तालिबानने भारताशी व्यापारी संबंध तोडले !

सुका मेवा महाग होण्याची शक्यता

जे तालिबानने प्रथम केले, ते भारताने करणे आवश्यक होते. भारताने तालिबानची सर्वच स्तरांवर कोंडी करून त्याला जन्माची अद्दल घडवणे आवश्यक ! – संपादक

नवी देहली – तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर हळूहळू त्याचे रंग उधळणे चालू केले आहे. तालिबानने भारताशी व्यापारी संबंध तोडले असून भारतासमवेत असलेली सर्व प्रकारची आयात आणि निर्यात थांबवली आहे, अशी माहिती ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशन’चे महासंचालक डॉ. अजय सहाई यांनी दिली आहे.

१. वृत्तसंस्थेशी बोलतांना डॉ. सहाई यांनी सांगितले की, या वेळी तालिबानने सर्व मालवाहतूक बंद केली आहे. ही वाहतूक सुरळीत चालू करण्यासाठी आम्ही अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

२. भारत हा अफगाणिस्तानचा सर्वांत मोठा भागीदार आहे. भारत अफगाणिस्तानला साखर, चहा, कॉफी, मसाला यांसह अन्य वस्तूंची निर्यात करतो, तर सुका मेवा, कांदे इत्यादी मोठ्या प्रमाणावर आयात करतो. त्यामुळे आताच्या स्थितीत सुक्या मेव्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.