा.

व्यावसायिक असूनही त्यांच्यात नम्रपणा, साधी रहाणी, इतरांचे मनापासून ऐकणे, सकारात्मक प्रतिसाद देणे, मनमोकळेपणा असे विविध गुण होते. त्यांची प्रत्येकाशी समान वागणूक असायची. ते साधनेत आल्यापासून त्यांच्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती अव्यक्त भाव जाणवत असे. ‘त्यांची अंतर्मनातून साधना चालू होती’, असे जाणवायचे.’ (२३.८.२०२१)

श्रीमती शैलीता भोवर, डिचोली, गोवा.

श्रीमती शैलीता भोवर

१. ‘कृष्णादादा गेली अनेक वर्षे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते. दादा शांत स्वभावाचे, अत्यंत प्रेमळ, नम्र, शिस्तप्रिय आणि हिंदुत्वनिष्ठ  होते. त्यांचा तोंडवळा हसरा होता आणि रहाणीमान साधे होते.

२. त्यांच्या दुकानात गेल्यावर ते आपुलकीने विचारपूस करायचे. त्यांच्या दुकानात भ्रमणभाषवर अखंड नामजप चालू असायचा. त्यांच्या दुकानात कितीही गर्दी असली, तरी ते चिडचिडपणा करत नसत.

३. ‘सर्वकाही परात्पर गुरु डॉक्टर करून घेणार आहेत’, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती.’ (२३.८.२०२१)

श्री. प्रशांत चणेकर, डिचोली, गोवा.

१. ‘कृष्णादादांनी स्वतःचे जीवन शून्यातून चालू केले. जीवनात आलेल्या अनेक कठीण प्रसंगांना ते न डगमगता सामोरे गेले. डिचोली बाजारपेठेतील एक प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ, यशस्वी आणि हिंदुत्वनिष्ठ व्यावसायिक असा नावलौकिक त्यांनी मिळवला होता.

२. ते कर्मयोगी पुरुषाचे मूर्तीमंत उदाहरण होते. त्यांनी अध्यात्म आणि व्यवहार यांची उत्तम सांगड घातली होती. परात्पर गुरु डॉक्टरांवर त्यांनी अपार श्रद्धा ठेवून जीवनाची वाटचाल केली. अखेरपर्यंत त्यांनी मनाची स्थिती सकारात्मक ठेवली.

३. प्रारंभी त्यांच्या मूळ गावी कुलदेवतेचे देऊळ बांधण्याचे त्यांचे स्वप्न होते. नंतर देऊळ बांधण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यावर कुलदेवता ‘श्री नागोजी वस आणि परात्पर गुरु डॉ. आठवले’, यांच्या प्रती त्यांचा कृतज्ञताभाव दाटून येत असे.

४. परात्पर गुरु डॉक्टर आणि इतर उत्तरदायी साधक यांच्या पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सभा होत असत. त्या वेळी चांगले साधक म्हणून दादांचे नाव घेतले जायचे.

५. ‘प्रत्येक सेवा झोकून देऊन कशी करायची ?’, हे त्यांच्या कृतीतून इतरांना शिकायला मिळत असे.

६. पूर्वीच्या जाहीर सभा आणि त्यानंतर चालू झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभा यांची फलनिष्पत्ती वाढवण्यासाठी ते गावोगावी फिरले. त्यांनी सत्संग चालू केले. तसेच ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वर्गणीदार वाढवणे, प्रायोजक मिळवणे, विज्ञापने घेणे इत्यादी सेवा शारीरिक त्रास असूनही त्यांनी अनेक वर्षे तळमळीने केल्या.’ (२३.८.२०२१)