तळीये (महाड) येथे झालेल्या भूस्खलनाचे प्रकरण
मुंबई – तळीये (महाड) येथे झालेल्या भूस्खलनात ३२ घरे मातीखाली गाडली गेली आहेत. या दुर्घटनेला ४ दिवस होऊनही अद्यापही काही व्यक्तींचा शोध लागलेला नाही. आतापर्यंत मातीच्या ढिगार्यात गाडले गेलेले ५३ मृतदेह सापडले आहेत. अद्याप ३१ नागरिक बेपत्ता आहेत. ढिगार्याखाली मृतदेहांचे हात-पाय आदी अवयव सापडत असल्याचे हृदयद्रावक चित्र येथे पहावयास मिळत आहे. यामुळे मृतदेहांची होत असलेली विटंबना टाळावी, यासाठी बेपत्ता असलेल्या ३१ व्यक्तींना मृत घोषित करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने शोध आणि बचाव कार्य थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल आहे. मातीच्या ढिगार्याखाली ४ ते ६ फूट खोदल्यानंतर मृतदेह सापडत आहेत. त्यातच मृतदेहांचे अवयव वेगवेगळे सापडत असल्यामुळे गावचे सरपंच आणि ग्रामस्थ यांनी ‘शोधमोहीम थांबवून बेपत्ता ग्रामस्थांना श्रद्धांजली वहाण्यात यावी’, अशी विनंती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे.
काही दुर्घटनामद्धे ३६ घंट्यांनंतरही वृद्ध आणि लहान मुले हेही ढिगार्याखालून जिवंत सापडल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे कुणीतरी जिवंत सापडू शकेल. ‘जोपर्यंत शेवटचा मृतदेह सापडत नाही, तोपर्यंत जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न चालू रहातील’, असे ग्रामस्थांना समजावून सांगितले असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. तथापि यानंतरही ग्रामस्थांनी ठाम रहात शोधमोहीम थांबवण्याची विनंती केली. त्यामुळे याविषयी सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून बचावकार्य थांबवण्यात आले.