पालकांनी त्यांच्या मुलांना संस्कृत शिकण्यासाठी प्रेरित केले पाहिजे ! – उपराज्यपाल मनोज सिन्हा

जम्मूमध्ये चुडामणि संस्कृत संस्थानच्या नव्या भवनाचा शिलान्यास

कठुआ (जम्मू-काश्मीर) – आमचा प्रयत्न असेल की, शाळांमध्ये संस्कृतचेही शिक्षण दिले जावे. प्राचीन आणि आधुनिक शिक्षण यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. पालकांनीही त्यांच्या मुलांना संस्कृत शिकण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. आपल्या संस्कृतीची ओळख होण्यासाठी सरकारी शाळांमध्येही संस्कृत विषय शिकवण्यास प्रारंभ केला पाहिजे, असे प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी केले. येथील बसोहलीमध्ये चूडामणि संस्कृत संस्थानच्या नव्या भवनाचा शिलान्यास सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या वेळी सांगितले की,

१. राज्यातील अधिकृत ५ भाषांसमवेत संस्कृतलाही नव्या शिक्षण नीतीच्या अंतर्गत प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होत आहे.

२. संस्कृत भाषेच्या गौरवाला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न प्रत्येक भारतियाने करणे आवश्यक आहे. आमच्यासाठी महत्त्वाचे आहे की, आपण आपली संस्कृती आणि मूल्ये यांचे रक्षण अन् संवर्धन करण्यासाठी संधी निर्माण केल्या पाहिजेत.

३. संस्कृत आपल्या देशाची एकमात्र भाषा आहे जिने केवळ विविध क्षेत्रांतच नाही, तर शिक्षक अन् विद्यार्थी यांच्यातही घनिष्ठ संबंध निर्माण केले आहेत.

४. संस्कृत भाषेचे मूल्य शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन आणि ओपेनहायमर यांच्यासारख्यांनीही ओळखले होते.