मुंबई महापालिकेच्या कोरोनावरील लसीकरण मोहिमेचे मुंबई उच्च न्यायालयाकडून कौतुक !

डावीकडून मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबई महापालिका

मुंबई – घरोघरी जाऊन कोरोनावरील लसीकरण करण्याची मोहीम योग्य दिशेने चालू आहे, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेच्या लसीकरण मोहिमेचे कौतुक केले आहे. राज्यातील अन्य महापालिकांनीही याप्रमाणे मोहीम राबवण्याचे आवाहनही न्यायालयाकडून करण्यात आले आहे.

अंथरुणावर खिळलेले रुग्णाईत, तसेच वृद्ध आणि अपंग यांना केंद्रशासनाच्या लसीकरण मोहिमेचा लाभ घेता येत नाही. यासाठी त्यांना घरी जाऊन लस देण्यात यावी, यासाठी अधिवक्त्या धृती कपाडिया आणि अधिवक्ता कुणाल तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली होती. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी ‘अशा किती नागरिकांना लस देण्यात आली ?’ याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. यावर ३० जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत शहरातील ४ सहस्र ८८९ नागरिकांपैकी १ सहस्र ३१७ नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती पालिकेकडून न्यायालयाला देण्यात आली. लस घेतल्यानंतर नागरिकांवर होणार्‍या परिणामांविषयी पालिकेकडून काळजी घेण्यात यावी, अशी मागणीही याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती. त्याविषयीही न्यायालयाकडून पालिकेला सूचना देण्यात आल्या.