देवगड – तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आर्थिक घोटाळा होत असून ‘या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करा’, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात साळसकर यांनी म्हटले आहे की, देवगड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे (ग्रामपंचायतीद्वारे) विविध योजना आणि उपक्रम ग्रामविकासाकरता राबवले जातात. शासनाच्या विविध उपक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाकडून स्थानिक पातळीवर उपक्रम अथवा योजना राबवण्यासाठी विशिष्ट निधीची तरतूद केली जाते. या खर्चात मोठा आर्थिक घोटाळा झाला असून या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी.
यात प्रामुख्याने नमूद करायचे झाल्यास प्रत्येक ग्रामपंचायतीला ‘सॅनिटरी पॅड डिस्पोझल यंत्र’ खरेदी करण्याकरता ७ सहस्र रुपये निधी प्राप्त झाला. या यंत्राची किंमत ३ सहस्र ५०० रुपये असतांना त्यावर ७ सहस्र रुपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले. ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंतर्गत ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येनुसार विशिष्ट रकमेचा निधी (१७ सहस्र ते २५ सहस्र रुपये) प्राप्त झाला. या रकमेतून ग्रामपातळीवर ग्रामपंचायतीच्या मालमत्तेत बंदिस्त शेड, ओला-सुका कचरा गोळा करणे, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, तसेच कचरा गोळा करण्याकरता सायकल खरेदी करणे, ही कामे करायची आहेत. सायकल खरेदीमध्येही मोठा घोटाळा झाला आहे.
तरी या प्रकरणांची सखोल चौकशी करून स्थानिक स्वराज्य संस्थांकडून याविषयीची आवश्यक ती माहिती गोळा करावी, तसेच असे आर्थिक घोटाळे करणार्यांवर कठोर कारवाई करावी.