वारंवार येणार्‍या संकटांच्या पार्श्वभूमीवर कोकणात स्वतंत्र आपत्ती प्रबंधन यंत्रणा उभारण्याची मागणी

पूरस्थितीविषयी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे २६ मागण्या

डावीकडून देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – कोकणात वारंवार येणार्‍या नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर कोकणात स्वतंत्र आपत्ती प्रबंधन यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्यात झालेल्या अतीवृष्टीनंतर देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येथे दौरा केल्यानंतर हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले असून या पत्रात विविध २६ मागण्या त्यांनी केल्या आहेत.

या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या काही मागण्या खालीलप्रमाणे

१. वर्ष २०१९ मध्ये निकषांच्या बाहेर जाऊन साहाय्य करण्यात आले होते. त्याप्रमाणे सद्य:स्थिती पाहून नागरिकांना अधिकचे साहाय्य करण्यात यावे.

२. दुकाने, घरे यांमधून गाळ काढण्यासाठी नागरिकांना रोखीने किंवा अधिकोषात तातडीने भरपाई देण्यात यावी.

३. मृतांचे कुटुंबीय आणि पूरग्रस्त नागरिक यांना तातडीने साहाय्य करण्यासाठी स्वतंत्र निधी तातडीने घोषित करून त्याचे वितरणही तातडीने करण्यात यावे.

४. पूरग्रस्त भागातील नागरिकांना ज्यासाठी व्यय करावा लागत आहे, त्या विविध कामांसाठी तातडीने निधीची तरतूद करण्यात यावी.

भूगर्भ शास्त्रज्ञांच्या माध्यमातून अभ्यास करून धोकादायक गावांचे नकाशे सिद्ध करण्यात यावेत. दरडींच्या जवळ असलेल्या गावांचे सर्वेक्षण करून त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे. पुराचे पाणी बोगद्यांद्वारे दुष्काळी भागात नेण्यासाठी आखण्यात आलेल्या योजनेला निधी घोषित करण्यात यावा. पूरस्थितीविषयी यापूर्वीच्या सर्व अहवालांचा एकत्रित अभ्यास करून त्यातील शिफारसींवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. दीर्घकालीन उपाययोजनांचा समग्र विचार करण्यासाठी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवा, अशा उपाययोजना करण्याचे आवाहनही या पत्रात केले आहे.