भारतियांची ऑनलाईन फसवणूक करणार्‍या चिनी टोळीसाठी काम करणार्‍या दोघा भारतियांना अटक

चीनचे भारतियांवर असेही आक्रमण ! भारतियांची फसवणूक करणार्‍या चिनी अ‍ॅपवर भारत शासनाने तात्काळ बंदी घालून भारतियांचे पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

नवी देहली – देहली पोलिसांनी चिनी अ‍ॅपच्या माध्यमातून भारतियांची फसवणूक करणार्‍या दोघांना अटक केली आहे. भाग्यनगर येथे रहाणारा नागाराजू कर्मांची आणि तेलंगाणामधील कोनडाला सुभाष अशी त्यांची नावे आहेत. या दोघांकडून ३० भ्रमणभाष संच, ७ भ्रमण संगणक, १ संगणक, २ हार्ड डिस्क, ५० सिम कार्ड, ६ डेबिट कार्ड आदी जप्त करण्यात आले. या दोघांनी १० बनावट आस्थापने बनवली होती. हे दोघे भारतियांची फसवणूक करणार्‍या चीनमधील टोळीसाठी भारतात काम करत होते. (भारतियांची फसवणूक करणार्‍या टोळ्या चीनमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना भारतातील चोर साहाय्य करतात, हे संतापजनक ! अशा राष्ट्रघातक्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! – संपादक)

भारतियांना मद्य आणि मसाले यांच्या व्यापारामध्ये गुंतवणूक करण्यास सांगून त्यांची फसवणूक केली जात होती. भारतीय व्यापार्‍यांना चिनी अ‍ॅपद्वारे गुंतवणूक करण्यास सांगितले जात होते आणि नंतर पैसे परत दिले जात नव्हते. या टोळीने २ सहस्रांहून अधिक लोकांची आतापर्यंत फसवणूक केल्याची माहिती मिळाली आहे. ही टोळी भारतियांना खोट्या आस्थापनांमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगून नंतर परतावा म्हणून अधिक पैसे देत असे. असे प्रारंभी काही वेळा केल्यानंतर गुंतवणूक करणार्‍या व्यक्तीने मोठी रक्कम गुंतवल्यावर त्याला परतावा दिला जात नव्हता आणि त्याची फसवणूक केली जात होती. अटक केलेले दोघेही भारतात पैशांचा व्यवहार करण्यास साहाय्य करत होते.