महाराष्ट्रात अतीवृष्टीमुळे घडलेल्या विविध दुर्घटनांत ५४ जण ठार !

रायगडमधील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधानांकडून प्रत्येकी २ लाख रुपयांचे साहाय्य घोषित !

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली

मुंबई – महाराष्ट्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणासह मुंबई, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना अतीवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील देवरुखकर वाडी येथे ६ घरांवर दरड कोसळली आहे, तसेच अन्य ठिकाणही काही दुर्घटना घडल्या. या दुर्घटनांत एकूण १२ जणांचा मृत्यू झाला. यासह मुंबई येथील गोवंडीमध्येही १ घर कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला. राज्यात अतीवृष्टीमुळे घडलेल्या विविध दुर्घटनांत आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडमधील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर घायाळ झालेल्यांना प्रत्येकी ५० सहस्र रुपये साहाय्य करण्याची घोषणा केली आहे.