‘कॅट’चे आवाहन !

‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (‘कॅट’ने) देशभरात ‘भारतीय वस्तू – आमचा अभिमान’ या घोषणेसह चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम २१ जुलै २०२१ पासून चालू केली आहे. या मोहिमेअंतर्गत डिसेंबर २०२१ पर्यंत चीनमध्ये उत्पादित झालेल्या वस्तूंची आयात भारतात १ लाख कोटी रुपयांनी न्यून करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

 

भारतात वर्ष २००१ मध्ये चिनी वस्तूंची आयात २ अब्ज डॉलर्स होती, जी आता वाढून ७० अब्ज डॉलर्स झाली आहे, म्हणजे गेल्या २० वर्षांत चीनकडून आयात करण्यामध्ये सहस्रो पटींनी वाढ झाली. यातून चीन भारताचा किरकोळ बाजार हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक चीनमधून आयात केलेल्या वस्तू बर्‍याच काळापासून भारतात सिद्ध केल्या जात आहेत. तरीही भारतियांनी स्वदेशी वस्तू खरेदी न करता चिनी वस्तूंना प्राधान्य दिले. ‘याचे कारण म्हणजे भारतियांमधील राष्ट्रप्रेमाचा अभाव’, असेच म्हणावे लागेल. अमेरिकेने जपानमधील बाजारपेठेत स्वस्तात इलेक्ट्रॉनिक आणि घरगुती वस्तूंची विक्री करण्याचा प्रयत्न केला. यातून अमेरिकेला जपानची बाजारपेठ हस्तगत करायची होती; मात्र देशाप्रती स्वाभिमान असल्याने त्यांनी अमेरिकेच्या वस्तूंकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यांनी एक प्रकारे त्यावर बहिष्कारच घातला.

भारतीय व्यापार्‍यांना चिनी वस्तूऐवजी स्वदेशी वस्तूंची विक्री आणि खरेदी करण्याची विनंती देशवासियांना करावी लागते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांच्यावर अशी वेळ का आली ? याचा प्रत्येक भारतियाने विचार करणे आवश्यक आहे. जपानच्या लोकांप्रमाणे भारतीय वस्तूंविषयी देशवासियांचे प्रेम असायला हवे. चीन हा भारताचा शत्रू असल्याने त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घालून भारतियांनी स्वाभिमान दाखवून दिला पाहिजे. भारतात सिद्ध होणार्‍या वस्तू भारतियांनी घेतल्या, तर त्याचा देशातील व्यापारी आणि दुकानदार यांचा लाभ होणार आहे, तसेच अनेकांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. त्यामुळे देशातील बेरोजगारी नाहीशी होऊन देशाची अर्थव्यवस्थाही भक्कम होईल, यात शंका नाही !

– श्री. सचिन कौलकर, मुंबई