१. बालपण
१ अ. आई-वडिलांकडून आध्यात्मिक वारसा लाभणे
‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती ।’, या काव्यपंक्ती ज्यांना तंतोतंत लागू पडतात, असे माझे परम पूज्य वडील, म्हणजेच श्री. गोविंदराव गळाकाटू (सावरगावकर) ! त्यांच्या दिव्य गुणांचे वर्णन मी इथे करणार आहे. त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून देवत्वाचा वारसा मिळाला आहे. त्यांच्या आईचे नाव ‘अंबाबाई’ होते. त्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रातील परळी वैजनाथ (जिल्हा बीड) येथील कालरात्रीदेवीचा प्रसाद म्हणून जन्माला आल्या होत्या. त्यांचे वडील दासराव जगदंबेचे दासच होते; कारण ते सतत देवीची भजने आणि नामस्मरण यांत मग्न असायचे. दासराव यांना संसाराशी फारसे काही देणे-घेणे नव्हते. त्यामुळे जन्मतःच माझे बाबा ‘गोविंदराव’ म्हणजे जणू भगवंताचा प्रसादच होते.
१ आ. कष्टमय बालपण
लहानपणापासून बाबांचे जीवन पुष्कळ कष्टात गेले. त्यांच्यावर अनेक संकटे आली; पण त्यांना सात पिढ्यांपासून संतत्वाचा वारसा लाभल्याने त्यांतून ते सहजरित्या तरले.
२. निरपेक्ष वृत्ती
बाबांनी आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीकडून, म्हणजेच अगदी पत्नी, मुले, सुना, नातेवाईक, समाजातील व्यक्ती, नोकरीतील सहकारी आणि त्यांचे विद्यार्थी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा केली नाही. ते केवळ कर्म करायचे; पण फळाची अपेक्षा करत नसत. आम्हालाही त्यांनी असेच घडवले.
३. आनंदी आणि उत्साही
ते सतत उत्साही असतात. तरुणांना लाजवेल, अशा उत्साहाने ते सर्व कामे करतात. सध्या ते रुग्णाईत असूनही त्यांना जे शक्य आहे, ते सर्व स्वतःच करतात.
४. प्रेमभाव
४ अ. सर्वांवर प्रेमाचा वर्षाव करणे
आजपर्यंत मी बाबांच्या मुखातून कुणाविषयी कधीही वाईट शब्द किंवा दोष देणारा शब्द ऐकला नाही. संतांचे वागणे ज्ञानेश्वरीतील ‘हें विश्वचि माझें घर । (म्हणजे हे विश्व माझे घर आहे)’, या ओवीप्रमाणे असते. आमचे बाबाही सर्वांना आपले मानतात. ते कुटुंबातील व्यक्तींशी तर आपुलकीने वागतातच; पण त्यांना भेटायला येणार्यांवरही ते त्यांच्या मधुर शब्दांच्या माध्यमातून आपुलकी आणि प्रेम यांचा वर्षाव करतात. त्यामुळे पहिल्या भेटीतच ती व्यक्ती त्यांची होऊन जाते.
४ आ. कोणत्याही स्वभावाची किंवा वाईट व्यक्ती असली, तरी बाबा तिच्याशी शांतपणे आणि प्रेमानेच वागतात.
४ इ. परिचितांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देणे
बाबा परिचितांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी संपर्क करून शुभेच्छा देतात. ते हे न चुकता गेली अनेक वर्षे करत आहेत. त्यांच्या संपर्कातील व्यक्तीला वाढदिवसाच्या दिवशी आशीर्वादाचा पहिला संपर्क बाबांनीच केलेला असतो.
५. सकारात्मकता
त्यांचा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे सकारात्मकता ! त्यामुळे त्यांच्यात मनःशक्ती आणि ज्ञानशक्ती यांचा सुरेख संगम दिसून येतो. त्यांच्या गुणामुळे ते गावातच नव्हे, तर कुटुंब, मित्र आणि आप्तेष्ट, या सर्वांसाठी गुरुस्थानी आहेत.
६. शिस्तप्रिय
बाबा वैयक्तिक आयुष्यात, तसेच नोकरी आणि देवीची सेवा करतांना शिस्त पाळत. ते प्रत्येक कृती वेळेवर करत. ते सर्व कार्यपद्धती आणि नियम यांचे पालन करत असत. ‘सकाळी उठणे, जेवण, वैयक्तिक कामे’ इत्यादी गोष्टी ते नियोजनबद्धरित्या आणि वेळेतच करतात.
७. प्रामाणिकपणा
कुठल्याही मंदिराचा कार्यालयीन कारभार सांभाळणे फार किचकट असते; परंतु बाबांनी सर्व व्यवहार पारदर्शक रितीने आणि वेळच्या वेळी केल्याने त्यातील क्लिष्टता न्यून झाली. ते मंदिराचा कारभार अतिशय प्रामाणिकपणे करतात. ‘वेळोवेळी बैठका घेणे, मंदिराचा विकास करणे, भक्तांच्या निवासस्थानांच्या आणि अन्य सोयी करणे’ इत्यादी सर्वच गोष्टी ते अतिशय चोखपणे करतात.
८. अचूक निर्णयक्षमता
‘वैयक्तिक आयुष्यात, देवीच्या सेवेच्या संदर्भात किंवा शासकीय नोकरीच्या संदर्भात प्रत्येक निर्णय अचूक घेणे आणि इतरांनाही तो वेळेवर देणे’, यांत त्यांची हातोटी आहे.
९. सेवाभावी वृत्ती
अ. त्यांनी वयाच्या ७ व्या वर्षापासून वयस्कर आई-वडील आणि काका यांची सेवा केली आहे. त्यातून त्यांना मिळालेल्या आनंदामुळे आम्हालाही ‘तो आनंद घ्यावा आणि त्यांचा वारसा जपावा’, असे वाटते.
आ. ते रेणुकादेवीची सेवाही चंदनाप्रमाणे झिजून अहोरात्र करत असतात. रुग्णाईत असूनही ते सेवाभावी वृत्तीने मंदिराच्या कारभारात लक्ष घालतात. ते भ्रमणभाषवर संबंधितांच्या नियमित संपर्कात रहातात.
इ. ‘समाजासाठी आपण आहोत’, ही जाणीव त्यांच्या मनात सतत असते. त्यामुळे त्यांच्या मनाला स्वार्थीपणा कधी शिवलाच नाही. शिक्षकाचा पिंड असल्यामुळे कुटुंबियांसाठी अल्प वेळ देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यालाच प्राधान्य दिले.
१०. त्यागी वृत्ती
बाबा अन्नदान, द्रव्यदान आणि ज्ञानदान अविरत करत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या तोंडवळ्यावर समाधान, तेजस्वीपणा आणि शांतता जाणवते.
११. सर्वांचा आधारस्तंभ असणे
संत किंवा भगवंत जसा संकटात भक्तांना आधार देतो, तसेच त्यांनी आम्हा सर्वांना नेहमी मानसिक आणि आध्यात्मिक आधार दिला आहे. ते कुटुंब, समाज आणि गावातील व्यक्ती या सर्वांचेच आधारस्तंभ आहेत.
१२. लोकप्रियता
बाबांनी त्यांच्या जीवनात अनेक माणसे जोडली आहेत. बाबांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एका मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा विविध गावांतून बाबांचे विद्यार्थी आणि संपूर्ण गावातील लोक तेथे उपस्थित होते. बाबांनी त्यांच्यावर केलेल्या अपार प्रीतीची ती जणू पावतीच होती. कुटुंबातील सदस्यांना बाबांचे गुण सांगतांना शब्दही अपुरे पडत होते. त्या वेळी त्यांच्यातील प्रेमभावाची साक्ष आम्हा सर्वांना मिळाली.
१३. भगवंतावरील दृढ श्रद्धा
अ. बाबांवर आलेली अनेक संकटे त्यांची श्रद्धा आणि त्यांचे नामस्मरण यांमुळे टळली आहेत. मंदिरात वास्तव्य करत असल्यामुळे ते सतत म्हणतात, ‘‘जगदंबाच सर्व भार सांभाळणारी आहे.’’
आ. जुलै २०१८ मध्ये ५ मास बाबा पुष्कळ आजारी होते. त्यांच्या आजारपणाचे निदान होत नव्हते. त्यांच्या कंठातून आवाजही निघत नव्हता. सगळे नातेवाईक त्यांना भेटून जात होते. त्यांच्यावर उपचार करणारे वैद्यही म्हणाले, ‘‘त्यांना आता त्यांच्या गावी पाठवा.’’ सर्वांनी आशाच सोडली होती; परंतु त्यांचा मात्र विश्वास होता की, ते जगणार ! ते म्हणायचे, ‘‘जरी मी रेणुकादेवीला ‘मला जीवन दे’, असे म्हटले नाही, तरीपण ती मला वाचवणार आणि मी यातून उठणार आहे.’’ त्यानंतर ते खरंच आजारातून उठले.
इ. आता त्यांना शारीरिक व्याधीमुळे सामान्य व्यक्तीसारखे चालता येत नाही, तरीही ते केवळ त्यांच्यातील दिव्य गुणांमुळे आणि देवीवरील श्रद्धेमुळे टिकून आहेत. त्यांच्याकडे पाहून ‘ते आजारी आहेत’, असे वाटतच नाही.
१४. संततुल्य वर्तणूक
राणीसावरगाव येथील रेणुकामातेचे निस्सीम भक्त म्हणून पूर्ण मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात बाबांची ख्याती आहे. त्यांचे वय ८५ वर्षे आहे; परंतु त्यांच्या मनातील सकारात्मक विचार आणि भगवंतावरील (रेणुकामातेवरील) नितांत श्रद्धा यांमुळे त्यांचा दिव्य ताेंडवळा अगदी तेजोमय दिसतो. रेणुकामाता हाच त्यांचा भगवंत आहे. बाबांच्या जगण्याच्या आणि श्रद्धेच्या संकल्पना त्यांच्यातील संतत्वाला पुष्टी देणार्या आहेत; म्हणूनच आमच्यासाठी ते आदर्श अन् संतसमान आहेत.
१५. वडिलांच्या संदर्भात आलेली अनुभूती
‘मला (मुलगा आधुनिक वैद्य (डॉ.) नागेश गळाकाटू (सावरगावकर) यांना) कधीही काही अडचण आल्यावर मी त्यांचे स्मरण केल्यास ती अडचण सुटते किंवा त्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग तरी मिळतो’, असे मी अनेकदा अनुभवले आहे.
‘हे भगवंता, बाबांच्या या दैवी गुणांचा आम्हा सर्वांनाच लाभ होवो’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
– आधुनिक वैद्य (डॉ.) नागेश गळाकाटू (सावरगावकर) (मुलगा), संभाजीनगर आणि सौ. भावना इनामदार (मुलगी), नांदेड (२२.२.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |