तालिबानच्या दहशतीमुळे अफगाणी नागरिकांची पलायनासाठी विमानतळावर सहस्रोंच्या संख्येने गर्दी

काबुल विमानतळाबाहेर चेंगराचेंगरीमध्ये ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू

अफगाणिस्तानमधील या घटनेविषयी आणि एकूणच स्थितीविषयी मानवाधिकार संघटना, इस्लामी देश तोंड का उघडत नाहीत ? कि मुसलमानांकडून दुसर्‍या मुसलमानांवर अत्याचार करणे त्यांना मान्य आहे ?

काबुल (अफगाणिस्तान) – येथील विमानतळावर अफगाणी नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याने तेथे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ७ अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तालिबानच्या सत्तेत आल्यापासून अफगाणी नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याने ते देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते या विमानतळावर सहस्रोंच्या संख्येने गर्दी करत आहेत.

१. ब्रिटनच्या सैन्याने या चेंगराचेंगरीची माहिती देत सांगितले की, अफगाणिस्तानमधील स्थिती गंभीर आहे. परिस्थिती सुरक्षितरित्या हाताळण्याचे प्रयत्न चालू आहेत. यासाठी जे काही आवश्यक आहे, ते केले जात आहे.

२. दुसरीकडे अफगाणिस्तानवरून ८७ भारतियांना घेऊन वायूदलाचे एक विशेष विमान पहाटे देहलीला पोचले. या पाठोपाठच भारतीय वायूदलाच्या सी-१७ या विमानाने देखील काबुलहून १६८ नागरिकांना आणले. काबुल विमानतळावर सध्या अमेरिकी सैन्य असून त्याने भारताला प्रतिदिन २ विमान फेर्‍यांना अनुमती दिली आहे. अमेरिकाही अफगाणिस्तानमधील तिच्या नागरिकांना काबुल विमानतळावरून परत आणत आहे.