कोरोनासुर आणि काळ !

‘कोरोना’

सध्या भारतात सर्वांच्याच तोंडी सर्वाधिक वेळा येणारा आणि एकमेव असा शब्द म्हणजे ‘कोरोना’ ! काही जण कोरोनाच्या संसर्गाकडे गांभीर्याने पहातात, तर काही जण ‘कोरोना वगैरे सगळे थोतांड आहे, कोरोना अस्तित्वातच नाही’, असेही म्हणत बेफिकीर रहातात. अर्थात् कोरोना जर थोतांड असते, तर संपूर्ण विश्वभरात मृत्यूचे इतके थैमान माजलेच नसते. त्यामुळे कोरोनाकडे किती गांभीर्याने पहायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असे असले, तरी ‘प्रत्येक गोष्टीवर काळ हेच उत्तर असते’, असे आपण म्हणतो, त्यानुसार ‘कोरोनाविषयीचे गांभीर्य निर्माण करण्यातही ‘काळ’च अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे’, असे म्हणता येईल. काळ कुणासाठी थांबत नसतो. कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली. प्रत्येक लाटेनंतरचा काळ हा थोडा निवांत आणि सुटकेचा निःश्वास सोडता येईल, असा राहिला; पण तितक्यात पुढील लाटेचे संकट समोर येऊन ठेपतेच. आताही तीच स्थिती उद्भवली आहे. दुसर्‍या लाटेच्या भीषण तडाख्यातून आपण थोडे बाहेर येतो न येतो, तोच तिसर्‍या लाटेची भविष्यवाणी अनेक तज्ञांकडून वर्तवली जात आहे. असे असतांनाही ‘तिसरी लाट येणारच नाही’, अशी ‘री’ अनेक बुद्धीवाद्यांकडून ओढली जात आहे. तज्ञ मंडळी संशोधन आणि अभ्यास करून अशी विधाने करतात. संत त्रिकालज्ञानी असल्याने तेही संकटांविषयी सांगतात. त्यामुळे अशांच्या विधानांकडे निष्काळजीपणे पहाण्याची चूक कोणत्याही भारतियाने करू नये. भारतात शिस्त, गांभीर्य, सावधानता, सतर्कता या गोष्टी टिकतच नाहीत. नागरिक मनमानीपणा करतात आणि विनाकारण संकटे ओढवून घेतात. कोरोना हे थोतांड नसून तो असुरच (कोरोनासुर) आहे.

विदेशात थैमान !

सर्वच देशांमध्ये दुसरी लाट ओसरून कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण जरा मंदावले असल्याने सर्व व्यवहार, व्यापार, दळणवळण यांसह अन्य गोष्टीही चालू झाल्या. ‘कोरोना गेला’, असे लोकांचे पालुपद पुन्हा ऐकू येऊ लागले; पण काळाला हे मान्य नाही. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे, नव्हे नव्हे तेथे कोरोनाचा प्रकोप वाढू लागल्याने दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होऊ लागल्याची वृत्ते येत आहेत. काही शहरांमध्ये पुन्हा दळणवळण बंदी घोषित करण्यात आलेली आहे. अमेरिकेत रुग्ण संख्या आणि मृत्यूदर यांतही प्रतिदिन मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. थोडक्यात काय, तर नाही नाही म्हणता म्हणता कोरोनाची तिसरी लाट विदेशात आलीसुद्धा ! भारतातही तज्ञांकडून सांगितले जात आहे की, तिसरी लाट ही लहान मुलांसाठी अधिक धोकादायक आहे. यातही नाक खुपसणार नाहीत, ते भारतीय कसले !  नाकर्त्यांची बडबड चालूच ! काय तर म्हणे तिसरी लाटच येणार नाही. खरेतर ही अतिशयोक्तीच म्हणावी लागेल. आतातरी डोळे उघडून अशांनी शहाणे व्हावे; कारण काळाने पुन्हा आपले रौद्र रूप दाखवण्यास प्रारंभ केलेला आहे. विदेशात लहान मुलांमधील कोरोनाबाधितांचीच संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात भरती होण्याच्या त्यांच्या प्रमाणातही ५९ टक्के इतकी वाढ झालेली आहे. ७ नवजात बालके अतीदक्षता विभागात असून २ बालके व्हेंटिलेटरवर आहेत. ‘युनिर्व्हसिटी ऑफ ब्रिस्टल’चे बालरोग तज्ञ प्रा. ॲडम फिन्न म्हणाले, ‘‘हा आजार पहिल्या दोन लाटांच्या तुलनेने वेगळा आहे.’’ लंडनमधील ‘इम्पिरिअल कॉलेज’चे ‘पीडियाट्रिक इन्फेक्सियस’ (बाल संसर्गजन्य) आजार तज्ञ डॉ. एलिझाबेथ व्हिक्टर यांनी सांगितले, ‘‘बहुतांशी मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्याकडे लक्ष द्यायला हवे.’’ ही स्थिती अशीच राहिली, तर मुलांच्या प्राणांवरही ते बेतू शकते. बेंगळुरूमध्ये ५४३ मुले कोरोनाबाधित आहेत. थोडक्यात काय, तर आतापर्यंतच्या दोन्ही लाटा आणि विदेशातील सद्यःस्थिती पहाता कोरोना हा जाण्यासाठी आलेला नाही, हे सत्य आता नाकारून चालणार नाही. विदेशातील लोकांनी तिसरी लाट स्वीकारलेली आहे. भारत त्यासाठी अपवाद ठरू शकणार नाही. ही सर्व स्थिती भारतासाठी चिंताजनक आहे. अमेरिकेसारख्या देशातील आरोग्य व्यवस्था सक्षम असूनही तेथे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढणे, हे आरोग्य व्यवस्थेचे अपयशच आहे. तेथील रुग्णालयांमध्ये जागाच राहिलेली नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण तेथे वाढत आहेत. तेथील हतबलता जीवघेणीच ठरत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेचे भारतातील आरोग्य व्यवस्थेनेही पुष्कळ तडाखे सोसले आहेत. त्यामुळे तिसर्‍या लाटेची पूर्वसिद्धता अतिशय नियोजनबद्ध आणि पूर्ण कार्यक्षमतेने करणे अत्यावश्यक आहे. त्यापूर्वी लसीकरणात वेगवानता साधायला हवी.

अमेरिकेत तिसर्‍या लाटेचा तडाखा मुलांना बसत आहे. यातून भारताने बोध घ्यायला हवा. महाराष्ट्रात अनेक जण शाळा चालू करण्याच्या मागणीसाठी आग्रही आहेत. सरकारही त्या निर्णयाच्या अनुषंगाने वाटचाल करत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणार्‍यांनाच लोकलमधून प्रवास करता येणार असेल, तर मग लसीकरणच न झालेल्या मुलांच्या शाळांसाठी अट्टाहास आणि आग्रह का ? हे म्हणजे मुलांसाठी धोकादायक ठरणार्‍या तिसर्‍या लाटेच्या तोंडी मुलांना मुद्दामहून देण्यासारखेच आहे. ‘जोपर्यंत मुलांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत मुलांच्या शाळा चालू करणे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारकच ठरेल’, असे अनेक पालकांचे म्हणणे आहे. सरकार आणि प्रशासन यांनीही याचा गांभीर्याने विचार करावा. संपूर्ण विश्व सध्या एका मागोमाग येणार्‍या संकटांचा सामना करत आहे. कोरोनाच्या जोडीला चक्रीवादळ, महापूर, भूकंप ही संकटे आहेतच. लोकांना अजूनही या संकटांचे गांभीर्य वाटत नाही. त्यामुळे जरा परिस्थिती निवळली की, लोक गाफील रहातात; परंतु आता असे चालणार नाही. काळाची पावले गतीने पडत असल्याने संकटांची मालिका कदापि थांबणार नाही. उलट संकटांना सामोरे जाण्यासाठी क्रियमाणाचा योग्य वापर करून ईश्वराची आराधना करणे, हेच कालसुसंगत ठरेल !