विठ्ठल, विठ्ठल आणि विठ्ठलच..!

आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला केले जाणारे सर्व धार्मिक उपचार पंढरपुरात भावपूर्णपणे पार पडले. कोरोनाच्या सावटामुळे यंदा मोजक्याच वारकर्‍यांची उपस्थिती होती. प्रतिवर्षी वारीच्या वेळी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने वारकरी येतात. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तीरसात न्हाऊन निघालेले वारकरी पंढरीचे वैभव असते; परंतु कोरोना महामारीमुळे या वेळी हे वैभव पहायला मिळाले नाही. ही उणीव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही विठ्ठलाच्या पूजनाच्या वेळी जाणवली.

वारीसाठी उपस्थित रहाता आले नाही, याची खंत प्रत्येक वारकर्‍याच्या मनात होती. भक्तीरसात डुंबलेल्या वारकर्‍यांविना पंढरपूर पहाणे, हे उपस्थितांना असह्य झाले. ही स्थिती पाहून एका वारकर्‍याने माध्यमांसमोर आपले मन मोकळे केले. ते म्हणाले, ‘‘पांडुरंगा हे काय झाले रे ! नेहमी किती आनंद असतो येथे. येथील वातावरण पाहून रात्रभर झोप लागली नाही. सरकारने काय करून ठेवले आहे. विठ्ठला परीक्षा पाहू नकोस, मंदिराचे दरवाजे परत एकदा उघड, पांडुरंगा परत एकदा उघड !’’ ‘या वारकर्‍याने सर्वांच्या वतीनेच भावना व्यक्त केल्या’, असेच म्हणावे लागेल. पायी वारी करायला अनुमती नसली, तरी अनेकांनी अनेक प्रकारे विठ्ठल भक्ती आहे त्या ठिकाणी अनुभवण्याचा प्रयत्न केला. कुणी समुद्रकिनारी विठ्ठलाचे सुंदर शिल्प वाळूमध्ये साकार केले, तर कुणी रांगोळी, चित्र काढून विठ्ठलाचे रूप साकारले. प्रत्येक जण आपापल्या परीने विठ्ठलाला अनुभवत होता, हेच यातून लक्षात येते.

कोरोनामुळे सरकारने घातलेले नियम वारकर्‍यांनी पाळल्यामुळे आजपर्यंत कधीही खंडित न झालेली पायी वारीची परंपरा खंडित झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंदूंनी आपल्या भावनांना मुरड घालून सर्वच सण आणि उत्सव सरकारने घालून दिलेले नियम पाळूनच केले, हे हिंदूंचे वैशिष्ट्य आहे. बुद्धीप्रामाण्यवादी, पुरो(अधो)गामी, हिंदुद्वेष्टे यांनी हिंदु धर्माच्या विरोधात कितीही गरळओक केली, तरी हिंदूंच्या मनातील भगवंतभेटीचा भक्तीरस अखंड वहात आहे, जो वारीच्या निमित्ताने अनुभवता आला. वारीच्या दिवशी  प्रत्येक हिंदूच्या मनात विठ्ठल, विठ्ठल आणि विठ्ठलच अनुभवता आला !

– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.