सातारा, २७ जुलै (वार्ता.) – पाटण तालुक्यात दरडी कोसळण्याचे सत्र चालू असतांनाच अतीवृष्टीमुळे नदी आणि ओढे यांवरील पूलही तुटले आहेत. जितकरवाडी येथील नदीवरील पूल तुटल्यामुळे गावातच अडकून पडलेल्या २३ कुटुंबांतील ९३ नागरिकांना महसूल आणि पोलीस प्रशासन यांच्या सहाय्याने जिंती येथील माध्यमिक विद्यालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे. नदीवरील पूल तुटल्यामुळे पुलाला शिड्या लावून नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले आहे.
जितकरवाडी येथे गत २-३ दिवसांपासून अतीवृष्टी चालू आहे. त्यामुळे डोंगर खचून दरडी कोसळत आहेत. घरांपासून काही अंतरावर हा प्रकार चालू असल्यामुळे ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण होते. काळजी घेण्यासाठी प्रशासनाने ग्रामस्थांना स्थलांतरीत होण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र अतीवृष्टीमुळे नदीवरील पूल तुटल्यामुळे ग्रामस्थ आहे तिथेच अडकून पडले होते. २ दिवस पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी अन् कर्मचारी जितकरवाडीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत होते; मात्र अतीवृष्टीमुळे त्यांना गावापर्यंत पोचता येत नव्हते. अर्ध्या वाटेतूनच माघारी फिरावे लागत होते. पावसाने थोडी उघडीप दिल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाचे पथक जितकरवाडीपर्यंत पोचले. प्रशासनाच्या आवाहनानंतर घाबरलेल्या जितकरवाडीकरांनी आढेवेढे न घेता स्थलांतरीत होण्यासाठी घराला कुलुपे लावून आणि जीवनावश्यक साहित्य घेऊन बाहेर पडण्यास प्रारंभ केला.