महापौरांनी नगरसेवकाच्या दिशेने नेमप्लेट भिरकावली, तर सभापतींची नगरसेवकाला अश्‍लील शिवीगाळ

चंद्रपूर येथील महापालिकेच्या आमसभेत गोंधळ

  • नैतिकता नसलेले असे लोकप्रतिनिधी जनतेच्या समस्या कधीतरी सोडवू शकतील का ?
  • समस्या सोडवणे आणि विकासकामांना गती देणे यांसाठी सभा आयोजित केली जाते. याचे जराही भान न ठेवता वाद घालणार्‍या नगरसेवकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. त्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !

चंद्रपूर – येथे झालेल्या महापालिकेच्या आमसभेत महापौर राखी कंचर्लावार यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला पटलावरील नावाची पट्टी (नेमप्लेट) मारली, तर स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी हे नगरसेवक नंदू नागरकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून गेले. सभागृहातील हा गोंधळ शांत करण्यासाठी आयुक्त राजेश मोहिते यांना महापौर आणि सभापती यांना हात जोडून विनंती करावी लागली. या लाजिरवाण्या प्रकारामुळे सभा स्थगित करावी लागली.

१. या प्रकाराला विरोधकांची कृती कारणीभूत आहे, असा आरोप करत महापौरांनी काँग्रेसच्या सदस्यांवर योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.

२. महापौर आणि सभापती यांच्याविरोधात काँग्रेसचे नगरसेवक नागरकर यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे, तर नागरकर यांच्या विरोधात महापौरांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. महापौरांनी नागरकर यांना निलंबित केले आहे.

३. मनसेचे नगरसेवक सचिन भोयर यांनी विनाअनुमती बळजोरीने सभागृहात प्रवेश करणार्‍या नागरिकांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

४. महापौरांचे पती नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी सभेत अधिकार्‍यांना अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ केल्यामुळे अधिकारी संतापले आहेत. त्यामुळे नगरसेवक कंचर्लावार यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करणार आहे, अशी माहिती उपायुक्त विशाल वाघ यांनी दिली.