आपत्काळातील हिंदूंचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना !

२३ जुलै २०२१ या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमेमध्ये सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केलेले मार्गदर्शन

‘२३ जुलै या दिवशी झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमामध्ये ‘आपत्काळातील हिंदूंचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना !’ यांविषयी  मार्गदर्शन करण्यात आले होते. ‘सनातन प्रभात’च्या वाचकांना हा विषय कळावा, यासाठी लेख स्वरूपात तो येथे प्रसिद्ध करत आहोत.

सद्गुरु नंदकुमार जाधव

१. कोरोनाच्या आपत्काळातही गुरुकृपेमुळे गुरुपौर्णिमा साजरी करण्याची संधी मिळाल्याविषयी कृतज्ञता !

कोरोना महामारीरूपी आपत्काळ चालू असतांनाही श्रीगुरूंच्या कृपेमुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून गुरुपौर्णिमा साजरी करण्याची संधी मिळाली, यासाठी सर्वप्रथम श्रीगुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया. ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’, असे म्हटले आहे; म्हणजे शिष्याचे परममंगल, अर्थात् मोक्षप्राप्ती, ही त्याला केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते. गुरुकृपा प्राप्त होण्यासाठी सतत गुरुतत्त्वाला अपेक्षित अशी साधना करावी लागते. साधना म्हणजे काय ? तर मोक्षप्राप्तीसाठी किंवा भगवद्प्राप्तीसाठी प्रतिदिन केले जाणारे प्रयत्न !

२. आपत्काळात स्वतःसह सत्त्वगुणी हिंदूंचे रक्षण करणे आणि आपत्काळातील संकटांनंतर राष्ट्रीय जीवन स्थिर होणे अन् हिंदु राष्ट्राची स्थापना करणे यांसाठी कृतीशील होणे आवश्यक !

या वर्षी गुरुपौर्णिमेला गुरुमहिमा, साधना, अध्यात्म आदी विषयांपेक्षा ‘आपत्काळातील हिंदूंचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. आपत्काळ म्हणजे काय ? ज्या काळात संकटे किंवा आपत्ती यांमुळे दैनंदिन जीवन जगणे कठीण होते, तसेच राष्ट्रीय जीवनही अस्थिर होते, तो काळ म्हणजे आपत्काळ ! ‘आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना करायला हवी’, अशी सर्वसाधारण धारणा आहे; मात्र सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी भीषण आपत्काळाविषयी जागृती करून ‘आगामी काळात जिवंत रहाण्यासाठी तरी साधना करा’, असे म्हटले आहे.

कोरोना महामारीच्या काळात भाजीपाला मिळण्यामध्ये अडचणी येणे, औषधांचा तुटवडा जाणवणे, जीवनावश्यक वस्तूंची चढ्यादराने विक्री होणे, वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी संघर्ष करावा लागणे अशा कितीतरी गोष्टी आपल्यापैकी अनेकांनी अनुभवल्या असतील. या दीड वर्षाच्या काळात राष्ट्रानेही चक्रीवादळे, अतीवृष्टी, उत्तराखंडमध्ये भूस्खलन इत्यादी नैसर्गिक आपत्तींच्या घटना अनुभवल्या. याच काळात देशाने कृषी आणि ‘सीएए’ (नागरिकत्व सुधारणा कायदा) या कायद्यांमुळे झालेल्या दंगली, चीनच्या गलवान खोर्‍यात अतिक्रमणामुळे निर्माण झालेली युद्धजन्य स्थिती अशी मानवनिर्मित संकटेही अनुभवली. येणारा काळ तर यापेक्षाही भीषण असणार आहे. त्यातून तरून जाण्यासाठी पैसा नाही, तर साधनेची पुंजीच उपयोगी पडणार आहे. आपत्काळात स्वतःसह सत्त्वगुणी हिंदूंचे रक्षण करणे आणि आपत्काळातील संकटांनंतर राष्ट्रीय जीवन स्थिर होणे अन् हिंदु राष्ट्राची स्थापना करणे यांसाठी कृतीशील होणे आवश्यक आहे.

३. सर्व सोयीसुविधा असूनही हतबल झालेला मनुष्य भीषण संकटांना कसा सामोरा जाईल ?

२ वर्षांपूर्वी ‘एखाद्या सूक्ष्म विषाणूमुळे संपूर्ण जगाचे दळणवळण ठप्प होईल’, अशी कुणी कल्पनाही केलेली नव्हती. ही महामारी म्हणजे आपत्काळाची छोटीशी झलकच आहे. आगामी २-३ वर्षांत आपत्काळाची भीषणता वाढत जाईल. त्यामुळे त्याला सामोरे जाण्यासाठी आपण सिद्ध असायला हवे. कोरोना महामारीच्या काळात आपल्याकडे भ्रमणभाष, ‘इंटरनेट’, दूरचित्रवाणी अशा सोयीसुविधा, तसेच जीवनावश्यक वस्तूही उपलब्ध होत्या. तरीही समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्विग्नता पसरली. आताच हतबल स्थिती आहे. याहून भीषण संकटांना आपण कशा प्रकारे सामोरे जाणार ? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. हे सांगण्याचा उद्देश भीती निर्माण करणे नसून प्रत्येकाने सावध होऊन आपत्काळाला सामोरे जाण्याची सिद्धता करावी, हा आहे.

४. विश्‍वभरात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि त्यातून झालेली भीषण हानी

गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अतीवृष्टी, पूर, दुष्काळ, चक्रीवादळे, टोळधाड अशा संकटांची वारंवारता आणि तीव्रता वाढत आहे. वर्षभराच्या कालावधीत ‘निसर्ग’, ‘अम्फान’, ‘तौक्ते’ आणि ‘यास’ या चक्रीवादळांनी भारताला तडाखा दिला. पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश या क्षेत्रांत टोळधाडीमुळे मोठी हानी झाली. गेल्या ६ मासांत उत्तराखंडमध्ये २ वेळा भूस्खलन होऊन २५० हून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले. अशा घटना केवळ भारतातच नाहीत, तर जगभरातही घडत आहेत. कॅलिफोर्निया आणि ऑस्ट्रेलिया येथील वनांमध्ये गेल्या २ वर्षांमध्ये भयंकर आगी लागून शेकडो एकर भूमीवरील नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट झाली. नुकतेच अमेरिकेतील टेक्सास प्रांतात झालेल्या अतिप्रचंड हिमवर्षावामुळे तेथे सरकारला आपत्कालीन परिस्थिती घोषित करावी लागली. तांब्याभर गरम पाणी आणि गरम जेवण मिळवण्यासाठी लोकांना ४-४ घंटे रांगेत उभे रहावे लागले. एका संतांनीही आगामी काळात ‘पंचमहाभूतांचे तांडव पहायला मिळेल’, असे म्हटले आहे. आगामी काळात पंचमहाभूतांच्या माध्यमातून पृथ्वी आपले संतुलन साध्य करणार आहे, म्हणजेच भूकंप, पूर, दुष्काळ अशी संकटे येणार आहेत.

५. कोरोनाचे झालेले दूरगामी परिणाम

आताही कोरोनाच्या निमित्ताने अनेकांनी अनुभवले असेल की, कोरोना हा संसर्गजन्य शारीरिक आजार असला, तरी अर्थव्यवस्थेपासून कुटुंबव्यवस्थेपर्यंत त्याचे दुष्परिणाम झालेले आहेत. ‘सी.एम्.आय.ई.’ म्हणजे ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या अहवालानुसार कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये भारतात १ कोटीहून अधिक जण बेरोजगार झाले, तर ९७ टक्के कुटुंबांच्या आर्थिक उत्पन्नात घट झाली. बेरोजगारीचा दर ३-४ टक्के असेल, तर तो सर्वसामान्य मानला जातो; मात्र मे २०२१ मध्ये बेरोजगारीचा दर जवळपास १२ टक्के होता. कोरोनाच्या काळात अनेक शहरांमध्ये घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. मुंबईमध्ये हे प्रमाण नेहमीपेक्षा जवळपास तिप्पट म्हणजे ३०० टक्के अधिक होते.

६. जागतिक युद्धजन्य स्थिती आणि तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी

विश्‍वस्तरावर नैसर्गिक आपत्ती येत असतांनाच दुसरीकडे जागतिक स्तरावरही अस्थिर परिस्थितीच दिसून येते. कोरोना महामारीमुळे चीनविरोधात जगभरातील अनेक राष्ट्रे एकवटली आहेत, तर दुसरीकडे कुरापतखोर चीनचा हेकेखोरपणा वाढत आहेे. उत्तर कोरिया-अमेरिका यांमध्येही अण्वस्त्रे नष्ट करण्यावरून चालू असलेला संघर्ष शांत झालेला नाही. अमेरिका आणि रशिया यांमधील शीतयुद्ध पुन्हा चालू झाले आहे. आर्मेनिया-अझरबैजान या देशांमध्ये काही मासांपूर्वी लढाई झाली. इस्रायल-पॅलेस्टाईन यांमध्येही लढाई झाली. इस्रायलच्या बाजूने अमेरिका-इंग्लंड यांसह जगभरातील २५ देश उभे राहिले, तर मुसलमान राष्ट्रे पॅलेस्टाईनच्या बाजूने उभी राहिली. भारताच्या संदर्भात पाहिले, तर गलवान खोर्‍यात झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर आधीच तणावग्रस्त असणारे भारत-चीन संबंध आणखी ताणले गेले आहेत. ठिकठिकाणी पडणार्‍या युद्धाच्या ठिणग्यांचा कधीही भडका उडून तिसरे जागतिक महायुद्ध चालू होऊ शकेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या युद्धात स्वतःसह राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला सैनिकाप्रमाणे भूमिका बजावावी लागेल.

६ अ. युद्धपरिस्थितीचे भेडसावणारे दूरगामी परिणाम

१. युद्धजन्य स्थितीमध्ये पेट्रोल, डिझेल, इंधन यांच्या वापरावर निर्बंध येऊ शकतात. इंधन आणि जीवनावश्यक वस्तू महाग होतात.

२. दुसर्‍या महायुद्धात जेव्हा इंग्लंडने जर्मनीच्या विरोधात युद्ध छेडले, तेव्हा ब्रिटनमध्ये पहिल्या ४ दिवसांमध्येच १३ लाख लोकांचे स्थलांतर करावे लागले. त्या काळात प्रकाशबंदी म्हणजे ‘ब्लॅक आऊट’ करण्यात आला होता. खिडकीतून किंवा दारातून प्रकाशाचा एक कवडसाही बाहेर आला, तरी लोकांना दंड दिला जात असे. ब्रिटनमध्ये एवढे कठोर निर्बंध १-२ दिवस किंवा १-२ मास नाही, तर सलग ५ वर्षे होते.

३. युद्धकाळ किंवा आपत्काळ असेल, तर दळणवळणावर मर्यादा येतात. त्यामुळे सरकारी यंत्रणा सर्वत्र साहाय्यासाठी पोचू शकत नाहीत. सरकार करत असलेल्या साहाय्यकार्यात अडथळेही येऊ शकतात. स्वयंपाकाचा गॅस, खाण्या-पिण्याच्या वस्तू आदींचा तुटवडा भासतो. त्याचा अपलाभ घेत वितरण-व्यवस्थेत भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता असते.

४. सध्याही कोरोनाच्या लसीकरणातील घोटाळा समोर येत आहे. सरकार काही वस्तूंचे शिधाकरण (रेशनिंग) चालू करून वा ‘औषध-वाटप केंद्रे’ उघडून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु सरकारच्या साहाय्यकार्यालाही मर्यादा येतात.

५. आधुनिक वैद्य, औषधे, रुग्णालये आदी सहजपणे उपलब्ध होणे कठीण असते.

हे सर्व लक्षात घेऊन या आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक आणि आध्यात्मिक आदी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आजपासूनच आवश्यक आहे.

७. आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी करावी लागणारी विविध टप्प्यांवरील सिद्धता

आपण आपत्काळाच्या दृष्टीने आवश्यक असणार्‍या विद्या, तसेच कौशल्ये शिकून घ्यायला हवीत. स्वरक्षण, प्रथमोपचार, अग्नीशमन प्रशिक्षण, जलतरण, वाहन चालवायला शिकणे अशा प्रकारच्या गोष्टी शिकण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे. कौटुंबिक आवश्यकतांचा विचार करता, पुढील काही काळ टिकेल, अशा पुरेशा प्रमाणात अन्नधान्याची साठवणूक करावी लागेल. आपत्काळात वैद्यकीय उपचार उपलब्ध होऊ शकतील, याची शाश्‍वती देता येणार नाही. आता कोरोना काळातच आपल्यापैकी अनेक जणांनी त्याचा अनुभव घेतला असेल.

या पार्श्‍वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या बिंदूदाबनासारख्या विद्या शिकून घेतल्या किंवा आपल्या अंगणात किंवा शेतीमध्ये औषधी वनस्पतींची लागवड केली, तर ते उपयुक्त ठरेल. आपत्काळाचा तडाखा महानगरांना बसण्याची शक्यता अधिक असल्याने आपल्याला शक्य असेल, तर मोठ्या शहरांपासून दूर, पाण्याच्या मोठ्या जलसाठ्यापासून दूर अशा प्रकारे पर्यायी जागेत स्थलांतर करण्याच्या दृष्टीने सिद्धता करायला हवी.

आपल्याला शक्य होईल, त्याप्रमाणे सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे बसवावीत. घराजवळ विहीर खणावी. दैनंदिन जीवनात विद्युत् यंत्रांचा न्यूनतम वापर करून पारंपरिक पद्धतीने कशी कामे करता येतील, ते शिकून घ्यावे आणि त्याचा सराव करावा, उदा. मिक्सर वापरण्याऐवजी जाते किंवा पाटा-वरवंटा वापरणे, गाड्यांऐवजी सायकल वापरण्याचा सराव करणे, घोडागाडी-बैलगाडी चालवण्यास शिकून घेणे, भ्रमणभाषचा अनावश्यक वापर पूर्णपणे टाळणे, स्वत:च्या आवडी-निवडी न्यून करण्याचा प्रयत्न करणे, प्राप्त परिस्थिती स्वीकारून तिला सकारात्मक राहून सामोरे जाणे, अशा अनेक गोष्टींचा आतापासूनच सराव केला, तर आपल्याला आपत्काळ सुसह्य होईल.

७ अ. आपत्कालीन सिद्धतेविषयी मार्गदर्शन करणार्‍या सनातनच्या ग्रंथांचा लाभ घ्या ! : आपत्काळाची सिद्धता करण्याच्या संदर्भात अतिशय उपयुक्त ठरतील, असे ग्रंथही सनातनने प्रकाशित केले आहेत. ते www.sanatanshop.com या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांचा आवर्जून लाभ घ्यावा. आपल्या संपर्कातील सनातनच्या साधकांकडूनही ते ग्रंथ मागवू शकता.

८. आपत्काळात हिंदूंचे रक्षण होण्यासाठी काय करावे ? 

८ अ. आपत्काळाच्या दृष्टीने समाजाचे प्रबोधन करणे ही काळानुसार पूरक समष्टी साधना ! : आतापर्यंत वरील सूत्रांतून ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी प्रत्येकाला सिद्धता करावी लागणार आहे’, याची जाणीव सर्वांना निश्‍चितच झाली असेल. या भीषण आपत्काळात केवळ स्वतःच्या रक्षणापुरते मर्यादित राहू नका, तर आपल्या संपर्कातील प्रत्येकाचे आपत्काळात जीवितरक्षण होण्यासाठी करायच्या पूर्वसिद्धतेच्या संदर्भात प्रबोधन करा ! असे प्रबोधन ही काळानुसार पूरक समष्टी साधनाच आहे, हे लक्षात घ्या ! अशा प्रबोधनातून आपत्काळात अनेक हिंदूंचे प्राण वाचतील !

८ आ. अन्य कृती : आपत्काळाला सामोरे जाण्याच्या दृष्टीनेे जनजागृती करणे, सनातनच्या आपत्कालीन ग्रंथमालिकेतील ग्रंथ नातेवाईक, मित्र, सार्वजनिक वाचनालये आदींना भेट द्या ! ‘आपत्काळाला सामोरे जाण्याच्या दृष्टीनेे करायची सिद्धता’ या विषयावर आपल्या परिचितांसाठी व्याख्याने आयोजित करा ! यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आपल्याला सर्वतोपरी साहाय्य करतील !

८ इ. संत, साधक, भक्त आणि सज्जन हिंदू यांना प्राधान्याने सर्वतोपरी साहाय्य करावे ! : या आपत्काळात मोठ्या प्रमाणात प्राणहानी होणार असली, तरी त्यापैकी काही जणांचे तरी प्राण वाचवण्यासाठी आपल्याला स्वक्षमतेनुसार प्रयत्न करावे लागतील. या संकटकाळात नैसर्गिक आपत्ती, दंगली आदींमध्ये फसलेल्या सर्वच हिंदूंना वाचवता येणार नाही; मग अशा वेळी संत, साधक, भक्त आणि सज्जन हिंदू यांना प्राधान्याने सर्वतोपरी साहाय्य करावे. अशा वेळी गुंड, भ्रष्टाचारी, बलात्कारी आदींना वाचवण्यासाठी प्रयत्न करू नयेत; कारण पृथ्वीवर भार असलेल्या अशांना ईश्‍वरही वाचवत नाही.

९. आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी संधीकाळाचा लाभ घेऊन साधना करा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपत्काळात साधनेचे महत्त्व स्पष्ट करतांना म्हटले आहे की, अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.

भगवान श्रीकृष्णाने ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’, म्हणजे ‘माझ्या भक्तांचा कधी नाश होणार नाही’, असे वचन भक्तांना दिले आहे. त्यामुळे आपण साधना वाढवून देवाचे भक्त होऊया. सध्याचा काळ युगपरिवर्तनाचा आहे. साधनेच्या दृष्टीने संधीकाळ आहे. या काळात केलेल्या साधनेचे फळ अनेक पटींनी मिळते. संधीकाळाचा लाभ घेऊन झोकून देऊन साधना करणे आवश्यक आहे. सनातन संस्थेच्या वतीने प्रत्येक आठवड्यात ‘ऑनलाईन साधना सत्संग’ घेण्यात येतात. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रतिदिन ‘नामजप सत्संग’, ‘भावसत्संग’ आणि ‘धर्मसंवाद’ हे ‘ऑनलाईन सत्संग’ प्रसारित केले जातात. तसेच प्रत्येक शनिवारी आणि रविवारी ‘बालसंस्कारवर्ग’, तर चालू घडामोडींवर हिंदुत्वाच्या दृष्टीकोनातून दिशा देणारा ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ हा विशेष कार्यक्रम प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी प्रसारित केला जातो. या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांचा आवर्जून लाभ घ्या आणि परिचितांनाही त्याविषयी अवगत करा.

आपत्काळ म्हणजे पृथ्वीवरील रज-तमाचा भार हलका करून सत्त्वगुणाचे प्राबल्य निर्माण करण्यासाठी ईश्‍वराने केलेली उपाययोजना आहे. सज्जन लोकांच्या दृष्टीने हा आपत्काळ इष्टापत्तीसारखा ठरणार आहे. त्यामुळे ‘आपत्काळ योग्य कि अयोग्य ?’, याचा विचार न करता ‘आपत्काळातून तरून जाण्यासाठी ईश्‍वराने भक्त बनण्यासाठी दिलेली संधी आहे’, असा विचार सर्वांनी करायला हवा.

१०. हिंदु राष्ट्राची स्थापना

वाईटातून चांगले घडते, तसे या आपत्काळानंतर कालमहिम्यानुसार भारताला चांगले दिवस येणार आहेत. जगभर हिंदु धर्म प्रस्थापित होणार आहे. या काळात भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापित होण्यासाठी आपण सर्वांनी आतापासूनच कृतीशील झाले पाहिजे. सध्या हिंदु धर्म आणि धर्मीय यांच्यासाठी एक प्रकारचा प्रतिकूल काळ आपण सर्व जण अनुभवत आहोत.

१० अ. हिंदु धर्माच्या अपकीर्तीचे षड्यंत्र : आज आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदु धर्म, संस्कृती, साधू-संत, तसेच श्रद्धास्थाने यांना अपकीर्त करण्याचे षड्यंत्र चालू आहे, उदा. नुकतेच कोरोनाच्या संदर्भात कुंभमेळ्याची अपकीर्ती करणारे ‘टूल किट’ हिंदुद्वेष्ट्या राजकारण्यांकडून प्रसारित करण्यात आले. फेेसबूक, ट्विटर यांसारख्या सामाजिक माध्यमांकडून हिंदुत्वाचा प्रसार दडपण्याचा प्रयत्न होत आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची कायद्याच्या चौकटीत असणारी ३५ हून अधिक ‘फेसबूक पेजेस’ बंद करण्यामागे अमेरिकेतील ‘टाइम’ या नियतकालिकाचा हात असल्याचे नुकतेच उघड झाले. फ्रान्समधील ‘शार्ली हेब्दो’ या नियतकालिकाने ऑक्सिजनच्या कमतरतेच्या संदर्भात व्यंगचित्र प्रसिद्ध करतांना ‘३ कोटी ३३ लाख देवता ऑक्सिजनचे उत्पादन करण्यात सक्षम नाहीत’, असे म्हटले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुद्वेष्ट्यांची साखळी विविध माध्यमांतून कार्यरत आहे, हे यातून दिसून येते.

१० आ. हिंदु समाज संकटात आहे ! : सध्या भारतात निधर्मीवादाच्या नावाखाली बहुसंख्य हिंदूंना प्रशासकीय स्तरावर दुय्यम वागणूक मिळते, तर अन्य पंथियांचे लांगूलचालन केले जात आहे. बंगालमध्ये निवडणुकांनंतर मोठ्या प्रमाणात हिंदूंना लक्ष्य करणार्‍या दंगली घडल्या. ईदच्या दिवशी पंजाब सरकारने मलेरकोटला या मुसलमानबहुल प्रांताला ‘स्वतंत्र जिल्हा’ म्हणून घोषित करून त्यासाठी कोट्यवधी रुपयांची खैरात केली. बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अद्वैतनगर या मुसलमानबहुल गावातील सामाजिक सुधारणा समितीने शरीयत कायद्याप्रमाणे फतवा काढत संगीत ऐकणे, दूरचित्रवाणी पहाणे यांवर बंदी घातली. आज पंजाबमध्ये ‘स्वतंत्र खलिस्तान’ची मागणी डोेके वर काढत आहे. उत्तरप्रदेशात काही दिवसांपूर्वी दोन मौलवींनी १ सहस्र हिंदूंना धर्मांतरीत केल्याचे उघड झाले. ख्रिस्ती मिशनरींकडूनही मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर चालूच आहे. तमिळनाडू राज्यात तर हिंदूंचा भाग मुसलमानबहुल आहे. त्यामुळे ‘या भागातून हिंदूंना धार्मिक मिरवणुका काढण्यास बंदी घालावी’, अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली. जिहादी शक्ती हिंदु नेते आणि साधू-संत यांच्या नियोजनबद्ध हत्या करत आहेत. सरकारीकरणाच्या नावाखाली राजकारण्यांकडून हिंदूंची मंदिरे बळकावली जात आहेत.

निधर्मी भारतात सनातन हिंदु धर्माची उपेक्षा रोखायची असेल, तर हिंदु राष्ट्राची एकमुखी मागणी करून त्यासाठी स्वत:चे योगदान द्यावे लागणार आहे.

१० इ. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान द्या ! : रामसेतू बांधत असतांना छोट्याशा खारीने तिचा वाटा उचलला होता. सूर्यास्त झाल्यानंतर अंधार दूर करण्यात पणतीही तिचा वाटा उचलते. आपल्यालाही आपला धर्मसंस्थापनेतील वाटा उचलायचा आहे; म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुतत्त्वाला अपेक्षित योगदान देण्याची बुद्धी आपल्या सर्वांना व्हावी. ‘तुमचे विचार, कौशल्य, वेळ, धन आणि मन यांचे दान ‘हिंदु राष्ट्रा’साठी द्या !’

– सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपत्काळाविषयी संत आणि द्रष्टे यांची भाकिते

अनेक संत, द्रष्टे आणि भविष्यवेत्ते यांनी विद्यमान आपत्काळाविषयी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे.

१. प.पू. गगनगिरी महाराज : महाराष्ट्रात होऊन गेलेले थोर संत प.पू. गगनगिरी महाराज म्हणाले होते, ‘‘पुढे काळ इतका वाईट येणार आहे की, आम्हा संतांनाही वाटेल की, डोळे मिटले असते, तर बरं झालं असतं !’’

२. परात्पर गुरु डॉ. आठवले : आपत्काळाविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीही म्हटले आहे, ‘‘महाभयंकर तिसर्‍या महायुद्धात पुष्कळ संहार होईल. गावेच्या गावी उद्ध्वस्त होतील. त्यामुळे तिसर्‍या महायुद्धानंतर संपूर्ण पृथ्वीवरील सात्त्विकता वाढवण्यासाठी पृथ्वीची शुद्धी करावी लागेल. यासाठी सर्वांनी आतापासूनच साधना वाढवणे आवश्यक आहे.’’

३. भविष्यवेत्ते नॉस्ट्रेडॅमस : ४०० वर्षांपूर्वी होऊन गेलेले फ्रान्समधील भविष्यवेत्ते नॉस्ट्रेडॅमस यांनी तिसर्‍या महायुद्धाविषयी भाकित वर्तवले होते. ते म्हणाले, ‘तिसरे महायुद्ध इतके महाभयंकर असेल की, तुम्हाला पहिली दोन महायुद्धे खेळण्यासारखी वाटतील !’

विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांच्याशी एकरूप झालेल्या संतांचे आज्ञापालन करण्यात हित असणे

भविष्य सांगणार्‍या प्राचीन नाडीपट्ट्या, गावातील परंपरागत भाकणुका, तसेच द्रष्टे संत यांनीही या भीषण आपत्काळाच्या संदर्भात उल्लेख केलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी असणारे संत आणि द्रष्टे ‘समाजाला काय मार्गदर्शन करायचे ?’, हे एकमेकांशी बोलून ठरवत नाहीत. तरीही त्यांच्या मार्गदर्शनामध्ये समान धागा दिसतो. विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांच्याशी एकरूप झालेले संत जे मार्गदर्शन करत आहेत, त्यानुसार आचरण केल्यास आपलेच हित आहे.

– सद्गुरु नंदकुमार जाधव

वर्ष २०२० ते २०२३ हा काळ संपूर्ण जगासाठी आपत्तींचा काळ असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

आपत्काळ म्हणजे केवळ महामारी नाही, तर एका पाठोपाठ एक अशा अनेक भीषण संकटांची मालिकाच असणार आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या आपत्काळाच्या संदर्भात म्हटले आहे, ‘‘सध्या भारतासह संपूर्ण पृथ्वी संकटकाळातून जात आहे. या वर्षभरात पूरस्थिती, दंगली, महामारी, आर्थिक मंदी इत्यादी संकटांचा परिणाम देशाला भोगावा लागला. वर्ष २०२० ते २०२३ हा काळ भारतच काय, तर संपूर्ण जगासाठी आपत्तींचा काळ असणार आहे. या काळात आर्थिक मंदी, गृहयुद्ध, सीमापार युद्ध, पृथ्वीवर युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांचा सामना जनसामान्यांना करावा लागेल. अशा आपत्काळात जिवंत रहाणे आणि सुसह्य जीवन जगणे, हे एक आव्हान ठरणार आहे.’’

– सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था