काही देश आतंकवादाला खतपाणी घालत आहेत !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांची पाक आणि चीन यांचे नाव न घेता टीका !

अशा आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर भारत पाक आणि चीन यांचे नाव घ्यायला का बिचकतो ? ‘शत्रूराष्ट्रांचे नाव घेण्यास बिचकणारे त्याचा नायनाट काय करणार ?’ असा प्रश्‍न जनतेच्या मनात आल्यास आश्‍चर्य ते काय ? – संपादक

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

न्यूयॉर्क (अमेरिका) – आतंकवादी कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांना धोका आहे. काही देश आपण आतंकवादाच्या विरोधात लढण्याचा जो सामूहिक संकल्प केला आहे, तो कमकुवत करत आहेत. ते आतंकवादाला खतपाणी घालत आहेत. त्यांना मुभा देता कामा नये, असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीला संबोधित करतांना केले.

एस्. जयशंकर पुढे म्हणाले की,

१. आतंकवादाशी संबंधित आव्हाने आणि त्यामुळे झालेली हानी या गोष्टींचा भारतावर खोलवर परिणाम झाला आहे. आतंकवादाला कोणताही धर्म, राष्ट्रीयत्व, सभ्यता किंवा वांशिक गट यांच्याशी जोडले जाऊ नये.

२. आतंकवादाच्या सर्व प्रकारांचा निषेध केला पाहिजे. तो कोणत्याही प्रकारे न्याय्य असू शकत नाही.

३. इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेने आर्थिक स्रोत अधिक भक्कम केले आहेत. हत्येचे बक्षीस आता ‘बिटकॉईन’च्या रूपात दिले जात आहे.

‘बिटकॉईन’ म्हणजे काय ?

बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश नावाच्या काही ‘क्रिप्टो करन्सीज’ प्रसिद्ध आहेत. ‘क्रिप्टो करन्सी’ म्हणजे ‘आभासी चलन.’ चलनी नोटांना पर्याय असणारी एक ‘डिजिटल करन्सी’. हे चलन भारतीय रुपया, अमेरिकन डॉलर वा ब्रिटीश पौंड यांच्यासारखे नसते. कोणत्याही देशाचे सरकार वा बँक हे चलन छापत नाही. ‘क्रिप्टोकरन्सी’ ही केवळ ऑनलाईन उपलब्ध असते. जशी जगभरात रुपया, डॉलर, युरो, पाऊंड अशी विविध चलने आहेत, तशाच जगभरात वेगवेगळ्या ‘क्रिप्टो करन्सीज’ही आहेत. यातील ‘बिटकॉईन’ क्रिप्टोकरन्सी साधारण दशकभरापूर्वी चालू करण्यात आली होती. फेसबूक त्याची ‘लिब्रा’ नावाची क्रिप्टोकरन्सी चालू  करायची सिद्धता करत आहे.