-
हिंदु जनजागृती समितीसह समविचारी संघटनांच्या विरोधाचा परिणाम !
-
भाजपकडून नामांतराला तीव्र विरोध, तर काम अपुरे असल्याच्या कारणावरून शिवसेनेचा नामांतराला विरोध !
क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या नावाचा प्रस्ताव कायमचा रहित होत नाही, तोपर्यंत समस्त हिंदुत्वनिष्ठांनी याला सनदशीर मार्गाने विरोध करावा !
मुंबई – भाजपकडून करण्यात आलेला तीव्र विरोध आणि काम अपुरे असल्यामुळे शिवसेनेने नामांतराला केलेला विरोध यांमुळे बाजार अन् उद्यान समितीच्या बैठकीत गोवंडी येथील उद्यानाला क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव देण्याचा प्रस्ताव अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी फेटाळून पालिका प्रशासनाकडे परत पाठवला. (असा प्रस्ताव पुन्हा चर्चेला आल्यास भाजप आणि शिवसेना यांनी त्याला एकत्रित विरोध करावा, अशी हिंदुत्वनिष्ठांची अपेक्षा आहे ! – संपादक) १५ जुलै या दिवशी झालेल्या समितीच्या ‘ऑनलाईन’ मासिक बैठकीत हा प्रस्ताव संमतीसाठी आला होता.
याविषयी १४ जुलै या दिवशी हिंदु जनजागृती समिती, श्री शिवकार्य प्रतिष्ठान (विक्रोळी) या संघटनांनी महापौर सौ. किशोरी पेडणेकर, बाजार आणि उद्यान समितीचे उपाध्यक्ष श्री. तुकाराम पाटील, तसेच भाजपचे गटनेते श्री. प्रभाकर शिंदे यांनाही निवेदन देऊन विषयाची माहिती दिली होती.
बाजार आणि उद्यान समितीच्या सभेत उद्यानाच्या नामांतराचा विषय चर्चेला आला असता शिवसेनेच्या गोवंडी येथील नगरसेविका ऋतुजा तारी यांनी उद्यानाचे काम अपूर्ण असल्याचे सांगितले. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी नामांतराचा प्रस्ताव परत पाठवण्याची मागणी केली. त्याच वेळी भाजपच्या नगरसेवकांनीही टिपू सुलतान याच्या नावाला जोरदार विरोध करून हा प्रस्ताव कायमचा रहित करण्याची मागणी केली. टिपू सुलतान याच्या नावाचा प्रस्ताव करणार्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनीही या वेळी बोलण्याची संधी मागितली. या वेळी सभेत निर्माण झालेल्या गोंधळामुळे अध्यक्षांनी बैठक तहकूब केली. समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी बाजार आणि उद्यान समितीकडे पत्राद्वारे या उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याची मागणी केली आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याची शिफारस बाजार आणि उद्यान समितीकडे केली होती.
टिपू सुलतान याच्या नावाचा प्रस्ताव पुन्हा चर्चेला आल्यास हिंदु समाज ते सहन करणार नाही ! – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती
हा प्रस्ताव पुन्हा आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात लक्ष घालणार्या मुंबईच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर आणि राजकीय पक्षांतील हिंदुत्वनिष्ठ नेते यांचे अभिनंदन; मात्र पुन्हा अशा प्रकारचा प्रस्ताव आल्यास हिंदु समाज सहन करणार नाही. क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही.
प्रसंगी रस्त्यावर उतरू; मात्र उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देऊ देणार नाही !
भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांपुढे व्यक्त केली भूमिका
मुंबई – टिपू सुलतान हा धर्मांध, क्रूरकर्मा आणि हिंदूद्वेष्टा राजा होता. त्याने म्हैसूरला मुस्लिम राष्ट्र घोषित केले होते. त्याच्या राज्यातील सर्व हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान करण्याची घोषणा केली होती. त्याने लाखो हिंदूंची हत्या केली. अशा अत्याचारी आणि दक्षिणेतील औरंगजेब म्हणून ओळखल्या जाणार्या कुशासकाचे नाव गोवंडी येथील उद्यानाला देऊ देणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरू, अशी भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांपुढे मांडली.
१५ जुलै या दिवशी बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत भाजपच्या नगरसेवकांनी गोंवडी येथील उद्यानाला टिपू सुलतान याने नाव देण्याचा प्रस्ताव कायमचा रहित करावा, अशी मागणी केली होती; मात्र सभेत बोलण्याची संधी न मिळाल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांची भेट घेऊन वरील भूमिका मांडली. याविषयी भाजपचे गटनेते श्री. प्रभाकर शिंदे यांनी हिंदूंच्या मानबिंदूवर प्रहार करणे, हिंदूंच्या धार्मिक आस्थेला ठेच पोचवण्याची कृती करणे हे विद्ववत्तेचे लक्ष आहे का ? छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, झाशीची राणी या सर्वांचा आपणाला विसर पडला आहे का ? असे प्रश्न उपस्थित करत उद्यानाला राष्ट्रपुरुषांचे नाव देण्याची मागणी केली.