विद्यार्थ्यांना ‘डिजिटल’ साधनसुविधा पुरवली जात नाही, तोपर्यंत ‘ऑनलाईन’ शिक्षण बंद करा ! – सुदिन ढवळीकर, मगोप नेते

‘मगोप’चा ‘इंटरनेट’ सुविधा आदी विषयांवरून आंदोलनाला प्रारंभ

पणजी, १२ जुलै (वार्ता.) – विद्यार्थ्यांना ‘डिजिटल’ साधनसुविधा पुरवली जात नाही, तोपर्यंत ‘ऑनलाईन’ शिक्षण बंद करा, अशी मागणी ‘मगोप’चे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. ‘मगोप’ने ‘इंटरनेट’ सुविधा आणि इतर विषयांवरून १२ जुलैपासून आंदोलनाला प्रारंभ केला आहे. आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी येथील आझाद मैदानात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

आमदार श्री. सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले, ‘‘सरकारने गावागावांत शासकीय भूमीवर भ्रमणभाष मनोरे (टॉवर्स) उभारण्याची व्यवस्था करावी. शिक्षकांना ‘ऑनलाईन’ शिकवण्याचे प्रशिक्षण द्यावे. गरजू विद्यार्थ्यांना शासनाने विनामूल्य ‘स्मार्टफोन’ उपलब्ध करून द्यावे. या मागण्यांसाठी ‘मगोप’ने आजपासून आंदोलन छेडले आहे. ‘मगोप’ने याविषयीचे निवेदन मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव, शिक्षण खात्याचे सचिव, शिक्षण खात्याचे संचालक आदींना दिले आहे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी ‘मगोप’ विधानसभा अधिवेशनापूर्वी आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ शिक्षण घेण्याची व्यवस्था करू आणि शिक्षकांना प्रशिक्षण देऊ, अशी आश्वासने विधानसभेत दिली होती; मात्र त्याची पूर्तता झाली नाही. विधानसभा आश्वासन समितीची मागील २ वर्षे बैठक झालेली नाही. यामुळे मी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या आधारे हा विषय उपस्थित करणार आहे. भाजप शासनाच्या काळात शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. विद्यार्थी रानात, डोंगरावर, झाडांवर चढून शिक्षण घेत आहेत. शासनाने आश्वासनांची पूर्तता न केल्याने विद्यार्थ्यांवर ही पाळी आली आहे.’’