२१ व्या शतकातील शिक्षण, समाज आणि राष्ट्र

‘आजचे जग सर्वार्थाने सुखी व्हावे, एवढे संचित त्यांच्या संग्रही आहे; पण त्याच्या सुखाला सर्व बाजूंनी ओहोटी लागली आहे. म. गांधी यांनी याला कारणीभूत असणारी काही कारणे सांगितली आहेत. त्यांना ते ‘सप्त सामाजिक पातकांचे तत्त्वज्ञान’ म्हणत. ती सप्त सामाजिक पातके कोणती ?

१. राजकारणात आढळणारा तत्त्वांचा अभाव

२. ज्ञानाच्या क्षेत्रात आढळणारा चारित्र्याचा अभाव

३. विज्ञानाची निरपेक्षता

४. आनंद संपादनात आढळणारा विवेकाचा अभाव

५. उद्योग व्यापारात सचोटीचा अभाव

६. परिश्रमाविना प्राप्त होणारी सधनता

७. त्यागाविना केलेली उपासना

वर्तमान युग हे विज्ञानयुग मानले जाते. या युगात विज्ञान ही एक विचारपद्धत आणि अभ्यासपद्धत आहे. निरीक्षण, प्रयोग, प्रचीती आणि सिद्धता या प्रक्रियांच्या साहाय्याने निसर्गतत्त्वांचा घेतला जाणारा शोध म्हणजे विज्ञान. या शोधांच्या वापराने मानवी जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न म्हणजे तंत्रविद्या. ती जीवनाच्या प्रत्येक प्रांगणात शास्त्र उभे आहे. धर्म, राजकारण आणि विज्ञान या जीवन शाखांचे दर्शन दुर्दैवाने विदारक आहे. धर्म माणसाला भावला नाही, राजकारण कळले नाही आणि विज्ञान मानवले नाही. वहात्या गंगेच्या प्रवाहात माणूस कोरडा राहिला आहे.’ (ही स्थिती ९ वर्षांनंतरही आता तशीच आहे. – संकलक) – गणपत दसपुते

(साभार : मासिक ‘सद्गुरु सुगंध’, दीपोत्सव २०१२)