मुंबई, ६ जुलै (वार्ता.) – केंद्रीय संस्था जर सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम करत असतील, तर त्याचाही परामर्श, काळजी आणि त्याविषयी चौकशी गृहमंत्र्यांच्या माध्यमातून व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत ५ जुलै या दिवशी अध्यक्षांकडे केली.
ते पुढे म्हणाले की, अलीकडच्या काळात वर्तमानपत्रात आणि विरोधी पक्षातील लोकांकडून ‘याच्या मागे ‘ईडी’ लावतो’, ‘त्याला ‘सीबीआय’ लावतो’, अशी विविध विधाने ऐकायला मिळतात. त्यामुळे सभागृहातील अनेक सदस्यांचे दूरभाष केंद्रीय यंत्रणा ध्वनीमुद्रित करून ठेवत असेल, तर अशाच प्रकारे आमच्या सभागृहातील सदस्यांचे संरक्षण करणे हे सरकारचे दायित्व आहे. गृहमंत्र्यांना विनंती आहे की, केंद्रीय एजन्सीकडून राज्यातील सभागृहातील किती सदस्यांचे दूरभाष ध्वनीमुद्रित ठेवले आहेत, याची माहिती सभागृहात ठेवावी.