मराठी माध्यमातून शिक्षण देणार्‍या शिक्षणसंस्थांना वसाहत शुल्कामध्ये सिडकोची ५० टक्के सवलत

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत प्रत्येकानेच त्याचे योगदान देण्याची आवश्यकता आहे !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – मराठी माध्यमातून शिक्षण देणार्‍या नवी मुंबई आणि सिडकोच्या नवीन शहर प्रकल्पांतील शिक्षणसंस्थांना विविध प्रकारच्या वसाहत शुल्कांमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे. महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीचा प्रसार आणि संवर्धन करण्यामध्ये मराठी शाळा महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याने त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या धोरणानुसार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

याविषयी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, शहरांचे नियोजन म्हणजे केवळ इमारती उभ्या करणे नसून सामाजिक विकासही महत्त्वाचा आहे. त्याच अनुषंगाने रस्ते आणि इमारतीं यांसमवेत कला, क्रीडा, संस्कृती, शिक्षण इत्यादींच्या विकासासाठीही सिडको कार्यरत असून मराठी भाषेतून शिक्षण देणार्‍या शाळांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे, हे सरकारचे धोरण आहे. याचसाठी अशा शाळांना वसाहत शुल्कांमध्ये सवलत देण्याचा सिडकोने निर्णय घेतला असून त्याचा लाभ या शाळा आणि विद्यार्थी यांना होणार आहे. नवी मुंबईमध्ये एकूण ११७ भूखंडांचे वाटप सिडकोकडून शिक्षणसंस्थांना करण्यात आले आहे.