कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात १२५ पत्रकारांची आरोग्य पडताळणी !

‘डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन’च्या आधुनिक वैद्यांचे स्वागत करतांना ‘कोल्हापूर प्रेस क्लब’चे प्रतिनिधी

कोल्हापूर, ८ ऑगस्ट – ‘कोल्हापूर प्रेस क्लब’ आणि मुंबई येथील शिवसेना खासदार ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना, तसेच पूरकाळात आघाडीवर काम करणार्‍या पत्रकारांसाठी ७ ऑगस्टला ‘कोल्हापूर प्रेस क्लब’ येथे आरोग्य पडताळणी शिबिर घेण्यात आले. याचा लाभ १२५ पत्रकारांनी घेतला. तज्ञ आधुनिक वैद्यांनी पत्रकारांची आरोग्य पडताळणी करून आवश्यक ती औषधे दिली. या वेळी पत्रकारांना ‘फाऊंडेशन’च्या वतीने प्रथमोपचाराचे साहित्य देण्यात आले.

या शिबिरात हृदयविकार, मधुमेह यांसह अन्य आजारांची पडताळणी करण्यात आली. या वेळी सर्व पत्रकारांना धनुर्वाताचे इंजेक्शन देण्यात आले. थंडी, ताप, डोकेदुखी, खोकल्यासह ‘क’ जीवनसत्त्व आणि ‘कॅल्शिअम’च्या गोळ्या देण्यात आल्या. ‘डॉ. शिंदे फाऊंडेशन’चे डॉ. जे.बी. भोर आणि त्यांचे पथक यांनी ही पडताळणी केली. समन्वयक मंगेश चिवटे यांनी शिबिराच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. ‘कोल्हापूर प्रेस क्लब’चे उपाध्यक्ष विजय केसरकर यांनी प्रास्ताविक केले, तर कार्याध्यक्ष उद्धव गोडसे यांनी डॉक्टरांच्या पथकाचे स्वागत केले. या वेळी ‘प्रेस क्लब’चे सर्व पदाधिकारी, संचालक यांसह पत्रकार उपस्थित होते.