पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये, यासाठी स्वच्छता आणि आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

रस्ते दुरूस्तीसह वीज आणि पाणी पुरवठा तातडीने करण्याचे निर्देश

मुंबई – पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने चालू करण्यात यावा. अनेक ठिकाणी रस्ते खचले असून पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने चालू होईल, यासाठी दुरुस्तीची कामे हाती घ्या. पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये, यासाठी स्वच्छता आणि आरोग्य यांच्या सुविधा पुरवण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय यंत्रणेला दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २६ जुलै या दिवशी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीत राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांसह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले,

१. पुरामुळे झालेल्या हानीची आकडेवारी आणि त्यावर करावयाचे साहाय्य यांचा वस्तूनिष्ठ अहवाल सिद्ध करा, म्हणजे आपदग्रस्तांना वेळेत आणि तातडीने साहाय्य पोचवता येईल.

२. पुराचा फटका बसलेले सर्वच व्यापारी, व्यावसायिक यांची माहिती एकत्र करा. त्यांना राज्य आणि केंद्र शासन यांच्या कोणकोणत्या योजनांमधून साहाय्य करता येईल, याविषयीचा प्रस्ताव सिद्ध करा.

३. पुन्हा आपत्ती उद्भवू नये, त्यातून साहाय्य करता येईल, यासाठी पूरसंरक्षक भिंती, धोकादायक वस्त्या यांविषयी जिल्हानिहाय प्रस्ताव सिद्ध करा. डोंगराळ भागातील खचणारे रस्ते, पायाभूत सुविधा यांविषयी एक सर्वंकष आराखडा सिद्ध करा.

४. ‘ड्रोन’, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून पंचनामे वेळेत पूर्ण करावेत. कोकणातील खोर्‍यांमध्ये पुराची कल्पना देणारी यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित करा. पहिल्या टप्प्यात ७ नद्यांवर येत्या ३ मासांत जलसंपदा विभागाकडून अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

धोकादायक स्थितीतील वस्त्यांचे पुनर्वसन करण्याचा आराखडा सिद्ध करण्याचा आदेश

महाड येथील तळीये गावांचे पुनर्वसन करण्यासाठी योग्य जागा निश्चित करा. तेथील सोयी-सुविधा यांचे नियोजन करा. त्यासाठी उद्योजकांचे साहाय्य घ्या. गावकर्‍यांना शेतीसाठी अडचण येणार नाही, असे बघा. त्यांच्या घरांचा आराखडा त्वरित सिद्ध करून कार्यवाही करा. डोंगर-उतारांवरील वाड्या आणि वस्त्या ग्रामीण भागात अन् शहरी भागांमध्येही आहेत. अशा धोकादायक स्थितीतील वाड्या-वस्त्यांचे कशा पद्धतीने पुनर्वसन करता येईल ? यावर निश्चित असा आराखडा सिद्ध करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

९ लाख ५९ सहस्र ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

पुरामुळे राज्यातील १४ सहस्र ७३७ ‘ट्रान्सफॉर्मर्स’ नादुरूस्त झाले होते. त्यांपैकी ९ सहस्र ५०० दुरुस्त झाले आहेत. नादुरुस्त ६७ उपकेंद्रांपैकी ४४ पुन्हा चालू करण्यात आले आहेत.

९ लाख ५९ सहस्र ग्राहकांचा वीजपुरवठा पुरामुळे खंडित झाला होता. त्यापैकी ६ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

राज्य आपत्ती निवारण दलाचे बळकटीकरण करण्याचे निर्देश

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राज्य आपत्ती निवारण दलाचे बळकटीकरण असावे, तसेच त्याठिकाणी साहाय्य करण्याचे आणि वाचवण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे, यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश या वेळी उद्धव ठाकरे यांनी दिलेत.