मुसलमानांनी ८ मुले जन्माला घातली, तर ती सायकलचे पंक्चरच काढत रहातील ! – उत्तरप्रदेशचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मोहसिन रजा

उत्तरप्रदेशच्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकाचे प्रकरण

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – आमचे शासन मुसलमानांना ‘टोपी’कडून ‘टाय’कडे नेऊ इच्छित आहे; मात्र विरोधी पक्षांना वाटते की, ‘मुसलमान अशिक्षितच रहावेत; मुसलमानांनी फेरी लावावी, रद्दी विकावी, भंगार विकत घ्यावेे.’ मुसलमानांनी ८ मुले जन्माला घातली, तर ती सायकलचे पंक्चरच काढत रहातील. पूर्वी काँग्रेसने हेच केले होते आणि आता राज्यातील समाजवादी पक्षही तेच करत आहे. आमचे धोरण सर्वांना समवेत घेऊन जायचे आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मोहसिन रजा यांनी राज्याच्या ‘लोकसंख्या नियंत्रण नीती’वरून होणार्‍या टीकेवर केले आहे.

मोहसिन रजा पुढे म्हणाले की, लोकसंख्येवर नियंत्रण आणणे, ही आपल्या सर्वांची चिंता आहे. आम्ही ८ भावंडे आहोत; मात्र आता आम्ही ८ मुले जन्माला घालू शकत नाही; कारण आम्ही त्यांना योग्य सुविधा पुरवू शकत नाही, शिक्षण देऊ शकत नाही; मग या कायद्याला विरोध का केला जात आहे ? २ मुलेच असतील, तर आम्ही त्यांना डॉक्टर आणि इंजिनीयर बनवू शकतो; मात्र ८ मुले असतील, तर ती फावडा घेऊन मजुरी करतील. आम्ही कोणत्याही धर्माला लक्ष्य करत नाही, तर देश पुढे जायला हवा, असे आम्हाला वाटते.