तळई (जिल्हा रायगड) येथे दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू, ४० बेपत्ता !

  • ३० हून अधिक घरे मातीखाली गाडली गेली !

  • मुसळधार पावसामुळ महाड शहर जलमय !

  • पूरग्रस्त भागांतील नागरिकांना ‘हेलिकॉप्टर’च्या साहाय्याने वाचवण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट न्यून होत असतांनाच मुसळधार पावसामुळे प्रतिदिनच आपत्कालीन स्थिती ओढावत आहे. लोकहो, संकटांची ही मालिका आता थांबणार नाही. त्यात आपले रक्षण व्हावे, यासाठी भगवंताची आराधना करणे हाच पर्याय आहे !

तळई येथे दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू

मुंबई – अतीवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई येथे दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाला. २२ जुलै या दिवशी दुपारी ४ वाजता ही दुर्घटना घडली. दरड कोसळण्याचे प्रमाण इतके भयंकर होते की, अनुमाने ३५ घरे मातीखाली गेली आहेत. राष्ट्रीय आपत्कालीन साहाय्य पथकाच्या सैनिकांकडून मातीच्या ढिगार्‍याखालील नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. यामध्ये मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच मुसळधार पावसामुळे येथील सावित्री नदीचे पाणी महाड शहरात घुसले आहे. त्यामुळे संपूर्ण महाड शहर जलमय झाले असून ‘हेलिकॉप्टर’च्या साहाय्याने पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना वाचवण्याचा प्रयत्न चालू आहेत.

१. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील साखर येथील सुतारवाडी येथेही दरड कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणीही ढिगार्‍याखाली आणखी काहीजण अडकले आहेत. या गावांना जोडणारे पितळवाडी-उमरठ फाटा आणि उमरठ फाटा ते साखर येथील पूल पुरामुळे वाहून गेले आहेत.

२. २३ जुलै या दिवशी दुपारपर्यंत पूरग्रस्त भागात कुणीही प्रशासकीय अधिकारी न फिरकल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली.

३. प्रवीण दरेकर, पालकमंत्री कु. आदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ते साहाय्य देऊ केले.

४. पुरामुळे महाड तालुक्यातील अनेक ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले आहेत. डोंगराळ भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले आहे.

‘रेड अलर्ट’ घोषित करून ग्रामस्थांना स्थलांतरित का केले नाही ? – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

 

तळई गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेला १ दिवस होऊनही एकही प्रशासकीय अधिकारी किंबहुना गावचा तलाठीही येथे आला नाही. येथे संपर्काची अडचण आहे; मात्र महाड येथून बोटीने येण्याची आवश्यकता होती. या संकटाच्या स्थितीतही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. ठाणे येथून तरुण मुले साहाय्याला आली. त्यांनी ग्रामस्थांना स्थलांतरासाठी बाहेर काढले; मात्र प्रशासकीय अधिकारी आले नाहीत, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ घोषित करूनही नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले नाही. वेळेत स्थलांतर केले असते, तर निष्पाप जीव वाचले असते. एवढे दायित्वशून्य प्रशासन मी कधीच पाहिले नाही.