‘वर्ष १९८० पासून सत्तेवर आलेल्या आतापर्यंतच्या सरकारांनी स्वतःच्या हीन, स्वातंत्र्यमूल्यद्रोही कृत्यांनी गोव्याच्या सांस्कृतिक मूल्यांशी आणि देवभूमी असलेल्या या सोज्वळ, आध्यात्मिक प्रतिमेशी अन् पोर्तुगीजपूर्व काळापासून अबाधितपणे चालत आलेल्या भारतीय संस्कृतीशी अक्षम्य किळसवाणा द्रोह केलेला आहे ! ज्या असंख्य सर्वधर्मीय स्वातंत्र्यसैनिकांनी ऐन तारुण्य, संसारसुख, कुटुंब, स्वतःचे भवितव्य आदी सगळेच पणाला लावून, शत्रू पोर्तुगिजांच्या गुलामीतून गोवा मुक्त करण्यासाठी प्रसंगी प्राणांचे बलीदान दिले, त्या सर्वांच्या त्यागाचा आणि स्वातंत्र्यमूल्य आकांक्षांचा पार चुराडा अन् घोर अपमान आतापर्यंतच्या सत्तांनी केलेला आहे ! हे परमेश्वरा, हे भारतमाते, हे क्रांतीदेवते, यांना कदापि क्षमा नको ! ते क्षमेस पात्र नाहीत. १९ डिसेंबर १९६१ या दिवशी भारतीय सेनेने गोवा मुक्त केला. आपण सर्व स्वतःलाच आधी एक प्रश्न विचारू आणि त्याचे प्रामाणिक उत्तर शोधू.
वर्ष १९८० पासून आतापर्यंत सत्तेत आलेल्या सरकारांनी खरेच गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले का ? कि गोवा मुक्तीमागच्या स्वातंत्र्यमूल्यांचा सत्तेच्या लालसेपायी पार चुराडा करून टाकला ? गोवा मुक्तीच्या साठीनंतर आपल्या हाती काय पडले ? याचा गोषवाराच मांडूया.
इ. देहलीला प्रजासत्ताकदिन सोहळ्यात सामील होणारे गोव्याचे चित्ररथ ‘पोर्तुगीज मुलामा असलेले (फ्युजन कल्चर) अथवा पाश्चात्त्य धाटणीचे वाटतील’, असे पाठवले.
ई. सर्वांत अधिक लोकसंख्या, बंदर आणि विमानतळ असलेल्या शहराचे ‘वास्को द गामा’ या समुद्री पोर्तुगीज दरोडेखोराचे ठेवलेले नाव आतापर्यंतच्या कोणत्याच पक्षांची सत्ता असतांनाही पालटले नाही !
उ. रस्ते आणि गावांची पोर्तुगिजांनी ठेवलेली नावे आणि अपभ्रष्ट केलेली ‘स्पेलिंग्स’ अन् उच्चार जसेच्या तसे ठेवले गेले आहेत.
ऊ. काँग्रेस राजवटीत पर्यटनाचे निमित्त करून गोव्याची प्रतिमा ‘पूर्वेकडील रोम’ (रोम ऑफ द ईस्ट) अशी हेतूपुरस्सर करण्यात आली. काँग्रेसने पहिला कॅसिनो गोव्यात आणला. भाजपने त्यांची संख्या वाढवून ती ६ वर आणली. याखेरीज कॅसिनोंना ‘ऑफशोअर’ असतांनाही मांडवीत कायमचा स्थिर कायदेशीर दर्जा दिला.
ए. कुंकळ्ळीच्या पोर्तुगिजांविरुद्धच्या प्रेरक स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची इच्छाशक्तीच सरकारला नाही. केवळ आश्वासने देऊन फसवण्यात येत आहे !
(क्रमशः)
– प्रा. सुभाष वेलिंगकर, भारतमाता की जय संघटना, गोवा.