स्थानिक आमदार आणि तत्कालीन नगराध्यक्ष उत्तरदायी असल्याचा आरोप
सावंतवाडी – ‘चांदा ते बांदा’ योजनेतून शहरातील शिवउद्यान आणि ‘हेल्थ पार्क’ येथे झालेल्या कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याला शिवसेनेचे तत्कालीन पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर आणि तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर हेच उत्तरदायी आहेत, असा आरोप नगराध्यक्ष संजू परब यांनी केला आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने चालू असलेल्या कामांना ९ जुलै या दिवशी नगराध्यक्ष संजू परब यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या नगरसेवकांसह भेट देऊन पहाणी केली. या वेळी नगराध्यक्ष परब यांनी निकृष्ट काम करणार्या ठेकेदाराला, तसेच या कामांकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनाही खडसावले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एम्.टी.डी.सी.च्या) माध्यमातून आमदार केसरकर यांनी ‘चांदा ते बांदा’ योजनेच्या अंतर्गत ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी शहरातील ‘जनरल जगन्नाथ भोसले शिवउद्यान’ आणि ‘हेल्थ पार्क’ यांसाठी संमत केला होता, तसेच विजेच्या कामासाठी ७४ लाख रुपयांचा निधी संमत झाला होता; मात्र काम पूर्ण होण्याआधीच ठेकेदारांची देयके देण्यात आली. ही कामे अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाली आहेत. या कामात झालेल्या या भ्रष्टाचाराच्या विरोधात जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करण्यात येणार असून त्यावर कार्यवाही न झाल्यास प्रसंगी उपोषण केले जाईल, अशी चेतावणी नगराध्यक्ष परब यांनी दिली. (विकासकामांतील भ्रष्टाचार लोकप्रतिनिधींना उघड करावा लागत असेल, तर प्रशासन नेमके काय करते ? विकासकामांवर लक्ष ठेवणे हे प्रशासकीय अधिकार्यांचे काम असतांना निकृष्ट कामे होतातच कशी ? – संपादक)
या वेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, विरोधी गटनेत्या अनारोजीन लोबो, सभापती उदय नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, दीपाली भालेकर, भारती मोरे, उत्कर्षा सासोलकर, माधुरी वाडकर, समृद्धी विर्नोडकर आदी उपस्थित होते.