‘वर्ष २०१३ मध्ये माझ्या आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी मी नामजप करतांना प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांची भजने ऐकायचो. तेव्हा माझ्या सामान्य बुद्धीला भजनांचे अर्थ थोडेफार उलगडत असत. ‘साधकांनीही भजनांचे अर्थ समजून घेऊन भजने ऐकली, तर त्यांचा भाव जागृत व्हायला साहाय्य होईल’, असे मला वाटायचे. एकदा मी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याकडे गेलो असता त्यांना विचारले, ‘‘मला भजनांचा अर्थ जेवढा उलगडतो, तेवढा मी लिहून काढत जाऊ का ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘सध्या नको. आपल्याकडे इतर बर्याच सेवा आहेत.’’ ते ऐकून मी भजनांचे अर्थ लिहिण्याचा विचार बाजूला ठेवला.
वर्ष २०२० मध्ये आदरणीय कै. दादा दळवींच्या कन्या सौ. उल्का बगवाडकर यांनी भजनांच्या भावार्थांचा ग्रंथ प्रसिद्ध करण्याची इच्छा व्यक्त केली. आता वर्ष २०२१ मध्ये हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा सुयोग आला आहे. या ग्रंथातील भावार्थ हे प.पू. बाबांनीच निर्देशित केलेले असल्यामुळे हा ग्रंथ खर्या अर्थाने भावमय आणि परिपूर्ण झाला आहे.
‘साधक आणि भक्त यांना भजनांतील शिकवण परिपूर्णतेने कळावी, यासाठी कै. दादा दळवी आणि सौ. उल्काताई यांच्या माध्यमातून प.पू. बाबांनीच ही लीला घडवली’, असे वाटते. ‘भविष्यात प.पू. बाबांच्या भजनांचे अर्थ सांगणारे कुणीतरी भेटतील’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०१३ मध्येच ओळखले होते’, हे त्यांचे द्रष्टेपणच ! ‘प.पू. बाबांच्या अमूल्य अशा भजनांचे अर्थ लिहिले जावेत’, ही माझ्या मनातील अपूर्ण राहिलेली इच्छाही जणू प.पू. बाबा आणि परात्पर गुरु डॉक्टर यांनी पूर्ण केली’, असेही वाटले.’
– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे एक संकलक (१०.६.२०२१)