कणकवली – कणकवली शहरात वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण होत आहे. येत्या १५ दिवसांत सर्व समस्या मार्गी न लावल्यास दोन्ही बाजूंचा महामार्ग बंद करू, अशी चेतावणी शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सलीम शेख आणि उपअभियंता मण्यार यांना दिली.
कणकवली शहरातील अंतर्गत रस्ते आणि महामार्ग यांवरील पथदीप चालू करणे, महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या ‘सर्व्हिस रोड’चे ‘ड्रेनेज’ (पाणी जाण्यासाठीचा मार्ग) खुले करावेत, महामार्गाच्या हद्दीत येणारी अतिक्रमणे हटवावीत, उड्डाण पुलाला लागलेली गळती थांबवावी, शहरातील महामार्गालगतच्या विविध ठिकाणच्या रिक्शा स्थानकासाठी कायमस्वरूपी भूमी द्यावी, यांसह कणकवली एस्.टी. स्थानकात येणार्या आणि बाहेर जाणार्या गाड्यांसाठी उड्डाण पुलाखालून एकच मार्ग ठेवला असल्याने कणकवली शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे बसस्थानकात येणार्या आणि बाहेर जाणार्या गाड्यांसाठी पुलाखाली स्वतंत्र मार्ग बनवावेत आदी अनेक समस्या आणि मागण्या सोडवाव्यात, यासाठी पारकर यांनी आग्रही भूमिका घेतली आहे.